लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकरवर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी व बदनामीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार !!
*लोणार / किनगाव जट्ट :*
लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकर याच्यावर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी आणि बदनामीप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
किनगाव जट्ट येथील रहिवासी तथा 'लोणार टाइम्स' वृत्तपत्राचे संपादक समाधान तुकाराम मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अमोल प्रभाकर पालकर याची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे. तो वाळू तस्करीसह विविध अवैध व्यवसायातून पैसा कमावून कोणत्याही अधिकाऱ्याला जुमानत नाही. पैशाच्या जोरावर अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने गावातील सरपंच, पत्रकार तसेच सर्वसामान्य नागरिकांना सतत त्रास देत खंडणी उकळण्याचे प्रकार चालविल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने CCTNS पोर्टलवर तक्रार केल्याच्या कारणावरून स्वतःच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल होऊ नये म्हणून पत्रकारांची व पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सॲप ग्रुपवर फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. "या चिलर वार्ताहराला कोणी घाबरत नाही" असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी व सोशल मीडियावर त्यांची मानहानी करून जातीय भावनेतून कमी लेखण्याचा प्रयत्न केला.
तसेच गावातील नागरिकांकडून, गरीब व विधवा महिलांच्या घरकुलाच्या पैशांवर डल्ला मारणे आणि पत्रकारांना खंडणीसाठी वेठीस धरण्याचे गंभीर कृत्य करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही आरोपी अमोल पालकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी बिबी पोलीस स्टेशन येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५६(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि पत्रकार संरक्षण कायदा २०२१ च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment