कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी जनजागृतीपर मार्गदर्शन !!
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहावे – सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ धर्मेंद्र नलावडे.
उरण, दि.१५, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण, जिल्हा रायगड सायबर सिक्युरिटी जनजागृती आणि समस्या या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ धर्मेंद्र नलावडे (कल्याण) यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, ई-मेल, ऑनलाइन बँकिंग व्यवहार तसेच आर्थिक व इतर ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, त्यापासून बचाव करण्याचे उपाय आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याविषयी नलावडे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी हर्षाली जाधव (कल्याण) यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त अभ्यासक्रमांची माहिती दिली. सायबर फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि करिअरच्या दृष्टीने कोणते अभ्यासक्रम निवडावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. गर्जे यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता अभ्यास, ज्ञानवृद्धी, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी योग्य पद्धतीने करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. गर्जे यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर प्राचार्यांचे स्वागत डॉ. चव्हाण यांनी केले. प्रा. रियाज पठाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एच. के. जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एम. जी. लोणे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सायबर सुरक्षेविषयी सखोल माहिती मिळाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
No comments:
Post a Comment