Saturday, 10 October 2026

केडीएमटी बाजीप्रभू चौक बस स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा; प्रशासन हतबल !!

केडीएमटी बाजीप्रभू चौक बस स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा; प्रशासन हतबल !!

*डोंबिवली :* डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस स्थानकाला अनधिकृत फेरीवाले आणि टपरीवाल्यांनी विळखा घातला असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

बस थांब्याच्या मागील आणि खालच्या बाजूला अनेक फुल विक्रेते आपले साहित्य ठेवून तिथेच बसून हार, गजरे, बुके बनवतात आणि स्थानकाच्या समोर विक्रीसाठी बसतात. ही जागा जणू स्वतःच्याच मालकीची असल्यासारखे त्यांचे वर्तन असून त्यांना हटवण्याची कोणाचीही हिंमत नसल्याचे चित्र आहे.

बस थांब्याच्या बाजूलाच काही टपऱ्या उभारून बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. केडीएमसीचे अतिक्रमण पथक त्यांना का हटवत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. या फेरीवाल्यांकडून हप्ता घेतला जात असावा आणि त्यांना काही राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असावा, अशी चर्चा आहे.

याबाबत केडीएमटी प्रशासनाला विचारले असता, "आम्ही केडीएमसीच्या फेरीवाला अतिक्रमण पथकाला वारंवार पत्र देतो, कारवाई करण्याचा अधिकार त्यांचाच आहे," असे सांगत त्यांनी असमर्थता व्यक्त केली.

या बस थांब्याजवळ दिवसभर दुचाकी पार्किंगही केले जात असून त्यामुळे बसेस थांबवण्यास अडथळा येतो. यावर केडीएमटीने वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या आणि पार्किंगमुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. बसेस वेळेवर येत नसल्याने आधीच त्रस्त असलेल्या एमआयडीसी निवासी भागातील प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आता एमआयडीसी प्रवासी संघटनेने जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

*प्रतिक्रिया :*

"आधीच केडीएमटीच्या बसेस वेळेवर येत नाहीत, अनेक बसेस सुस्थितीत नाहीत, वाटेत बंद पडतात. त्यात बस थांब्यावर फेरीवाल्यांचा त्रास. यावर आम्ही जनआंदोलन करून प्रशासनाला जाब विचारू."
*- राजू नलावडे, एमआयडीसी प्रवासी संघटना*

"बाजीप्रभू चौक बस थांब्याजवळ फेरीवाले आणि टपऱ्यांमुळे महिला प्रवाशांना उभे राहणेही सुरक्षित वाटत नाही. रात्री व्यसनी लोकांचा वावर वाढतो. अनधिकृत पार्किंगमुळे बसेस लावायला जागा मिळत नाही."
*- वर्षा महाडिक, प्रवासी, एमआयडीसी निवासी*

No comments:

Post a Comment

आधुनिक शिक्षण, दर्जेदार आरोग्यसुविधांसह सर्वसमावेश विकासाचा आराखडा तयार !!

आधुनिक शिक्षण, दर्जेदार आरोग्यसुविधांसह सर्वसमावेश विकासाचा आराखडा तयार !! *ठाणे, विनोद गिरी:* दिशा समितीच्या बैठकीत दिलेल्या नि...