जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !
भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी यांच्या वतीने जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर समुपदेशक करुणा भवर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही तपासणीचे महत्त्व, उपचाराच्या उपलब्ध सुविधा तसेच एचआयव्हीविषयी असलेले गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका लोकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी तसेच समुपदेशक करुणा भवर यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment