Friday, 26 May 2023

भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांचा ; येरवडा महिला कारागृहातील महिलांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न !!

भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांचा ; येरवडा महिला कारागृहातील महिलांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न !!
 
पुणे, प्रतिनिधी - सुधारणा व पुनर्वसन या धोरणांतर्गत कारागृहातील बंद्यांकरिता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. भोई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने कारागृह उपमहानिरीक्षक-श्रीमती स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांचा महिला कारागृह येथे महिला बंद्यांकरिता सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांनी महिला बंद्यांना महिला सबलीकरण बाबत तसेच महिलांनी खचून न जाता जिद्दीने संकटांचा सामना करून परत नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून महिलांना मानसिक आधार दिला तसेच सर्व महिला बंदी तसेच महिला अधिकारी-कर्मचारी यांचेशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. 

या कार्यक्रमास येरवडा कारागृह अधीक्षक श्री.अनिल खामकर,उपअधीक्षक श्रीमती पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी श्रीमती तेजश्री पोवार, भोई प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टेरवचे श्री प्रकाशराव कदम यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोनत्ती !

टेरवचे श्री प्रकाशराव कदम यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोनत्ती !

ठाणे, प्रतिनिधी : दसपटी विभागातील टेरव मधील राधाकृष्ण वाडीमधील ज्येष्ठ नागरिक श्री. धोंडजीराव सखारामराव कदम, कुशल शेतकरी व मा. पोलीस पाटील यांचे कनिष्ठ सुपुत्र श्री. प्रकाशराव  कदम हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत.  सन २०१३ साली  पोलीस उपनिरीक्षक  विभागीय अहर्तता परीक्षा  महाराष्ट्रात घेण्यात आली  होती, सदर परीक्षेत श्री प्रकाशराव कदम हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. त्यांची पोलीस उपनिरीक्षक  पदी पदोन्नती झाली असुन त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचा  नुकताच पदभार स्वीकारला. सदर प्रसंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे साहेब व पोलिस निरीक्षक (प्रशा.) श्रीमती विद्या पाटील मॅडम व इतर अधिकारी आणि  अंमलदार उपस्थित होते.

श्री. प्रकाशराव हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी असून, त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे, तसेच पोलिस खात्यात एक  उत्तम तपास  व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना अनेक बक्षिसे तसेच प्रशस्तीपत्रे  प्राप्त झाली आहेत. तसेच सन २०१६ साली त्यांना पोलीस महासंचालक यांच सन्मानचिन्ह (पोलीस पदक) मिळाले आहे. 

 श्री प्रकाशराव  यांना अथक प्रयत्नांनी मिळविलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती बद्दल  समस्त नातेवाईक, दसपटकर, टेरव  ग्रामस्थ, मित्रमंडळी  तसचे अनेक सामाजिक संस्था यांनी त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे .

बोरिवली पश्चिम येथील ‘मुंबई युथ असोसिएशन (एन.जी.ओ.) ’समूहातर्फे गरजू महिलेला मदतीचा हात !

बोरिवली पश्चिम येथील  ‘मुंबई युथ असोसिएशन (एन.जी.ओ.) ’समूहातर्फे गरजू महिलेला मदतीचा हात !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील  भांबेड येथील एका गरजू विधवा महिलेला बोरिवली पश्चिम येथील  ‘मुंबई युथ असोसिएशन (एन. जी. ओ.)’ समूहाचे अध्यक्ष श्री. वैभव दामोदर म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभाग प्रमुख श्री. दामोदर म्हात्रे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रमुख सचिन दामोदर म्हात्रे यांच्या तर्फे सन २०२२-२३ दरम्यान सुरु असलेल्या गं.भा.सुनंदा का. शिवगण यांच्या घरासाठी आवश्यकता असलेले सिमेंट पत्रे देऊन मदतीचा हात दिला. त्यामुळे या गरजू महिलेच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत मिळाले आहे. या मदत कार्यासाठी बोरिवली पश्चिम येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी श्री. समीर वि. खाडिलकर यांनी विशेष सहकार्य करून मदत मिळवून दिली. भांबेड येथील गं. भा.सु.का. शिवगण या गरजू महिलेच्या पतीच २ वर्षांपूर्वी निधन झाले होते.पतीच्या निधनानंतर या विधवा महिलेने अथक काबाडकष्ट करीत आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही स्वत:च्या पोटाला चिमटा काढून स्वतःचे चांगलं घर उभं करण्याचा प्रयत्न केला.अनेक अडचणी येत असतानाही हातात असलेल्या पैशात पक्क्या भिंती उभ्या केल्या. मात्र आवश्यकता असलेले सिमेंट पत्रे साठी तिला मदतीची गरज भासत होती. तिची गरज लक्षात घेऊन स्थानिक जागृत नागरिक यांनी पत्रकार समीर  खाडिलकर यांच्याशी संपर्क साधला. कारण कोरोना काळात समीर खाडिलकर यांनी अनेकांना अनेकदा मदत केली होती. समीर खाडिलकर यांनी म्हात्रे कुटूंब यांच्याशी संवाद साधून आवश्यकता असलेल्या सिमेंट पत्रे विषयी माहिती दिली. म्हात्रे कुटुंब यांनी तात्काळ होकार देऊन पत्रे दिले.
           प्रत्येक धर्मात दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सनातन धर्मातही दानाचे महत्त्व सांगितले आहे.असे मानले जाते की दान केल्याने मनुष्याचे इहलोक आणि परलोकात कल्याण होते. पण आजच्या बदलत्या काळात लोकांसाठी कोण काही करताना दिसत नाही. मात्र म्हात्रे कुटुंब याला अपवाद आहे. ते जमेल तेथे सातत्याने मदतीचा हात लोकांना देत आहेत. पुण्य कार्यात धर्मादाय कार्याची भर पडते. भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आली आहे. म्हात्रे यांनी केलेल्या या मदत कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना अनेकांनी पुढील कार्यास यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

Thursday, 25 May 2023

दहागांव येथील महिलेच्या बालकाला गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांकडून नवजीवन, परिसरातून कौतुक !

दहागांव येथील महिलेच्या बालकाला गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांकडून नवजीवन, परिसरातून कौतुक !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरलेल्या गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तथा बालरोगतज्ज्ञ डॉ उज्वल जाधव यांनी अथक परिश्रम करून दहागांव येथील श्रीमती माधुरी विनायक मिरकुटे हिच्या नवजात बाळाला नवजीवनदान दिल्याने परिसरातील मान्यवराकडून त्यांचे कौतुक केलं जातं आहे.

कल्याण तालुक्यातील सुमारे ६०/७० गावासाठी गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी १९९२ च्या आसपास ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. तत्कालीन आमदार गोटिराम पवार, यांनी या रुग्णालयाकडे विशेष लक्ष दिले होते. यानंतर सध्याचे आमदार किसन कथोरे हे देखील ब-यापैकी लक्ष ठेवून आहेत. परंतु मध्यतंरी अनेक सोयीसुविधांचा अभाव होता, त्यामुळे बहुतांश पेशंट तक्रारी करत होते. परंतु रुग्णालयास डॉ. माधवी पंडारे यांच्या रुपाने वैद्यकीय अधीक्षक मिळाल्याने हाँस्पिटलचा चेहरा मोहरा बदलून गेला, फायर सिस्टिम, लँब टेक्निशियन, एक्सरे, इसीजी, पुरुष, स्त्री वार्ड, पसुती कक्ष, आदी विभाग अद्यावत करण्यात आले. याचा परिणाम म्हणून दोनच दिवसापूर्वी दहागांव येथील माधुरी विनायक मिरकुटे हि महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली असता डॉ. उज्वल जाधव यांनी तात्काळ औषधोपचार सुरू केले. पसुती व्यवस्थित झाली परंतु जन्म होताच बाळ रडले नाही, बाळाच्या पोटात भरपूर पाणी शिरल्याने त्याची बिकट स्थिती झाली. डॉ. उज्वल जाधव यांनी तातडीने बाळाच्या तोंडावाटे नळट्यूब टाकून पोटातील पाणी बाहेर काढले. त्याला तोंडातून, नाकातून सकक्षन करून आँक्शिजन दिला. अर्धातास प्रयत्न केल्यानंतर बाळाचे प्राण वाचवण्यात डॉ. जाधव यांना यश आले. ही बाब आईवडील माधुरी व विनायक आणि त्यांच्या मिरकुटे परिवाराला समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी डॉ. जाधव यांचे आभार मानले व धन्यवाद दिले. त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चार दिवसापूर्वी म्हसरोंडी गावातील पूजा वाघचौरे ही आदिवासी महिला प्रसुती करिता आली असता तिला बिलकुल प्रसुतीकळा नव्हत्या त्यामुळे तिच्या वर औषधोपचार करून प्रसूतीसाठीची परिस्थिती लक्षात घेऊन उल्हासनगर येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. तात्काळ १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. कारण बाळाचे ठोके कमी असल्याने व आईला कळा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला तो योग्यच ठरला. सेंट्रल हाँस्पिटल येथे या महिलेची सुरक्षित प्रसुती झाली व बाळ व आई व्यवस्थित आहेत. त्यामुळे या वैद्यकीय अधिका-यांचे कौतुक होत आहे. गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वल जाधव व इतर डॉक्टर व कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे सध्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या या सुधारलेल्या कामकाजाचे जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयराम मेहेर आदींनी कौतुक केलं आहे.

रायते विभाग हायस्कूल रायते शाळेतून आपटी गावची कु भाविका शिसवे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, अभिनंदनाचा वर्षाव !

रायते विभाग हायस्कूल रायते शाळेतून आपटी गावची कु भाविका शिसवे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, अभिनंदनाचा वर्षाव !

कल्याण, (संजय कांबळे) ::कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर आदी पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेल्या रायते विभाग हायस्कूल रायते व कनिष्ठ विद्यालय रायते या शाळेचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला असून आपटी गावची कु भाविका नितलास शिसवे हि ८६ गुण मिळवून रायते विद्यालयातून पहिली आली आहे, तर द्वितीय क्रमांक कु त्रुषाली आप्पा म्हसकर तर तृतीय क्रमांक कु सानिका लक्ष्मण मुठोलकर हिचा आला आहे तसेच पत्रकार संजय कांबळे यांचा मुलगा कु आन्शू कांबळे याला ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे, त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या शेतीप्रधान आपटी गावची ओळख महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर झाली ती म्हणजे याच गावातील डॉ रवींद्र अनंता शिसवे हे आयपीएस झाल्यानंतर, अत्यंत खडतर प्रवास करून डॉ शिसवे हे एकमेव आगरी समाजातील पहिले आयपीएस अधिकारी बनले, अनेक जिल्हाचे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडल्यानंतर आता ते मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत, 
त्यांच्याच कुटूबातील धार्मिक वृतीचे व भक्तिमार्गावर चालणारे नितलास शिसवे यांची कन्या कु भाविका नितलास शिसवे हि रायते विभाग हायस्कूल रायते शाळेतून बारवी परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, मुळात गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार यांची शिक्षण संस्था म्हणून पद्मश्री अण्णासाहेब जाधवांच्या भारतीय समाज उन्नती मंडळाच्या रायते विभाग हायस्कूल रायते व कनिष्ठ विद्यालयची ओळख निर्माण झाली आहे.

या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, वर्गशिक्षक, कर्मचारी हे माझा विद्यार्थी , म्हणून त्यांच्या कडे लक्ष देतात, याचाच परिणाम म्हणून इयत्ता १० व बारावी परीक्षेचा निकाल जवळपास १०० टक्के लागतो, नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत रायते शाळेतून ११३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्यापैकी सुमारे ९६ मुले उत्तीर्ण झाले, यामध्ये कु भाविका नितलास शिसवे ही सर्वाधिक गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, कु त्रुषीला म्हसकर ७७:३३ द्वितीय कु सानिका मुठोलकर (७३:६७) तृतीय क्रमांकाने पास झाले, तर कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांचा मुलगा कु आन्शू संजय कांबळे याने ६०गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे, राष्ट्वादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे, तालुका अध्यक्ष जमराम मेहेर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अनंता शिसवे, कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती सौ शुभांगीताई शिसे, 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे सेवा दलाचे संतोष शेलार, ज्ञानेश्वर पाटील आदींनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

देवेंद्र फडणवीसांशी बोलता बोलता तो वृद्ध व्यक्ती जमिनीवर कोसळला अन् एकच गोंधळ उडाला !!

देवेंद्र फडणवीसांशी बोलता बोलता तो वृद्ध व्यक्ती जमिनीवर कोसळला अन् एकच गोंधळ उडाला !!

सोलापूर, प्रतिनीधी (गणेश नवगरे) - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते महसूल भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विलास शहा हे वृद्ध सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले होते. सोलापूर-हैदाराबाद मार्गावरील कत्तलखान्यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन घेऊन ते आले होते.

विलास शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना समस्या समजावून सांगत होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत असताना विलास शहा थोडे खाली वाकले. त्यावेळी ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडत आहेत, असा अनेकांचा समज झाला. मात्र, विलास शहा जागेवरच कोसळल्याने त्यांना भोवळ आल्याचे सर्वांना समजले. यानंतर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी विलास शहा यांना सावरण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर विलास शहा यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

सोलापूर हैदराबाद महामार्गावरील सोनांकुर कत्तलखाना बंद करावेत, या मागणीसाठी विलास शहा हे गेल्या १५ वर्षांपासून लढा देत आहेत. १५ दिवसांत आपली मागणी मान्य न झाल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा विलास शहा यांनी दिला आहे.

*देवेंद्र फडणवीसांनी शहांना सावरले, खुर्चीवर बसविले*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना विलास शहा यांना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला होता. देवेंद्र फडणवीस यासोबतच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे सह अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्याची मोठी गर्दी होती. या गर्दीत फडणवीस यांनी विलास शहा यांना स्वतः उचलले आणि खुर्चीवर बसविले पाणी पाजले. निवेदन स्वीकारून पुढे गेले. पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती ताबडतोब नियंत्रित झाली.

विलास शहा यांचा आत्मदहनाचा इशारा __

देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या सोनांकुर कत्तलखाना बंद करावे. या कत्तलखान्यामुळे बोरामणी विमानतळाचा विकास होत नाही. तसेच अनेक बांगलादेशी या कत्तलखान्यात काम करत आहेत, हे घुसखोर आहेत असा आरोप विलास शहा यांनी केला आहे. येत्या १५ तारखेपर्यंत हा कत्तलखाना बंद नाही झाला तर आत्मदहन करणार असा इशारा विलास शहा यांनी दिला.

मी घरी बसणारा मुख्यमंञी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !!

मी घरी बसणारा मुख्यमंञी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !!

*रत्नागिरी, प्रतिनीधी (गणेश नवगरे)* - मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही, आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले. आमचं सरकार हे जनतेच्या हिताचं सरकार आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत शासन आपल्या दारी हा उप्रकम राबवण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. यावेळी लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमधील कामाचा आढावा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे बसचा प्रवास वाढला. ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करु लागले आहेत. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

त्याचबरोबर, आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. चकरा, खेटे घेणे हे शब्द काढून टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले. आमच्या सरकारने ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल, केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. फंड देत आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहे. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते त्याचा लाभ लोकांना मिळतो.

आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष्य आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्हाला नष्ट करायची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...