एमआयडीसीत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर ! यापूर्वी अपघातात एक बळी गेला आता दुसरा बळी जाण्याची वाट पहात आहात का !!
डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये खासकरून कावेरी चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला असून फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच नवीन नवीन टपऱ्या पण वाढत आहे. याच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे दीड वर्षापूर्वी एक शालेय विद्यार्थ्याचा अपघातात बळी गेला होता. फेरीवाल्यांमुळे रस्ता आणखी अरुंद झाल्याने दोन मोठी वाहने समोरासमोरून आल्यास पादचाऱ्यांना चालण्यास जागाच मिळत नाही. त्यात आता गणेशोत्सव, दहीहंडी याच्या कमानी या कावेरी चौकात लावण्यात आल्या आहेत. शाळा सुटण्याच्या, भरण्याच्या वेळेत ट्रॅफिक समस्या अधिक बिकट होते. मागील मंगळवारी सायंकाळी केडीएमटी बस आणि कार हे एकमेकाला घासून गेल्याने कावेरी चौकात मोठा अपघात होता होता वाचला. सुदैवाने त्यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र प्रशासनाला पुन्हा आणखी कोणाचा बळी पाहिजे आहे का ?
सदर हे अनधिकृत फेरीवाल्यांना राजाश्रय मिळत असल्याने ते बिनधास्त झाले आहेत. राजकीय, प्रशासनातील उच्च व खालचे कर्मचारी यांच्या त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. जर एखाद्या दिवशी कारवाई होणार असेल तर त्या फेरीवाल्यांना आधीच माहिती पडते. जेव्हा मागे एका शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यू झाला होता तेव्हा मात्र नागरिकांच्या दबावाने काही दिवस कावेरी चौकातील फेरीवाल्यांना केडीएमसीने हटविले होते. थोड्या दिवसांनी पुन्हा फेरीवाले ऐटीत बसू लागले. येथील रहिवाशांना आता फेरीवाल्यांवर तात्पुरती, दिखाऊ कारवाई नको, कायमस्वरूपी कारवाई पाहिजे आहे. केडीएमसी बरोबर येथे विशेष नियोजन प्राधिकरण हे एमआयडीसी असल्याने तसेच येथील भूखंडाची मालकी त्यांच्याकडे असल्याने तेही या अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या यांच्यावर कारवाई करू शकतात. यापूर्वी तशी कारवाई एमआयडीसी कडून झाली आहे. बघूया आता ही कारवाई कधी होणार की राजाश्रय मिळालेले फेरीवाले कायमस्वरूपी येथे स्थिरावणार हे पहावे लागेल.
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment