Sunday, 1 November 2026

उरण बायपास रस्त्यासाठी केलेल्या संघर्षाची अखेर फलश्रुती; गोपाळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!

उरण बायपास रस्त्यासाठी केलेल्या संघर्षाची अखेर फलश्रुती; गोपाळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!

** विविध मान्यवरांची उपस्थिती; सामाजिक आणि विकासकामांतील योगदानाचा गौरव

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : उरणच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तसेच उरण शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करताना उरण ते मोरा या मार्गावर बायपास रस्त्याची संकल्पना सुचली. या बायपास साठी अनेक संघर्ष केला. आज ते पूर्णत्वास आले. अजूनही पुढे काम करायचे आहे. बायपास रस्त्याचे खरे श्रेय मंत्री सुनील तटकरे,सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना आहे. त्यांच्यामुळेच हे बायपास रस्त्याचे काम झाले आहे. या मध्ये पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. पत्रकारांनी शेवटपर्यंत हा मुद्दा उचलून धरून पूर्णत्वास नेला. त्यांचीही भूमिका महत्वाची राहिली आहे असे सांगत सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी ज्यांनी ज्यांनी बायपास रस्त्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे योगदाना बद्दल गौरवोदगार काढले.

उरण बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष, पाठपुरावा आणि प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते  गोपाळराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा उरण बायपास रोड, कोटनाका येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी गोपाळ पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उरण बायपास रस्त्याचे काम २०१८ च्या पूर्वीचे आहे.विविध पाठपुरावा यासाठी करावा लागला. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा.असे आवाहनही गोपाळ पाटील यांनी केले यावेळी त्यांनी उरण बायपास रस्त्याचा ईतिहास सांगितला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती भावनाताई घाणेकर आणि उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गोपाळराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष भावना घाणेकर,पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे,ऍड विजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या पत्नी रेश्मा पाटील,कॉम्रेड भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, चेस असोसिएशन अध्यक्ष संदीप पाटील,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, शिक्षक नेते दा.चा. कडू,सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील,कामगार नेते रवि घरत,नगरसेविका प्रमिला पवार,माजी सरपंच मानसी पाटील,महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि उरण परिसराच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.भावना घाणेकर, भूषण पाटील, विजय पाटील, महेश म्हात्रे, संतोष पवार आदी मान्यवरांनी गोपाळ पाटील यांच्या आजपर्यंतच्या कार्याचे उल्लेख करत बायपास रस्त्याचा इतिहास उलगडून सांगितला.व गोपाळ पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उरण बायपास रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोपाळराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. २००८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील तसेच संबंधित लोकप्रतिनिधींकडे त्यांनी लेखी मागणी करून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर २०१० मध्ये सिडकोकडून सुमारे २८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर होऊनही काही कारणांमुळे काम रखडले. २०१६ मध्ये पुन्हा पाठपुरावा करत उपोषण आणि नोटिसांच्या माध्यमातून प्रश्नाला वाचा फोडण्यात आली. २०१८ मध्ये या कामासाठी ४२ ते ४५ कोटी रुपयांची किंमत निश्चित झाल्यानंतरही काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर २०२६ मध्ये सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळून पुलाचे काम पूर्ण झाले आणि तो जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाला.

या प्रवासात आलेल्या अडचणी, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला. एखाद्या सार्वजनिक विकासकामासाठी जिद्द, चिकाटी आणि लोकहिताची भावना किती महत्त्वाची असते, याचे उदाहरण गोपाळराव पाटील यांच्या कार्यातून समोर आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन उरण सामाजिक संस्था – सुधाकर पाटील (माजी आय आर एस ), आधार सावली फाउंडेशन – रेश्मा म्हात्रे, उरण उत्कर्ष समिती – दीपक गावंड, युवा सामाजिक संस्था व जासखार अध्यक्ष हर्षल ठाकूर तसेच उरण तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केले.

या सोहळ्यामुळे उरणच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताच्या कामांना प्रोत्साहन देणारा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पोहोचला. उपस्थित नागरिकांनी गोपाळराव पाटील यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवली पूर्व प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांसाठी मोफत दिवाळी साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न…

डोंबिवली पूर्व प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांसाठी मोफत दिवाळी साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न…

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे : *

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण…आणि हा आनंद आपल्या परिसरातील प्रत्येक कुटुंबासोबत वाटून घेण्याची परंपरा जपत, प्रभाग क्र. २८ मधील नागरिकांसाठी मोफत दिवाळी साहित्य वाटपाचा उपक्रम दिनांक ३१/१०/२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभागातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा आपुलकीचा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळी साहित्याचे किट घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि समाधानाचे भाव हे या उपक्रमाचे खरे यश ठरले. हा सोहळा केवळ दिवाळी साहित्य वाटपाचा नव्हता…

तो होता माणुसकीच्या नात्याचा, जिव्हाळ्याचा आणि आपल्या माणसांशी असलेल्या अतूट आपुलकीचा उत्सव ! प्रभागातील नागरिक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, एकमेकांच्या सोबत उभे राहतात. म्हणूनच आजचा हा संपूर्ण परिसर जणू एका मोठ्या कुटुंबासारखा भासत होता. कुठे आनंदाने भेटणारे नागरिक, कुठे आपुलकीने संवाद साधणारे चेहरे, तर कुठे दिवाळीची भेट हातात घेऊन समाधानाने घरी परतणारे कुटुंबीय… या प्रत्येक क्षणातून “आपण सगळे एकत्र आहोत” ही भावना प्रकर्षाने जाणवत होती.
प्रत्येक घरात दिवाळीचा प्रकाश प्रत्येक चेहऱ्यावर आनंदाची झळाळी…आणि प्रत्येक मनात आपुलकीची भावना…हीच आपल्या प्रभागाची खरी ओळख आहे.

दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त आपल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहता आला, त्यांच्या सुखात सहभागी होता आले आणि “आपण एका कुटुंबाचा भाग आहोत” ही भावना पुन्हा एकदा अनुभवता आली, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो?
आपल्या माणसांसाठी, आपल्या प्रभागासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद वाटण्याची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहील.

सर्व नागरिक बंधू-भगिनींना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

डोंबिवलीतील Zepto स्टोअरमध्ये एक्स्पायरी पदार्थ, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री?; योगेंद्र भोईर यांची पोलिस, FDA कडे तक्रार, चौकशीची मागणी !!

डोंबिवलीतील Zepto स्टोअरमध्ये एक्स्पायरी पदार्थ, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री?; योगेंद्र भोईर यांची पोलिस, FDA कडे तक्रार, चौकशीची मागणी !!

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे*


*डोंबिवली, दिनांक : ३१ ऑक्टोबर :* डोंबिवली पूर्व, म्हात्रे नगर येथील ठाकूर वडापाव समोरील Zepto स्टोअरमध्ये गंभीर अनियमितता सुरू असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते तथा योगेंद्र भोईर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेंद्र भोईर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार करून तातडीने तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मागील दोन-तीन दिवसांपूर्वी सदर Zepto स्टोअरमध्ये काम करणाऱ्या ६० पैकी काही तरुणांनी भोईर यांच्याकडे तक्रार केली होती. स्टोअरमध्ये एक्स्पायर झालेले खाद्यपदार्थ विकले जातात, कर्मचाऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, दुखापत झाल्यास कोणतीही प्रथमोपचार सुविधा नाही आणि पदार्थांमध्ये आळ्या आढळल्याची तक्रार केल्याने काही मुलांना कामावरून काढून टाकण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी भोईर हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्टोअरमध्ये गेले असता, स्टोअर मॅनेजरने त्यांना आत जाण्यास व माहिती देण्यास नकार दिला. त्या ठिकाणी पाहणी केली असता खाद्यपदार्थ विक्री होणाऱ्या स्टोअरमध्येच सिगारेट, रिझला रोलिंग पेपर आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा व विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा भोईर यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनापुढे काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खाद्यपदार्थ विक्री होणाऱ्या स्टोअरमध्ये अमली पदार्थ विक्रीस FDA ची परवानगी आहे का? खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी सामान्य नागरिकाला प्रवेश नाकारण्याची शासनाची कोणती पॉलिसी आहे का? ज्या इमारतीत शाळा, क्लासेस आहेत, त्याच इमारतीत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस परवानगी आहे का?

सदर स्टोअरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अनधिकृत साठवणूक व विक्री होत असल्यास त्याचा सार्वजनिक आरोग्यावर, विशेषतः तरुण पिढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्टोअरची तातडीने तपासणी करून सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री संदर्भातील COTPA कायदा २००३ व महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनांचे पालन होते का, याची तपासणी करावी आणि उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी भोईर यांनी निवेदनात केली आहे.

वंचितांच्या चेहऱ्यावरील हास्यात साजरा केला वाढदिवस; अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांचा अनुकरणीय उपक्रम !!

वंचितांच्या चेहऱ्यावरील हास्यात साजरा केला वाढदिवस; अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांचा अनुकरणीय उपक्रम !!

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे :*

*कल्याण, दिनांक : ३१ ऑक्टोबर :* वाढदिवस म्हटले की मोठा केक, मित्रमंडळी आणि जल्लोष असे चित्र असते. मात्र हा साचा मोडत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत व यांत्रिकी) प्रशांत भागवत यांनी आपला ५६ वा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला आहे.

कल्याण पश्चिमेतील डंपिंग ग्राउंड परिसरात कष्ट करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. तेथील चिमुकल्यांचे बालपण अनेक सुविधांपासून वंचित आहे. या मुलांच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने भागवत यांनी अनुबंध सामाजिक संस्थेच्या सहकार्याने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

काल सायंकाळी डंपिंग ग्राउंड परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या वंचित मुलांसोबतच केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. केक कापताच मुलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहण्यासारखे होते.

केवळ केक कापून हा कार्यक्रम संपला नाही. भागवत यांच्या वतीने तेथील सुमारे ५० ते ६० मुलांना खाऊ, बिस्किटे, चॉकलेट आणि आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर यासारखे शैक्षणिक साहित्य देखील भेट म्हणून देण्यात आले. यावेळी भागवत यांनी प्रत्येक मुलाशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या शाळेबद्दल, शिक्षणाबद्दल विचारपूस केली आणि मन लावून शिकण्याचा सल्ला दिला.

समाजातील दुर्लक्षित घटकासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येक अधिकाऱ्याने ठेवावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू मुलांसोबत वाटल्याबद्दल अनुबंध सामाजिक संस्थेने तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशांत भागवत यांचे कौतुक केले असून आभार मानले आहेत.

ठाण्यातील ‘लोकतंत्र बचाव’ रॅलीवरून राजकीय संघर्षाला नवे वळण !!

ठाण्यातील ‘लोकतंत्र बचाव’ रॅलीवरून राजकीय संघर्षाला नवे वळण !!

*दिल्लीतील ‘व्होट चोरी’विरोधातील इंडिया आघाडीची महारॅली आणि ठाण्यातील सत्ताधाऱ्यांची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा*

** लोकशाहीच्या रक्षणाचा खरा अर्थ काय?

            अरुण ठोंबरे (जेष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक)

राजकीय विश्लेषण 

लोकशाही वाचवायची असेल तर संविधान वाचले पाहिजे आणि संविधान वाचवायचे असेल तर लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. हा लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत विचार आहे. मात्र, आज देशातील राजकीय वातावरण पाहता लोकशाही आणि संविधान या शब्दांचा वापर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंकडून राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी होताना दिसतो. त्यामुळे सामान्य नागरिकांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की, लोकशाहीचे खरे संरक्षण घोषणांमधून होणार नाही. प्रत्यक्ष कृतीतून आणि मैदानात उतरून सर्व सामान्य जनतेने एकत्र आले पाहिजे.

दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने कथित मतचोरी आणि मतदारांच्या हक्कांच्या प्रश्नावर मोठी महारॅली आयोजित केली. या आंदोलनातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला तर दुसरीकडे ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 'लोकतंत्र बचाव' पदयात्रा काढण्यात आली.

या दोन राजकीय घडामोडींकडे केवळ दोन रॅली म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. त्यामागील राजकीय संदेश, जनतेसमोर मांडले जाणारे प्रश्न आणि लोकशाहीबाबतच्या परस्परविरोधी भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या रॅलीबाबत आयोजकांनी दहा लाख लोक सहभागी झाले असे बोलले जाते. मात्र दिल्ली पोलिसांनी सुमारे ५० हजार उपस्थितीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे दहा लाख लोक प्रत्यक्ष उपस्थित होते, असे ठामपणे म्हणता येणार नाही. तरीही या आंदोलनाने मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या जबाबदारीचा मुद्दा राष्ट्रीय चर्चेत आणला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सत्ताधारी भाजपने 'लोकतंत्र बचाव' पदयात्रा काढली. भाजपने या पदयात्रेचा उद्देश आंदोलनांच्या नावाखाली होणारी अराजकता, झुंडशाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधानाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला, तर एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांच्या आंदोलनांवर टीका केली.

मात्र, येथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले तर त्यांना लोकशाहीविरोधी ठरवायचे आणि सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या पदयात्रेला लोकशाही रक्षणाची लढाई म्हणायचे सत्ताधारी सत्तेत असूनही त्यांना या लोकतंत्र बचाव साठी रॅली काढावी लागते हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे.

तसे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही समान आहे. त्याचबरोबर आंदोलनांमधून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी सरकारचीही असते हे सुद्धा विसरून चालणार नाही.

लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे, बहुमत मिळवणे किंवा सत्ता स्थापन करणे नव्हे. तर लोकशाही म्हणजे जनतेचा विश्वास, विरोधकांचा सन्मान, स्वतंत्र निवडणूक यंत्रणा, निष्पक्ष तपास यंत्रणा, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण या पारदर्शकपणे जनतेला समजल्या पाहिजेत.

सत्ताधाऱ्यांनी स्वतःला लोकशाहीचे रक्षक म्हणवून घेण्यापूर्वी जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. मतदार यादीतील कथित घोळ असोत, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचे प्रश्न असोत किंवा सरकारी यंत्रणांच्या निष्पक्षतेबाबत व्यक्त होणाऱ्या शंका असोत, त्यांची उत्तरे पुराव्यांच्या आधारे दिली गेली पाहिजेत.

संविधान केवळ भाषणात घेऊन चालत नाही, तर त्यातील मूल्ये प्रत्यक्ष प्रशासनात उतरवावी लागतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, लोकशाहीमध्ये जनता हीच अंतिम निर्णय घेणारी असते. आज जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या यांवर सरकारने उत्तरदायी राहणे गरजेचे आहे.

जनतेचा विरोध हा केवळ राजकीय पक्षांच्या रॅलींमधून मोजता येत नाही. तो निवडणुकीतील कौलातून, जनतेच्या प्रश्नांमधून आणि सरकारच्या कामकाजावरील विश्वासातून स्पष्ट होतो.

आज सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आंदोलनाला घाबरण्यापेक्षा त्या आंदोलनातून उपस्थित झालेल्या प्रश्नांना सामोरे जाण्याची गरज आहे. विरोधकांनीही केवळ आरोप न करता ठोस पुरावे आणि पर्यायी भूमिका जनतेसमोर मांडली पाहिजे.

दिल्लीतील रामलीला मैदान असो किंवा ठाण्यातील तलावपाळी, दोन्ही ठिकाणी लोकशाहीच्या रक्षणाच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण लोकशाही वाचवण्याची खरी कसोटी रस्त्यावरील गर्दीत नाही, तर सत्तेचा वापर कसा केला जातो, जनतेचे प्रश्न कसे सोडवले जातात आणि संविधानिक संस्थांचा सन्मान किती राखला जातो, यात आहे.
सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे की सत्ता कायमस्वरूपी नसते. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, उद्या ते विरोधी बाकावरही बसू शकतात. त्यामुळे लोकशाहीचे नियम सर्वांसाठी समान असणे आवश्यक आहे.
जनतेला केवळ लोकशाही बचावाच्या घोषणा नकोत, तर लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव हवा आहे. संविधानाचे संरक्षण भाषणांतून नव्हे, तर कृतीतून झाले पाहिजे.

लोकशाही वाचली तरच संविधानिक मूल्ये टिकतील, संविधान टिकले तरच जनतेचे अधिकार सुरक्षित राहतील आणि जनतेचा विश्वास गमावला तर कोणतीही सत्ता कायमस्वरूपी टिकू शकणार नाही !

संपर्क - (अरुण ठोंबरे - +91 93221 07521)

जिल्हा परिषद ठाणेचा अजब कारभार; शाखा अभियंत्याला एकाच वेळी तीन पदभार !!

जिल्हा परिषद ठाणेचा अजब कारभार; शाखा अभियंत्याला एकाच वेळी तीन पदभार !!

उप अभियंता, दत्तू गिते (सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन, भिवंडी)

*ठाणे | विशेष प्रतिनिधी*
ठाणे जिल्हा परिषदेत एकाच अधिकाऱ्याला तीन-तीन पदांचे पदभार देण्यात आल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन) भिवंडी येथे शाखा अभियंता पदावर कार्यरत असलेल्या दत्तू गीते यांना ते सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) भिवंडी येथे उपअभियंता म्हणून काम करत असताना त्यांच्या कडे उपकार्यकारी अभियंता (प्रभारी) आणि कार्यकारी अभियंता, पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे ठाणे ग्रामीण जिल्हा महासचिव अरुण सदाशिव ठोंबरे यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

*काय आहे तक्रार?*
तक्रारीनुसार, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दत्तू गीते यांच्याकडे प्रथम उपकार्यकारी अभियंता (प्रभारी) पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांना कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभारही देण्यात आला. शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता या पदांमधील सेवाज्येष्ठता, पदक्रम आणि प्रशासकीय नियमांचे पालन न करता हा कार्यभार देण्यात आल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.

अरुण सदाशिव ठोंबरे (ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे ठाणे ग्रामीण जिल्हा महासचिव)

श्री. गीते यांच्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी मंत्रालय आणि जिल्हा परिषदेकडे दाखल झाल्या आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात अनेकांनी उपोषणेही केली आहेत, मात्र कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.

उपअभियंता म्हणून भिवंडीमध्ये २३ वर्षे ठाण मांडून बसल्याचा आणि पदोन्नतीनंतरही नियमानुसार जिल्हा बदली न देता त्यांना भिवंडी तालुक्यातच कायम ठेवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांना नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, अशी चर्चा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.

अरुण ठोंबरे यांच्या या तक्रारीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन) व जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली असून चौकशीनंतर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक, आध्यात्मिक व महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान !!!

सामाजिक, आध्यात्मिक व महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान !!!

अहमदपूर, लातूर : ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि संस्कृती संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बलसंगी, ता. अहमदपूर, जि. लातूर येथील सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येत आहे.

शेतकरी कुटुंबातील कर्तव्यदक्ष गृहिणी असलेल्या सौ. कुलकर्णी या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात कुलदैवताच्या सेवेत भाविक महिलांना एकत्र आणून श्री दुर्गा सप्तशती पारायण, सामूहिक कुमकुमार्चन, देवीपूजन तसेच भजन-कीर्तनाचे आयोजन त्या नियमितपणे करतात. त्यांच्या या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आध्यात्मिक एकात्मता, धार्मिक श्रद्धा आणि संस्कारांची जपणूक होत आहे.

महिला मंडळाच्या माध्यमातून त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू समारंभ, महिला मेळावे, पारंपरिक स्पर्धा आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांचे यशस्वी आयोजन करतात. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संघटनशक्ती आणि सामाजिक सहभागाची भावना वाढविण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करतात.

महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि भारतीय परंपरा व संस्कृतीचे संवर्धन यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामीण भागात त्यांना यापूर्वी दोन वेळा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची निस्वार्थ समाजसेवा आणि आध्यात्मिक कार्य अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून त्यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे परिसरातील महिला वर्गाला सामाजिक कार्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वृत्त - विश्वनाथ राऊत सर 


पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...