*कल्याण (संजय कांबळे) :* कल्याण तालुक्यात यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. दुसरीकडे ७/१२ उताऱ्यावर चुकीच्या नोंदी झाल्याने न्याय न मिळाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कृषी विभागाच्या पीक पाहणी अहवालानुसार, तालुक्यातील एकूण ४ हजार ४५२ हेक्टर भात क्षेत्रापैकी ७५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये हळव्या भाताच्या २ हजार ११ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३४० हेक्टर क्षेत्राचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तसेच निमगरव्या भाताचे ९४३ हेक्टर आणि नाचणीचे ७० हेक्टर क्षेत्र पूर्णपणे खराब झाले आहे.
गोवेली, ठाकूरपाडा, आपटी, मांजर्ली, मानिवली, घोटसई, मामणोली, रायते आदी गावांमध्ये भातपीक जळून गेले आहे. ठाकूरपाडा येथील शेतकरी कै. गणपत लुखा हिंदोळे यांच्या शेतात तर पिकासोबत पेंडाही मिळेल की नाही, याची शाश्वती नाही, अशी परिस्थिती आहे.
कमी पाऊस, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि दुष्काळ अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय लालफितीचा कारभाराचाही फटका बसत आहे. बेलकरपाडा येथील शेतकरी भाऊ सावळाराम ताम्हाणे यांनी स्वतःच्या ७/१२ उताऱ्यावर चुकीच्या नोंदी घातल्याप्रकरणी कल्याण तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
ते सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांमध्ये तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment