अहमदपूर, लातूर : ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि संस्कृती संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बलसंगी, ता. अहमदपूर, जि. लातूर येथील सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येत आहे.
शेतकरी कुटुंबातील कर्तव्यदक्ष गृहिणी असलेल्या सौ. कुलकर्णी या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात कुलदैवताच्या सेवेत भाविक महिलांना एकत्र आणून श्री दुर्गा सप्तशती पारायण, सामूहिक कुमकुमार्चन, देवीपूजन तसेच भजन-कीर्तनाचे आयोजन त्या नियमितपणे करतात. त्यांच्या या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आध्यात्मिक एकात्मता, धार्मिक श्रद्धा आणि संस्कारांची जपणूक होत आहे.
महिला मंडळाच्या माध्यमातून त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू समारंभ, महिला मेळावे, पारंपरिक स्पर्धा आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांचे यशस्वी आयोजन करतात. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संघटनशक्ती आणि सामाजिक सहभागाची भावना वाढविण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करतात.
महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि भारतीय परंपरा व संस्कृतीचे संवर्धन यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामीण भागात त्यांना यापूर्वी दोन वेळा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची निस्वार्थ समाजसेवा आणि आध्यात्मिक कार्य अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून त्यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे परिसरातील महिला वर्गाला सामाजिक कार्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment