Saturday, 31 October 2026

धक्कादायक ! कल्याण तालुक्यातील १७४ एकर सरकारी गुरचरण जमीन बिल्डरांनी हडपली; महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि MMRDA कडे तक्रार !!

धक्कादायक ! कल्याण तालुक्यातील १७४ एकर सरकारी गुरचरण जमीन बिल्डरांनी हडपली; महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि MMRDA कडे तक्रार !!

*मौजे माणगाव, कोळे, काटई, घारीवली, संदप, उसरघर मधील घोटाळा; जुपिटर हॉस्पिटल, लोढा-रुणवाल बिल्डरला बेकायदेशीर विक्री केल्याचा भालचंद्र पाटील यांचा आरोप; चौकशीची मागणी*

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे :*

*डोंबिवली, दिनांक : ३१ ऑक्टोबर* कल्याण तालुक्यातील ६ गावांमधील तब्बल १७४ एकर २२ गुंठे सरकारी गुरचरण जमीन काही विकासकांनी संगनमताने हडप करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे जिल्हाधिकारी आणि MMRDA, बांद्रा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पत्रावर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा संदर्भ क्रमांक SKL/921/2026 देखील नमूद आहे.

*काय आहे प्रकरण?*

 मौजे माणगाव (सर्व्हे क्र. ७१, ७६/१, ७५), मौजे कोळे (७६/२, ७७), मौजे काटई (क्र. ९९), मौजे घारीवली (५५, ४३, ४२/१), मौजे संदप (२१/१ व २१/२) आणि मौजे उसरघर (९५, ९३, १०९) येथील ही जमीन मुळात सरकारी गुरचरण म्हणून नोंद होती. ती त्या-त्या गावच्या ग्रामपंचायतीकडे सार्वजनिक कामासाठी काही अटी-शर्तींवर दिली होती.

 १९६३ मध्ये प्रिमियर कंपनी लिमिटेड, कुर्ला यांनी तत्कालीन सरपंच यांच्याकडून ही सरकारी जमीन विकत घेतल्याचे फेरफार क्र. ६९५, ३७०, ३९८, २०६, ८२, ४९३ मध्ये दाखवण्यात आले. सरपंचाला सरकारी जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नसताना हा व्यवहार करण्यात आला. नंतर हीच जमीन प्रिमियर ऑटोमोबाईल लिमिटेडच्या नावावर करण्यात आली.

त्यानंतर २००७ मध्ये तहसीलदार कल्याण यांच्याकडील RTS दावा क्र. ५/०७ आणि नंतर उपजिल्हाधिकारी उल्हासनगर यांच्या आदेशाने या जमिनीवर ULC Act कलम २० व २१ अन्वये गृहबांधणी म्हणून शेरा मारण्यात आला, जो कायद्याने लागू होत नाही.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा (क्र. महसूल कक्ष-१/टे-७/ मौजे माणगाव, कोळे, घारीवली, काटई /वर्ग-१ रूपांतरण) १०% रकमेवर भोगवटदार-२ चा शेरा घेऊन, काही विकासकांनी संदर्भिय दस्त क्र. ९५७०/२०२२ नुसार

१) जुपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल तर्फे हर्षद पुराणी
२) होरायझन प्रोजेक्ट प्रा. लि. तर्फे डायरेक्टर संदीप सुभाष रुणवाल
३) सुंदर निवास LLP तर्फे उमेशकुमार उपाध्याय

यांना बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे.

सध्या या मोकळ्या जमिनीवर जुपिटर हॉस्पिटल उभारले असून, त्यातील पोलिसांची वसाहत, लोढा-मायक्रोटेक कंपनीने अनधिकृत सेल्स ऑफिस, निवासी व व्यावसायिक सदनिका बांधून लाखो रुपयांना विकल्याचा आणि काही भाग मेट्रो मार्गिकेसाठी भूसंपादित करून त्याचा मोबदला बिल्डरांनी लाटल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मौजे संदप व उसरघर येथे देखील सुंदर निवास प्रॉपर्टी व रुणवाल बिल्डरने अशाच प्रकारे सदनिका बांधून विक्री केल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर असून सर्व सरकारी गुरचरण जमीन पुन्हा शासनाच्या नावे करून सार्वजनिक हितासाठी मोकळी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

दिवाळीनिमित्त सुवर्णसंधी! आर्या फाऊंडेशन व लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था च्या वतीने स्वयंरोजगार मेळावा; फक्त ५१ हजारात टुरिस्ट कार !!

दिवाळीनिमित्त सुवर्णसंधी! आर्या फाऊंडेशन व लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था च्या वतीने स्वयंरोजगार मेळावा; फक्त ५१ हजारात टुरिस्ट कार !! ...