Tuesday, 10 June 2025

वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा !!

वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा !!

* 'स्वदेशी विचार' व 'नागरिक कर्तव्य' यांचा जागर

वाडा / प्रतिनिधी : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक संस्था वाडा येथे प्रेरणादायी वातावरणात "शिवराज्याभिषेक दिन विशेष कार्यक्रम" पार पडला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा संकल्पनेतून पार पडलेल्या सदर कार्यक्रमाचे देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे उद्घाटन करून त्यांनी दिलेला संदेश तसेच विभागाच्या सचिव  मनीषा वर्मा यांचा संदेश सर्व उपस्थित लोकांना ऐकविण्यात आला. 

या कार्यक्रमात मनीष देहेरकर  यांनी "स्वदेशी विचारांचा स्वीकार" या विषयावर तर शिव व्याख्याते स्वप्नील पाटील यांनी "नागरी कर्तव्य व शिष्टाचार" या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उद्योजक मिलिंद वाडेकर, विक्रांत काळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गट निर्देशक प्रिती वाणी तर सूत्रसंचालन श्री. सोनवणे यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्यात अनाधिकृत सीडी हटवण्याकरिता करावे लागत आहे अन्न त्याग उपोषण !!

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्यात अनाधिकृत सीडी हटवण्याकरिता करावे लागत आहे अन्न त्याग उपोषण !!

ठाणे, प्रतिनिधी :
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष ठाणे शहर युवा आघाडी, पँथर साईनाथ खरात व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सुनीता शेट्टी ह्या दिनांक 12 जून 2025 रोजी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे थांबवण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी हे संविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सुनील पांडे नामक व्यक्तीने सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात अनधिकृतपणे सीडी उभारलेली असून, याविरोधात सुनिता शेट्टी आणि पँथर साईनाथ खरात यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या. परंतु माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राजकुमार यादव यांच्या राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या कार्यकाळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पॅंथर साईनाथ खरात यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ रोजी अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील पांडे यांनी आपल्या पत्नी आणि नात्यातील महिलांमार्फत कारवाई रोखण्यासाठी पेट्रोलसहित आत्मदहनाचा कट रचल्याचे आरोप आहेत, तरीदेखील संबंधितांवर अजून कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी न्यायालयाने सुद्धा महापालिका विधी विभागामार्फत D.P.L. ची प्रतिक्रिया करून कारवाई करण्याचे आदेश दिले असूनदेखील प्रभाग समिती अजूनही निष्क्रियच आहे. म्हणूनच निष्क्रीय प्रशासन आणि दबावाच्या व पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर प्रस्थापित राजकीय लोकांचं ऐकणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पँथर साईनाथ खरात सुनिता शेट्टी व स्थानिक रहिवासी यांनी संविधानिक मार्गाने अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मी फुले, शाहू आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा, एक छोटासा कार्यकर्ता व छोटासा पत्रकार असल्यामुळे आजवर मला योग्यरिते न्याय मिळाला नसल्याचा आरोप खरात यांनी निवेदनात केला.

परंतु एमपीएससी दर्जाचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त श्री सोमनाथ बनसोडे योग्यरीत्या कारवाई करतील अशी आशा देखील खरात यांनी व्यक्त केली आहे.

Monday, 9 June 2025

भारतीय जनता पार्टी आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

भारतीय जनता पार्टी आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : दिनांक ८ जून २०२५ रोजी वॉर्ड क्र. ११७ मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीवर्षा निमित्त १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टी व श्री. रविंद्र नारायण कदम (माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, ईशान्य मुंबई) यांच्या आयोजनाखाली डी.ए व्ही. कॉलेज, सभागृह, भांडुप (पूर्व) याठिकाणी यशस्वीरित्या पार पडला.

     या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष मा. दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी आमदार मा. मंगेश सांगळे, माजी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, श्री युवराज मोरे जी अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष, विक्रोळी विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. रजनी रविन्द्र कदम ताई, विक्रोळी पूर्व मंडळ अध्यक्ष केतकी सांगळे, सौ श्रुती घोगळे वॉर्ड अध्यक्ष - ११९ आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती व प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.  

    याप्रसंगी  विद्यार्थ्यांना एम. आर क्लासेसचे मर्विन सर यांचे मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात कांजूरमार्ग (पूर्व) परिसरातील जवळपास २५० गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
    सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी वॉर्ड अध्यक्ष सचिन करंजे, मंडळ अध्यक्ष अमोल पोखरकर, युवा वॉर्ड अध्यक्ष अभिषेक ढोले, जिल्हा पदाधिकारी स्नेहा जंगम, प्रवीण सरवणकर, संदीप फगरे, महेश चव्हाण, नरेश चव्हाण, वीरेंद्र महाडिक, सुनील जोशीलकर, धनंजय देऊळकर, जोतिबा जाधव, दशरथ घेवडे, किशोर जोशी, प्रीती जैन, जागृती नर, प्रणाली जाधव, सरोज विश्वकर्मा, गणपत भणगे, रितेश आजगावकर, राज विचारे, राहुल तिवारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Saturday, 7 June 2025

श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान !!

श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चा भव्य प्रस्थान सोहळा आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान आणि श्री संत रोहिदास सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासासाठी रवाना झाली. ही दिंडी १९७८ साली संस्थापक ह.भ.प. पांडुरंग कारंडे महाराज (कराडकर) यांनी सुरू केली. यंदा या पंढरपूर वारीच्या ४८ व्या वर्षाचे औचित्य साधण्यात आले आहे. परंपरेने जोपासलेली ही आध्यात्मिक वारी आजही श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने तेवढ्याच निष्ठेने पार पाडली जात आहे.

            प्रस्थानप्रसंगी दिंडीप्रमुख ह.भ.प. चंद्रकांत कारंडे, पांडुरंग प्रतिष्ठानचे डॉ. शांताराम कारंडे, तसेच दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नारायण पाटील महाराज यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्याचे रोजगार व कौशल्य मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी देखील या दिंडीस साक्षीदार होत उपस्थिती दर्शवली, यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. मुंबईतील विविध भागांतून आलेल्या शेकडो वारकरी भक्त टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात, विठूनामाच्या अभंगगायनात सहभागी होत पायी वारीस प्रारंभ केला.

              दिंडीचा पहिला मुक्काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वडाळा येथे झाला असून, पुढील मुक्काम अनुक्रमे धारावी काळा किल्ला, मानखूर्द, आणि वाशी येथील जागृत शिवमंदिर येथे असणार आहेत. एक महिन्याच्या या भक्तिमय प्रवासानंतर दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे पोहोचणार आहे. ऊन, वारा, पावसाचे आव्हान स्वीकारत, प्रेम, निष्ठा आणि समर्पणाने ही वारी पुढे सरकते. ही केवळ पायी वारी नाही, तर ती एक आध्यात्मिक चैतन्ययात्रा आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट...” या गजरात आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात भक्त हरवून जातात. श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबईतील सर्व भाविक भक्तांना या दिंडीत सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Friday, 6 June 2025

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !!

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) विभागात राहणाऱ्या लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजी रस्त्यावर राहात होत्या. त्यांच्याकडे झोपायला सुद्धा जागा उपलब्ध नव्हती. त्यांचा सांभाळ करायला किंवा काळजी घ्यायला कोणीच नाही अशी माहिती शिवसेना शाखा क्र. ६६च्या उप महिला संघटिका श्रद्धा वाल्मिकी व गटप्रमुख धर्मराज यांना मिळाली. त्यानंतर लता ताईंची व्यथा शाखेवर येऊन सांगितले. त्यांची अडचण लक्षात घेऊन मीनाली पाटील (शाखा संघटिका) यांनी लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) यांना विरार येथील मराठा फॉउंडेशन विरार पूर्व या आश्रमात घेऊन जाण्याचा व तेथे त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करून सहारा दिला. या विभागाचे विधानसभा संघटक श्री. संजय मानाजी कदम व उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, उदय महाले (शाखाप्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेनेच्या पक्षाच्या आशीर्वादाने हे काम पार पडले असे मत यानिमित्ताने बोलताना मीनाली पाटील (शाखा संघटिका) यांनी व्यक्त केले.

🌳वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला ☀️ उत्स्फूर्त प्रतिसाद – निसर्गाशी जोडणारा अनुभवात्मक उपक्रम !!

🌳वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला ☀️ उत्स्फूर्त प्रतिसाद – निसर्गाशी जोडणारा अनुभवात्मक उपक्रम !!

वाडा, प्रतिनिधी : वनशक्ती संस्थेमार्फत दिनांक १६ ते २० मे २०२५ या कालावधीत ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते.

या शिबिरात मुलांनी भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून हस्तकला तयार करणे, सकाळी ध्यानधारणा करणे व पक्षीनाद निरीक्षण, नदी परिसंस्थेचा अभ्यास, जलशुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती, वनस्पती व कीटक निरीक्षण, तसेच स्थानिक रोपवाटिकेला भेट देणे असे अनेक उपक्रम राबवले गेले. रोपवाटिकेत कंपोस्ट निर्मिती, रोपांची लागवड व कुंडी सजावटीचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

कॅम्पच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना डोंगर व तलाव परिसरात निसर्गभ्रमंती घडवण्यात आली. या भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी साग, पळस, कोशिंबे, आळवे, यासारख्या झाडांचे निरीक्षण केले. तसेच कोकीळ, किंगफिशर, बुलबुल व कोतवाल यांसारख्या पक्ष्यांचे आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला. जलस्रोतांचे महत्त्व समजून घेत, त्यांनी गोळा केलेल्या बियांपासून डोंगरावर वृक्षारोपणही केले.

शिबिराच्या अंतिम दिवशी शंख, शिंपले, दगडांवर चित्रकला आदी हस्तकला सत्र आयोजित करण्यात आले. त्यानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. समारोपप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

निसर्गभ्रमंतीचे मार्गदर्शन वनशक्तीचे प्रकल्प अधिकारी निशांत पाटील आणि योगिता कासार यांनी केले.

वनशक्ती संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे आणि भविष्यातही असे उपक्रम राबवणार आहेत.

📰 *जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकीवली फाटा येथे राबवली मोहीम*

📰 *जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकीवली फाटा येथे राबवली मोहीम*

*** तानसा नदी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वनशक्ती संस्था | प्रतिनिधी

5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकिवली फाटा तानसा नदी परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून *सुमारे 400 किलोहून अधिक कचरा उचलण्यात आला.* प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, फाटके कपडे, काच, बाटल्या यांसारख्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यात आल्या.

ही मोहीम वनशक्ती संस्था, वनविभाग अंबाडी, कुणबी समाज संस्था ठाणे/पालघर जिल्हे, सुखभूमी संस्था, तसेच कृषी विभागाचे मा. श्री. संजय घरत साहेब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आली. वनशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. निशांत पाटील आणि योगिता कासार मॅडम यांच्या पुढाकाराने व नियोजनाने ही मोहीम यशस्वी झाली.

विशेष म्हणजे या उपक्रमात चांबळे गावांमधील शाळेतील 25 पेक्षा जास्त विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी नदीकाठचा कचरा उचलणे, इतर नागरिकांना जनजागृतीवर संदेश देणे.

एकूण ४० पेक्षा अधिक स्वयंसेवक व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला. स्थानिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...