गटारे बनवण्याच्या नावाखाली मोठे झाड तोडले; दुसरे तोडण्यास रहिवाशांचा विरोध !!
*डोंबिवली, राजू नलावडे :* राज्यात प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यावरून वाद सुरू असताना डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात विकासाच्या नावाखाली चांगली झाडे तोडली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
एमआयडीसी निवासीमधील सर्व्हिस रोडवर भूखंड क्रमांक आरएम ३७ समोरील एक मोठे झाड दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी येऊन तोडून वाहनात भरून नेले होते. आज पुन्हा त्याच ठिकाणचे दुसरे झाड तोडण्यासाठी त्याच व्यक्ती आल्या असता स्थानिक रहिवाशांनी त्यांना जाब विचारला.
येथे मोठे नवीन गटार बनवायचे असल्याने हे झाड तोडावे लागेल, आम्ही एमआयडीसीच्या गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराची माणसे आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यावर रहिवाशांनी झाड तोडण्याची परवानगी दाखवण्यास सांगितले आणि विना परवानगी झाड तोडण्यास हरकत घेतल्यावर त्या व्यक्ती तेथून निघून गेल्या.
त्या व्यक्ती खरोखरच एमआयडीसी ठेकेदाराची माणसे होती की बेकायदेशीरपणे झाडे तोडणारी टोळी होती, याचा उलगडा झालेला नाही. याबाबत संबंधित उपअभियंता, एमआयडीसी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भूखंड क्रमांक आरएम ३८ समोरील गुलमोहरचे फक्त एक झाड तोडण्यास वृक्ष प्राधिकरण, केडीएमसीकडून परवानगी मिळाल्याचे सांगितले आणि तसे परवानगी पत्रही पाठवले. त्यामुळे भूखंड आरएम ३७ समोरील दोन झाडे तोडायला आलेल्या व्यक्ती कोण होत्या, याबाबत एमआयडीसी अधिकारीही स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी झाड तोडण्यात आले, त्याच्या जवळच शैलगंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्पासाठी (City Forest) एमआयडीसीकडून मिळालेल्या जागेत मागील पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली असून, काही वर्षांत तेथे जंगल तयार होणार आहे. म्हणजे एकीकडे संस्था आणि नागरिक झाडे लावत असताना दुसरीकडे प्रशासनाकडून विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात आहेत.
एमआयडीसी निवासी भागात गेल्या वर्षापासून नवीन काँक्रीट रस्ते बनवल्यानंतर नवीन नाले, गटारे आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले असून, यामुळेच अनेक झाडे तोडली गेली किंवा कोसळली आहेत. एमआयडीसीत प्रदूषण असल्याने स्थानिक सामाजिक आणि रहिवासी संघटनांनी अनेक वर्षांपूर्वी झाडे लावली होती. विकासाच्या नावाखाली ती तोडल्याने किंवा कोसळल्याने अंदाजे २० टक्के झाडे एमआयडीसीत कमी झाली आहेत.
यामुळे प्रदूषण वाढणार असून, काँक्रीट रस्ते आणि झाडांचे प्रमाण कमी झाल्याने तापमानातही वाढ झाली आहे. सध्या या वृक्षतोडीविरोधात कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
No comments:
Post a Comment