खराब रस्त्यांविरोधात मोहने-आंबिवली रिक्षाचालकांचे उद्या रिक्षा बंद आंदोलन. !!
रिक्षा युनियन अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मोहने येथे खराब रस्त्यांमुळे रिक्षातच महिलेची झाली प्रसूती
कल्याण : संदीप शेंडगे
कल्याण : मोहने, आंबिवली आणि शहाड परिसरातील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक-मालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोहने-आंबिवली शहाड रिक्षाचालक-मालक संघटनेने उद्या 3 सप्टेंबर रोजी गुरुवारी रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे परिसरातील रिक्षा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असून, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तयारीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मोहने, आंबिवली, शहाड परिसरातील अनेक रस्त्यांची गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या खड्ड्यांमधून दररोज रिक्षा चालवताना वाहनांचे नुकसान होत असून, रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे.
खड्ड्यांमुळे रिक्षातच महिलेची प्रसूती
खराब रस्त्यांच्या गंभीर परिणामाचे उदाहरण म्हणून मोहने परिसरात एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार रिक्षाचालकांनी समोर आणला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीविताशी प्रशासन खेळत असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे.
रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना या खराब रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने अखेर रिक्षाचालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रशासनाला शिवाजी पाटील यांचा इशारा
मोहने-आंबिवली-शहाड रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिक आणि रिक्षाचालकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
“रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. रिक्षा चालवताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी. अन्यथा रिक्षाचालकांचा संघर्ष आणखी तीव्र होईल,” असा इशारा शिवाजी पाटील यांनी दिला.
जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला प्रवाशांची गैरसोय
दरम्यान, उद्या रिक्षा बंद आंदोलन होणार असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. बाजारपेठा, वपरिसर तसेच इतर ठिकाणी खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असताना रिक्षा सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होणार असला, तरी त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रिक्षाचालकांच्या मागण्यांची दखल घेऊन रस्त्यांची पाहणी व दुरुस्तीची ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.
खड्ड्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त, प्रवासी हैराण आणि आता आंदोलनाचा इशारा; प्रशासन या समस्येवर कधी कायमस्वरूपी तोडगा काढणार, याकडे मोहने-आंबिवली परिसराचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment