Tuesday, 6 October 2026

खरांगण बंधारा प्रकरण: वनपालाचा 'तो मी नव्हेच'चा केविलवाणा प्रयत्न; कारवाई अटळ !!

खरांगण बंधारा प्रकरण: वनपालाचा 'तो मी नव्हेच'चा केविलवाणा प्रयत्न; कारवाई अटळ !!

*कल्याण / शहापूर (संजय कांबळे) :* महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या 'तो मी नव्हेच' या नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र वेशभूषा करून लोकांना फसवतो आणि प्रत्येक आरोपावर "तो मी नव्हेच" असे म्हणत बचाव करतो. सध्या असाच प्रकार शहापूर तालुक्यातील डोलखांब वनविभागात कार्यरत असलेल्या एका वनपालाकडून सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

*काय आहे प्रकरण?*
शहापूर तालुक्यातील खरांगण गाव सध्या बंधारा घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. कागदोपत्री सावरोली (खरपत) येथे मंजूर असलेला बंधारा दीड ते दोन किलोमीटर पुढे खरांगण गावाजवळ बांधण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी अगोदरच 2 ते 3 बंधारे असताना केवळ मलिदा खाण्यासाठी हा बंधारा बांधल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कागदावर ठेकेदार शशिकांत गायकवाड यांच्या नावाने असलेले सुमारे 98 लाखांचे हे काम डोलखांब वनविभागातील एका वनपालाने बेकायदेशीरपणे आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. शाई नदीतील दगड, रेती व इतर साहित्य वापरल्याने बंधारा निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याची एक बाजू पूर्णपणे वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांची भातशेती वाहून गेली असून शेतात मातीच न राहिल्याने जमीन नापीक बनली आहे.

*शेतकऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार*
या विरोधात वयोवृद्ध महिला शेतकरी सोनूबाई हरड, गणपत हरड, राम हरड, हरेश हरड आदी शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक जी. मलिकार्जुन (ठाणे), जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपवनसंरक्षक मल्होत्रा (शहापूर) आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनंतर संबंधित वनपालाने तक्रारदारांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन 5 ते 10 हजार रुपयांचे आमिष दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. ते निष्फळ ठरल्यानंतर गावातील काही मतलबी लोकांना हाताशी धरून बंधारा चांगला असल्याचा आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच नसल्याचा खोटा प्रचार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

*शेतकऱ्यांचे सवाल*
"बंधाऱ्याचे बांधकाम उत्कृष्ट आहे तर त्याची एक बाजू का वाहून गेली? येथे दुबार पिके घेतली जातात तर जागा ओसाड का आहे? बंधारा ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर दाखवला आहे ते शेतकरी प्रत्यक्षात बंधाऱ्यालगतचे आहेत का? कागदावर असलेल्या ठिकाणीच बंधारा आहे का? आमची वाहून गेलेली भातशेती आणि फोटो खोटे आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी," असा सवाल गणपत हरड यांनी उपस्थित केला आहे.

"आमची बाजू सत्याची आहे, जीव गेला तरी मागे हटणार नाही," असा इशारा सोनूबाई हरड यांनी दिला असून, 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका हरड कुटुंबीयांनी घेतली आहे.

No comments:

Post a Comment

डहाणू तालुक्यातील हर्षित चुरीची दिल्लीपर्यंत भरारी !!

डहाणू तालुक्यातील हर्षित चुरीची दिल्लीपर्यंत भरारी !! ‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी पालघर जिल्ह्यातून निवड; संसद भवनासह विविध राष्ट्रीय व ऐति...