.महापौर दालनात जनतेला NO ENTRY, बिल्डर-कंत्राटदारांना VIP ENTRY ?
*पत्रकारांना तासभर ताटकळत ठेवले, पतीने महापौरांना भेटण्यास दिला नकार; गिफ्ट घेऊन आलेले बिल्डर मात्र थेट बंद रूममध्ये*
*कल्याण-डोंबिवली (विनोद गिरी):*
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी (थविल) यांच्या दालनात पत्रकारांना भेट नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महापौरांचे पती विजय चौधरी यांनीच पत्रकारांना भेट घेऊन "काय बोलायचं असेल ते माझ्याशी बोला" असे सांगितल्याचा आरोप पत्रकार दीपक इंगळे यांनी केला आहे. तर दुसरीकडे गिफ्ट घेऊन आलेले बिल्डर आणि कंत्राटदार मात्र कोणत्याही परवानगीशिवाय थेट महापौरांच्या केबिनमध्ये जात असल्याचा धक्कादायक अनुभव पत्रकारांना आला.
सौजन्य महाराष्ट्र प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ नोव्हेंबर रोजी त्यांनी महापौर हर्षाली थविल यांना कॉल केला असता त्यांनी एकाही कॉलचे उत्तर दिले नाही. त्यानंतर दोन-तीन पत्रकार महापौर दालनात भेटीसाठी गेले. तिथे एक तास वाट पाहिल्यानंतरही भेट मिळाली नाही. अगोदर सांगण्यात आले की, मॅडम जेवण करतात.
त्यानंतर पत्रकार महापौर मॅडमच्या दालनामध्ये जाऊन बसले असता दालनाच्या बाजूला असलेल्या स्पेशल रूममधून एक पत्रकार बाहेर येताना दिसला. शिपायाला भेटू का असे विचारले असता तो "परमिशन नाही" असे म्हणाला.
थोड्याच वेळात काही बिल्डर्स / कंत्राटदार मोठमोठे गिफ्ट घेऊन आले आणि ते थेट महापौर मॅडमच्या केबिनमध्ये गेले. त्यांना कुठलीही परमिशन लागली नाही, असा आरोप पत्रकारांनी केला आहे.
शेवटी पत्रकारांनी शिपायाला विचारले की, मॅडम भेटणार आहेत का नाही? शिपाई आत रूममध्ये गेला आणि रूममधून बाहेर आले ते महापौर मॅडमचे पती विजय चौधरी. त्यांनी पत्रकारांना विचारले, "तुमचं काय काम आहे मॅडमकडे?" पत्रकारांनी "आम्हाला मॅडमशी काही मुद्द्यांवर चर्चा करायची आहे" असे सांगितले असता, पती म्हणाले, "काय बोलायचं असेल ते माझ्याशी बोला."
पत्रकारांनी नकार दिला असता, "मॅडम भेटणार नाहीत, दोन दिवस बिझी आहेत" असे सांगण्यात आले. आणि बाहेरून गिफ्ट घेऊन आलेल्या बिल्डर लोकांसोबत महापौर हर्षाली चौधरी व त्यांचे पती विजय चौधरी हे बंद रूममध्ये तासन्तास चर्चा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ नुसार महापौर पदाचे अधिकार हे केवळ निवडून आलेल्या व्यक्तीलाच आहेत. महापौर हे महानगरपालिकेतील घटनात्मक पद असून, त्या पदाचे अधिकार संबंधित निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याकडेच असतात. महापौरांच्या पतींना स्वतंत्रपणे महापौरांचे प्रशासकीय अधिकार वापरण्याचा अधिकार आहे का, तसेच अधिकृत दालनातील कामकाजात त्यांची नेमकी भूमिका काय, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज व्यक्त होत आहे.
लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या महापौरांच्या दालनात बसून जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी मॅडम स्पेशल रूममध्ये मीटिंग करतात का? जनतेने निवडून दिलेल्या महापौरांना भेटायला पत्रकारांना, जनतेला परमिशन लागते, पण बिल्डरांना का नाही? महापौरांच्या कामात त्यांचे पती का हस्तक्षेप करतात? असे संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.
महापौरांचे दालन हे जनतेचे दालन आहे की बिल्डरांचे खाजगी कार्यालय आहे? याचे उत्तर महापौरांनी द्यावे, अशी मागणी पत्रकार आणि नागरिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment