नवी मुंबईत नागरी संरक्षणाच्या प्राथमिक प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
*प्रशिक्षणार्थींना व्याख्याने व प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
*नवी मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ :*
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. १७/२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण वर्ग दि. ०७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२.०० ते ४.३० या वेळेत मॉडर्न कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षण वर्गात एकूण ४९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्तीच्या काळात स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान, कौशल्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच अनुषंगाने या प्राथमिक प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर सैद्धांतिक मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणाच्या एका सत्रात श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक तसेच डॉ. राहुल घाटवळ, मानसेवी निदेशक तथा विभागीय क्षेत्ररक्षक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी श्री. धैर्यशील जाधव, निवृत्त अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनपर व्याख्यान सादर केले. त्यांच्या अनुभवातून प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षणाच्या कार्यपद्धतींबरोबरच आपत्तीच्या प्रसंगी शांतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि तत्परतेने कार्य करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे सहभागी ४९ प्रशिक्षणार्थींमध्ये आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत जागरूकता व आत्मविश्वास निर्माण होत आहे. नागरी संरक्षणाच्या या उपक्रमामुळे प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या वाढण्यास तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये सक्षमपणे मदतकार्य करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment