आधुनिक शिक्षण, दर्जेदार आरोग्यसुविधांसह सर्वसमावेश विकासाचा आराखडा तयार !!
*ठाणे, विनोद गिरी:* दिशा समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाने शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांसाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद व पालिका शाळांचे आधुनिकीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे दर्जावर्धन आणि शहर सौंदर्यीकरणासह विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
*शिक्षणासाठी 300 कोटींचा आराखडा :*
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांचा भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शाळांचे डिजिटलायझेशन, इंटरनेट सुविधा, आधुनिक वर्गखोल्या, आदर्श स्वयंपाकगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय व खासगी क्षेत्रातील अनुभवी शिक्षकांचे सहकार्य घेण्यात येणार असून शाळांचे दरवर्षी मूल्यमापन करण्यात येईल. सक्षम शाळा अभियानांतर्गत स्मार्ट शाळा, सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पीएम पोषण योजनेची अंमलबजावणी आणि शाळांच्या भिंती शैक्षणिक चित्रांनी बोलक्या करण्यावर भर दिला जाणार आहे.
*आरोग्यासाठी 100 कोटींचा आराखडा :*
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावण्यासाठी 100 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य केंद्रे केवळ तपासणीपुरती मर्यादित न ठेवता एकाच छताखाली तपासण्या, उपचार आणि मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
*नागरी सुविधांचा कायापालट :*
प्रमुख रस्त्यांचे सौंदर्यीकरण, आकर्षक प्रकाशव्यवस्था, तलाव, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्यानांमध्ये व्यायाम सुविधा, सायकल ट्रॅक, मुलांसाठी खेळाची मैदाने, आधुनिक व्यायामशाळा, ग्रंथालये व अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.
पदपथ, पथदिवे, महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार, महिला भवन, कम्युनिटी हॉल आणि दलित वस्ती, झोपडपट्टी परिसरात रस्ते, पाणी, गटारे, स्वच्छता या मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन आहे.
या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी आणि प्रशासकीय सहकार्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळ, अंबरनाथ मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, बदलापूर मुख्याधिकारी मारुती गायकवाड, शिवसेनेचे राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment