तिरपे झालेले धोकादायक झाड अग्निशमन दलाने तोडले; मोठी दुर्घटना टळली !!
*डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026*
डोंबिवली एमआयडीसी निवासीतील मिलापनगर सर्व्हिस रोडवर गेल्या दोन दिवसांपासून धोकादायक स्थितीत असलेले एक मोठे रेन ट्री झाड अखेर अग्निशमन दलाने सुरक्षितपणे तोडले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.
*रस्त्याच्या दिशेने झुकले झाड*
मोनालिसा सोसायटी RM 01 जवळील हे रेन ट्री झाड तिरपे होऊन रस्त्याच्या दिशेने वाकले होते. काही मोठी वाहने त्याला घासून जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हे झाड रस्त्यावर कोसळले असते तर जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.
*अग्निशमन दलाची तातडीची कारवाई*
ही बाब केडीएमसी उद्यान विभाग आणि अग्निशमन दलाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रथम पाहणी करून हायड्रा क्रेनच्या मदतीने झाड सुरक्षितपणे तोडून बाजूला केले.
या कामासाठी सर्व्हिस रोडवरील वाहतूक खबरदारी म्हणून सुमारे एक तास बंद ठेवण्यात आली होती.
*रहिवाशांनी मानले आभार*
धोकादायक झाड वेळीच तोडल्याने परिसरातील रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
एमआयडीसी निवासीमध्ये या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे 17 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे केडीएमसीने उर्वरित धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment