*मागील वर्षीपेक्षा १००० रुपयांची वाढ; मुख्यालयाबाहेर कामगार सेनेचा फटाके फोडून जल्लोष*
*कल्याण, दि. २७ ऑक्टोबर (दीपक इंगळे) :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महापालिका प्रशासनाने यंदा सानुग्रह अनुदानात वाढ करत २१ हजार रुपयांची दिवाळी भेट जाहीर केली आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा महापालिकेच्या आस्थापनेवरील ५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्ससाठीही ६ हजार रुपयांची दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे.
*मुख्यालयाबाहेर कामगार सेनेचा जल्लोष -*
सानुग्रह अनुदान जाहीर होताच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने ८ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन २७ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने २१ हजार रुपये जाहीर केले आहेत.
या निर्णयानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस सचिन बासरे, उपाध्यक्ष सुनील पवार आणि सुरेश तेलावणे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांचे आभार मानले आहेत.
शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढत्या महागाईत हे अनुदान दिलासादायक ठरणार आहे.
No comments:
Post a Comment