Thursday, 19 November 2026

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*(दिपक मागाडे- प्रतिनिधी)*

*कल्याण, दि. :* रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने आज कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.

मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या संकल्पनेतून हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. आज सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकावर पथनाट्य आणि जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

उल्हासनगर येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी मधील ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या पथनाट्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. पथनाट्याच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातील धोकादायक सवयींमुळे होणारे अपघात आणि त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम यांचे वास्तव चित्र उभे करण्यात आले.

यावेळी हातात बॅनर्स व जनजागृतीपर फलक घेऊन प्रवाशांना महत्त्वाचे संदेश देण्यात आले :

- *रेल्वे रूळ ओलांडू नयेत,* नेहमी पादचारी पुलाचा (FOB) वापर करावा.
- *लोकल किंवा एक्सप्रेसच्या दरवाजात लटकून प्रवास करू नये,* जीव धोक्यात घालू नये.
- *सुरक्षित प्रवासाच्या नियमांचे* काटेकोरपणे पालन करावे.

कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नीलिमा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक वानखेडे, ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार उपस्थित होते.

तसेच, रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) १ अधिकारी व २ आरक्षक, ३ एमएसएफ (MSF) जवान, ३ होमगार्ड आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी कॉलेजचे ११ विद्यार्थी या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाले होते.

पथनाट्यानंतर संपूर्ण कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक प्रवाशांनी थांबून पथनाट्य पाहिले आणि सुरक्षित प्रवासाचे नियम पाळण्याचा संकल्प केला.

रेल्वे अपघातांमध्ये एकही मृत्यू होऊ नये, हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असून यापुढेही असे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...