*कल्याण डोंबिवली दीपक इंगळे*
*डोंबिवली, दिनांक : १३ नोव्हेंबर :* डोंबिवलीत मुस्लीम समाजासाठी कब्रस्तान (दफनभूमी) करिता जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी डोंबिवली पश्चिम येथील जामा मशीद येथे मुस्लीम समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली.
१० नोव्हेंबर रोजी मोहने येथील वसी मुनिसा काझी यांच्या मृतदेहाच्या दफन विधीसाठी कुटुंबीयांना तब्बल दहा तास संघर्ष करावा लागला. कल्याण मधील दोन कब्रस्तानमध्ये दफनाची परवानगी नाकारण्यात आली होती. मोहने परिसरातील मुस्लीम समाजाच्या लोकांसाठी टिटवाळा येथे दफनभूमीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच डोंबिवलीमध्येही मुस्लीम समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध नाही.
कल्याण-डोंबिवलीत सुमारे दोन लाख मुस्लीम समाज असून या समाजाकरता स्वतंत्र दफनभूमी नाही. अनेक वर्षांपासून मुस्लीम समाज या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.
*बैठकीला मान्यवरांची उपस्थिती*
डोंबिवलीमध्ये मुस्लीम समाजासाठी दफनभूमी मिळावी या मागणीसाठी शुक्रवार, दि. १३ तारखेला डोंबिवली पश्चिम येथील जामा मशीद येथे झालेल्या बैठकीला काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष अॅड. नवीन सिंग, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महासचिव (महाराष्ट्र प्रदेश) शिबू शेख, ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, संकेत लोके, आजम शेख, सुजाता परब, अमोल गायकवाड, इम्रान शेख यांसह मुस्लीम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*"आयुक्तांकडे लवकरच बैठक होणार, मागणी पूर्ण होईल अशी आशा" - अॅड. नवीन सिंग*
यावेळी बोलताना काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष अॅड. नवीन सिंग म्हणाले, "याबाबत लवकरच आयुक्तांकडे बैठक होणार असून मला पूर्ण आशा आहे, मुस्लीम समाजाची ही मागणी पूर्ण होईल."
*"अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे" - शिबू शेख*
काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महासचिव शिबू शेख यांनी सांगितले, "आम्ही अनेक वर्षे डोंबिवलीमध्ये राहत असून आमच्या समाजासाठी दफनभूमी नाही, यासाठी आम्ही नाराज आहोत. प्रशासनाने व सरकारने मुस्लीम समाजाच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आम्ही कोणावरही टीका करत नसून ही आमची मागणी खूप वर्षांपासून प्रलंबित आहे. आमची प्रशासनाकडे विनंती आहे, ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी."
मृतदेहाच्या दफनासाठी १० तासांचा संघर्ष करावा लागल्याच्या घटनेमुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डोंबिवलीत तातडीने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बैठकीत एकमुखाने करण्यात आली.
No comments:
Post a Comment