Sunday, 31 May 2026

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

ठाणे, प्रतिनिधी :
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवाती चे वातावरण हलके-फुलके आणि संवादात्मक करण्यासाठी "आइस ब्रेकिंग गेम" ने करण्यात आली. "Passing the Sentence" या खेळामध्ये एका महिलेच्या कानात एक वाक्य सांगण्यात आले आणि तेच वाक्य पुढील सहभागीच्या कानात सांगण्यास सांगितले गेले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्या वाक्यात झालेला बदल सर्वांसमोर मांडण्यात आला. या उपक्रमातून माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्यामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, याची जाणीव सहभागी महिलांना करून देण्यात आली,ह्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पवन जोहारे  ह्यांनी ही माहिती दिली.

जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील महिला, मुले आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल बनसोडे ह्यांनी सागितले.

कार्यक्रमाच्या मुख्य सत्रामध्ये संस्थेच्या सदस्या अस्मिता कहाळे यांनी महिलांशी संवाद साधत मासिक पाळीविषयी चर्चा सुरू केली. त्यांनी उपस्थित महिलांना आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळीची पहिली तारीख, तसेच पाळीबाबतची पहिली माहिती त्यांना कोणी दिली, असे प्रश्न विचारून विषयाची सुरुवात केली. या संवादातून महिलांच्या अनुभवांना वाव मिळाला आणि अनेकांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले.यानंतर त्यांनी मासिक पाळीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीची सुरुवात कशी होते, मासिक पाळीचे चक्र कसे असते, पाळी किती दिवस येणे सामान्य मानले जाते, तसेच सॅनिटरी पॅडचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच मासिक पाळी ही कोणतीही लाजिरवाणी किंवा वाईट गोष्ट नसून ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांनी आणि मुलींनी या विषयाबाबत खुलेपणाने बोलणे आणि योग्य माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेशही देण्यात आला, महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्तन कर्करोग (Breast Cancer) यावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, त्याची वेळेत ओळख का महत्त्वाची आहे, तसेच महिलांनी स्वतः घरच्या घरी स्तनांची तपासणी कशा प्रकारे करावी याबाबत माहिती देण्यात आली. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास स्तन कर्करोगावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते, याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली,अशी माहिती अस्मिता कहाले यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी शंकांचे निरसन करून घेतले. महिलांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम समाजात आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत संस्थेची सदस्य श्वेता पाटील ह्यांनी व्यक्त केले. अशी माहिती सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय भोसले यांनी दिली.

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र  वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

“जागतिक संधींसाठी सक्षम आणि उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय” – संचालिका संगीता पाटील

जळगाव, दि. 30 मे 2026 (राहुल बैसाणे) :
एन. आय. एफ. ग्लोबल - संगीता अकॅडेमी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाळा काळे व संचालिका संगीता पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे महत्त्व व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी उद्योग उभारावेत व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले, तसेच बोलताना सावकारे यांनी जळगावसारख्या शहरात एन. आय. एफ. ग्लोबलसारखी संस्था कार्यरत असून येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. गेल्या 21 वर्षांत संस्थेने 15 हजारांहून अधिक विद्यार्थी घडविले असून, त्यापैकी अनेकांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॅक्मे फॅशन वीक, लंडन फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीक यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठांवर जळगावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून शहराचे नाव देश-विदेशात पोहोचविले असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात करिअरच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी एन. आय. एफ. ग्लोबल- संगीता अकॅडेमीच्या कार्याचे तसेच संस्थेचे शिक्षकवृंद व संचालिका संगीता पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे असून त्यांना मोठी प्रेरणा देतात, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी अकॅडेमीच्या 21 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर उद्योगक्षेत्राशी जोडणारे व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इंटिरियर डिझाईन मधून मुकेश तोष्णीवाल, योगिता शर्मा, रितेश तुलसाणी, चार्मी नथाणी, विराज पटेल, पार्थ पटेल, अक्षता बखतवाणी, फिल्झा शेख, मयूर जाधव,सप्रसाद अकोले, जयेश जैन, पूजा बोरसे, अंजली जोशी, रुपेश पाटील, प्रफुल चौधरी, रितू मकडीया, कोमल ओझा, खुशी डहाळे, मयूर हिंगे, आचल बयास, झैन पटेल, शुभांगी वानखेडे, शारिक हुसेन, विवेक दांडगे, मानस जैन, चचंल साहित्या, तन्मय बेलोकार, खुशबू पाटील, चैताली चौधरी, रिया चोथवे, निशांत चवराई, विवेक सपाटे, शुभम गोरे, विशाल मधयानी, आयुष पटेल, विवेक सोनार, प्रज्वल अग्रवाल, रोहित साहनी, कार्तिक पटेल, पूजा पाटील, कार्तिक जैन, हर्षल सिखवाल आणि फॅशन डिझाईन मधून स्नेहा मोरे, मयुरी बोहरे, शेजल गोपालदास, मानसी मलिचकर, रुणाली पाटील, तानिया कुकरेजा, भुवनेश्वरी करंकाल, दिव्यानी देशमुख, कोयल कोळी, स्नेहल ब्राह्मणकर, अरुण अर्जुन भिल, केसर जोशी, नेहा देसले, भाग्यश्री ठाकूर, अनम अन्सारी या गुणवंत विद्यार्थ्यांना “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी जैन व तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सेदुलक्ष्मी मलबारी यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला असून, जळगावच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या यशाचा अभिमान व्यक्त करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला.

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण !

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण !

“ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — नाराज गटाच्या भूमिकेचेही केले स्वागत

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) ::पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुरू झालेल्या वाद आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी पत्रकार आणि वृत्तवाहिन्या शी बोलताना प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आपली नियुक्ती ही कोणत्याही शिफारस किंवा वशिल्यामुळे नसून पक्षातील अनुभव, कार्यकर्तृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जनभावनेच्या आधारे झाल्याचा दावा त्यांनी केला.
             श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेल तसेच उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेस पक्षाकडून तिन्ही ठिकाणांसाठी जिल्हाध्यक्ष पदाकरिता अर्ज प्रक्रिया जाहीरपणे राबविण्यात आली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी रायगड आणि पनवेल परिसरात निरीक्षण दौरे आणि इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या प्रक्रियेनंतरच पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या नियुक्तीमागे कोणत्याही नेत्याची शिफारस किंवा वशिला नाही. पक्ष संघटनेतील कामाचा अनुभव, सातत्याने केलेले कार्य आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून मला ही जबाबदारी मिळाली आहे,” असे श्रुती म्हात्रे यांनी म्हटले आहे.
              पनवेल काँग्रेसमधील नाराज गटाने मुंबईतील ‘टिळक भवन’ येथे जाऊन निवडीविरोधात आक्षेप नोंदविल्याबाबत बोलताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. “प्रत्येकाची महत्वाकांक्षा वेगळी असते. त्यामुळे काही कार्यकर्ते टिळक भवन येथे गेले असतील. मात्र, ते माझेच बंधू आहेत. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. न्याय जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” असे त्या म्हणाल्या.


चौकट:

“रीचेकिंगनंतरच निकाल अधिक स्पष्ट होतो”-
            सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी, “रीचेकिंगनंतरच निकाल अधिक चांगला समजतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर काही बदल किंवा निर्णय झाले, तर त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल,” असे सूचक वक्तव्य केले. तसेच निषेधाच्या माध्यमातून काही लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. “२० मे रोजीच आम्हाला पदांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मला भेटून गेले होते,” असा दावा त्यांनी केला.


चौकट:

पदभार स्वीकारल्यानंतर आंदोलनात सहभाग-

           श्रुती म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आयोजित करण्यात आले. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. “पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही एकत्रितपणे आंदोलन केले. संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला !!

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
 नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे अवैध हातभट्टीवर धडक कारवाई करत दोन तासांच्या अंतराने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६२ वर्षीय हिरामण काशिनाथ म्हात्रे याला दोन्ही गुन्ह्यांत आरोपी करण्यात आले आहे. 

पहिली कारवाई दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली. रवि दामोदर म्हात्रे यांच्या मालकीच्या जागेत, चाणजेगाव येथे हिरामण काशिनाथ म्हात्रे हा गावठी दारू गाळताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११५७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून २०० लिटर क्षमतेचे ८ निळे ड्रम, त्यात गूळ-पाणी मिश्रित अंदाजे २०० लिटर द्रावण, अल्युमिनीअमची टाकी, खुंडी, पातेले, लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हिरामण म्हात्रे याने सदरचे काम रवि दामोदर म्हात्रे याच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली. रवि म्हात्रे अद्याप फरार आहे.

त्यानंतर अवघ्या दोन तासांनी, रात्री ८:४० वाजता त्याच जागेवर पुन्हा छापा टाकण्यात आला. यावेळी हिरामण म्हात्रे हाच अनिल म्हात्रे याच्या सांगण्यावरून दारू गाळताना आढळला.गु.र.नं. १५८/२०२६ अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी २०० लिटरचे ७ ड्रम, गूळ-पाणी मिश्रित द्रावण, अल्युमिनीअम टाकी, स्टील टाकीचा लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा २७,५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अनिल म्हात्रे फरार आहे.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने आरोपी हिरामण म्हात्रे याला बीएनएसएस ३५(३) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले. दोन्ही घटनास्थळी वपोनि अनिल पाटील, पोउपनिरी अभिजीत देशमुख व गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. सपोनि राजेश खांदवे हे तपास अधिकारी आहेत.

एकाच रात्री, एकाच जागेवर, एकाच आरोपीला दोन वेगवेगळ्या मालकांसाठी दारू गाळताना पकडल्याने उरण तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे पुन्हा चर्चेत आले आहे. गुन्हे शाखेच्या सलग कारवाईमुळे हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत

महिलांच्या विविध समस्यांबाबत रूचिता नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांची घेतली भेट....

महिलांच्या विविध समस्यांबाबत रूचिता नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांची घेतली भेट....

नालासोपारा ता, ३० :- बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी नालासोपारा शहरातील विविध प्रभागातील महिलांना घेऊन आज महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट देऊन आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. त्यांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांमार्फत तातडीने पाठपुरावा करून लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी असून नालासोपारा शहराचा सर्वांगीण विकास आणि सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बहुजन विकास आघाडी कटिबद्ध आहोत.

एन आर सी कामगारांचा नव्या कराराला तीव्र विरोध !!

एन आर सी कामगारांचा नव्या कराराला तीव्र विरोध !!

"200 कोटींची भीक नको, न्याय हक्क हवा" – कामगारांचा निर्धार

कल्याण, संदीप शेंडगे : मुंबई येथे पार पडलेल्या मॅनेजमेंट आणि कामगार युनियन यांच्या बैठकीत कामगारांसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याचे वृत्त समोर आले होते. एन.आर.सी कंपनीतील नव्या वेतन कराराविरोधात कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकजूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच महादेव मंदिर यादव नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या बैठकीत शेकडो कामगार उपस्थित होते नव्या कराराचा निषेध करत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत उपस्थित कामगारांनी "200 कोटींची भीक नको, आमच्या हक्कांचा योग्य मोबदला द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नव्या करारामुळे कामगारांचे आर्थिक आणि सेवा विषयक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक वर्षे वाट पाहून कामगारांच्या पदरात जर काहीच पडत नसेल तर असा करार काय कामाचा असा सवाल कामगार नेते भीमराव डोळस माजी नगरसेवक जे.सी कटारिया शाहीर अर्जुन पाटील, अविनाश नाईक या कामगारांनी उपस्थित केला

कामगारांनी एन आर सी मजदूर संघावरही गंभीर आरोप करत संघटनेच्या भूमिकेमुळे कामगारांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. "कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी संघटनेने व्यवस्थापनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून त्यामुळे हजारो कामगारांची वाट लागली आहे," अशी टीका बैठकीत करण्यात आली.

विशेष म्हणजे या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या प्रतिमा झळकत होत्या. कामगारांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

कामगार नेत्यांनी सांगितले की, कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही करार स्वीकारला जाणार नाही. आगामी काळात मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी विविध बैठका घेण्यात येणार असून सर्व कामगारांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

Thursday, 28 May 2026

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध !

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध !

अदानी समूहासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या वीस वर्षापासून मोहने येथील एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना अद्याप त्यांची हक्काची देणी मिळालेली नाहीत. एनसीएलटी कोर्ट मुंबई आणि दिल्ली येथे कामगार न्यायालयात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कामगारांच्या बाजूने लढा देत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. 

कामगार युनियन च्या माध्यमातून कामगारांची देणी देण्यासंदर्भात कामगारांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथे एन.आर.सी युनिट अदानी व्यवस्थापना सोबत पार पडलेल्या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार विरोधी करार पाहून शुक्ला यांनी या कराराला विरोध केला. 

या नवीन करारानुसार  कामगारांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट करत शुक्ला यांनी कराराला कडाडून विरोध केला. प्रतिनिधी म्हणून एस शुक्ला उपस्थित असल्याने घडलेला प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या बैठकीमुळे कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू लागली आहे. तसेच हा करार संगनमताने झालेला असून कामगार विरोधी असल्याचे कामगारांचे मत कामगारांनी व्यक्त केले. आयटक आणि एनआयसी मजदूर संघ यांनी केलेला करार हा सर्वसामान्य कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असून, यामध्ये कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस भूमिका आणि कामगारांचे हित नसल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. इतकी वर्ष वाट पाहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा करार आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी सांगितले

दरम्यान, कामगार नेते भूषण सामंत यांच्या नेतृत्वावर कामगारांनी मोठा विश्वास व्यक्त करत अनेक कामगार संघटना भूषण सामंत यांच्या युनियनच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. “कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणारे नेतृत्व म्हणून भूषण सामंत यांच्यावर आमचा विश्वास आहे,” अशी भावना अनेक कामगारांनी व्यक्त केली. 

भूषण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती एन.आर.सी. कामगार नेते अरविंद पाटील आणि शाहीर अर्जुन पाटील, निलेश पाटील, वासुदेव पाटील, गौतम भंडारी, भगवान पाटील, अरुण पाटील. यांनी दिली.
त्यामुळे आगामी काळात एन.आर.सी. परिसरातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...