गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार !!
वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी.
समुद्रकिनारी विसर्जनचा रस्ता करून दिला मोकळा
उरण, दि. १३ (विठ्ठल ममताबादे) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी विसर्जनासाठी येत असतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेऊन नागांव गावातील नागरिकांनी नागांव-म्हातवळी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. नागरिकांची अडचण लक्षात घेत वैभव कडू यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चाने समुद्रकिनारी विसर्जनासाठी जाणारा मार्ग मोकळा करून दिला.
‘गावकऱ्यांची अडचण ही आपलीच अडचण’ या भावनेतून केलेल्या या पुढाकारामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा, हाच या कामामागील उद्देश असल्याचे वैभव कडू यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमाचे नागांव तसेच परिसरातील नागरिक आणि भाविकांकडून कौतुक होत असून, वैभव यशवंत कडू यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. माणुसकीतून केलेली ही सेवा गणेशभक्तांसाठी खऱ्या अर्थाने ‘बाप्पाची सेवा’ ठरली आहे.
No comments:
Post a Comment