Thursday, 15 October 2026

वीर वाजेकर महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता कार्यक्रम’ उत्साहात संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता कार्यक्रम’ उत्साहात संपन्न !!

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, महालण  विभाग फुंडे येथे वाणिज्य विभागाच्या वतीने फायनान्स फोरम ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने ‘आर्थिक साक्षरता कार्यक्रम’ उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी फायनान्स फोरम ऑफ इंडिया चे वक्ते प्रणव पाटील उपस्थित होते. त्यांना  तेजस कारेकर यांनी सहकार्य केले. प्रणव पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहार, पैशांचे योग्य व्यवस्थापन, नियमित बचतीची सवय, गुंतवणुकीचे विविध पर्याय, आर्थिक नियोजन आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती मिळवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि उत्पन्नानुसार खर्चाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आमोद ठाक्कर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आर्थिक साक्षरतेचे आधुनिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान प्राप्त करून न थांबता आर्थिक व्यवहारांचे ज्ञानही आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आर्थिक साक्षरतेमुळे व्यक्तीला उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल साधता येतो तसेच भविष्यातील आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन करता येते, असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच बचतीची सवय लावण्याचा, डिजिटल आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. कोणत्याही आर्थिक योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची योग्य माहिती घेणे, जोखीम समजून घेणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते आणि ते भविष्यात सक्षम, आत्मनिर्भर व सुजाण नागरिक बनण्यास मदत होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे प्रमुख  प्रांजल भोईर, बी.कॉम. (मॅनेजमेंट स्टडिस) विभागाचे प्रमुख  भूषण ठाकूर आणि बी.कॉम. (अकाउंट एंड फायनान्स) विभागाच्या समन्वयक श्रीमती. प्रियांका ठाकूर यांनी सहकार्य केले. तसेच श्रीमती दीक्षिता म्हात्रे, श्रीमती रेणू सरोज, श्रीमती तन्वी कोळी आणि कु. ऋतुजा म्हात्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजून घेण्याची तसेच भविष्यात योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

No comments:

Post a Comment

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित !

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित ! *डोंबिवली, विनोद गिरी :* दि. 16 ऑक्ट...