*महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी अमिता कदम यांना ‘नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान*
नवी मुंबई, प्रतिनिधी : श्री धनलक्ष्मी महिला मंडळ, वाशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्त्री कला गौरव २०२६’ हा महिलांच्या कलागुणांचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा भव्य सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या माध्यमातून महिलांना कला, संस्कृती, उद्योजकता आणि विविध क्षेत्रांतील कौशल्ये सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
या कार्यक्रमात महिला उद्योजिका, नृत्य स्पर्धा, पारंपरिक लोकनृत्य, फॅशन शो, आदर्श शिक्षकांचा गौरव आणि पाककला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘चित्रांगणा’ या लघुपटाच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यास महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी आणि प्रसिद्ध नृत्यांगना मा. अमिता नितीन कदम यांना प्रमुख नृत्य परीक्षक म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील शेकडो महिलांनी आपल्या कलागुणांचे आणि कर्तृत्वाचे प्रभावी सादरीकरण केले. महिलांचा उत्साह, आत्मविश्वास आणि कलात्मकता पाहून अमिता कदम यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमिता कदम यांना श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने ‘नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे त्यांच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील कार्याचा गौरव झाला.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वनिता गडदे, सचिव वैशाली धनावडे आणि खजिनदार सुप्रिया साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘जी. एस. सिने एंटरटेनमेंट फिल्म्स टेलिव्हिजन अँड इव्हेंट्स ग्रुप’ यांचे सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभले, तर ‘सकाळ’ माध्यम पार्टनर म्हणून सहभागी झाले होते.
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मानित करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर अमिता कदम यांनी श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचे पदाधिकारी, आयोजक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
विशेष वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment