Monday, 7 September 2026

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी !!

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी !!

> जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना संधी, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य.

बुलढाणा प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीच्या आधारे अधिकाऱ्यांना संधी देण्याची नवी कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच पुढील तीन वर्षात काय करणार याचे नियोजन याचा भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळीही केला जाणार आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात केवळ सेवाज्येष्ठतेला नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.

 तीन वर्षांच्या कामगिरीचा ‘रिपोर्ट कार्ड’: 
३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब ,क ,ड  अश्या चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. म्हणजेच, तीन वर्षांची कामगिरी आता अधिकाऱ्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. व दरवर्षी असे गुणांकन केले जाणार आहे.

 रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११कसोट्या: 
अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

लोकाभिमुखता आणि तक्रार निवारणापासून सुरुवात करून नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण व संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे.

आरोग्य संस्थांमध्ये आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल. अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान, कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे.

त्यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे,महाकर्मी पोर्टलवरील कामकाज, तसेच एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी या डिजिटल व योजनाधारित कामगिरीलाही गुण दिले जाणार आहेत.याच बरोबर पुढील तीन वर्षात  कार्याचे काय नियोजन असणार आहे याचाही विचार केला जाणार आहे .

 गुणवत्तेसोबत सचोटीलाही तितकेच महत्त्व: 
अधिकाऱ्यांच्या नामनिर्देशनासाठीही स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित नसणे, अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसणे आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट चारित्र्य आणि निर्विवाद सचोटी हा देखील नामनिर्देशनाचा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ कामाची आकडेवारी नव्हे, तर अधिकाऱ्याची प्रशासकीय प्रतिमा आणि प्रामाणिकपणालाही महत्त्व मिळणार आहे.

‘काम करणाऱ्याला संधी’चा स्पष्ट संदेश

सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची योग्य दखल आणि त्यानुसार पुढील संधी मिळावी, हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे.

यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजातही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

आबिटकरांच्या नेतृत्वाखाली ‘परफॉर्मन्स बेस्ड’ प्रशासन

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्यानुसार जबाबदाऱ्या आणि संधी देण्याची ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे.
या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, १०० गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.

‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागातील पारंपरिक कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आकाराला येणारी ही कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती आरोग्य विभागासाठी आदर्श व नाविन्यपूर्ण ठरणार असून लोकाभिमुख आरोग्यसेवा प्रत्यक्ष साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण भागातील ५ शिक्षकांचा सन्मान !!

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण भागातील ५ शिक्षकांचा सन्मान !!

*ठाणे, दि. ७ सप्टेंबर २०२६*

जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळ्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यात जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

या सोहळ्यास आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देत गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

*पुरस्कार प्राप्त शिक्षक -*

- *अंबरनाथ तालुका :* जि. प. शाळा मामूची वाडी, केंद्र पिंपळोली येथील प्राथमिक शिक्षिका छाया संजय कोकंदे
- *भिवंडी तालुका :* जि. प. शाळा देवरुंग, केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील
- *कल्याण तालुका :* जि. प. शाळा घोटसई, केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे
- *मुरबाड तालुका :* जि. प. शाळा खेडले तळवली, केंद्र खेवारे-महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव
- *शहापूर तालुका :* जि. प. शाळा कळगाव, केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शिक्षकांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

काँक्रीट रस्ते तोडायची मालिका सुरूच; प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह !!

काँक्रीट रस्ते तोडायची मालिका सुरूच; प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह !!

*डोंबिवली, दि. ७ सप्टेंबर २०२६)*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात नवीन बनविलेले काँक्रीट रस्ते तोडण्याची मालिका सुरूच आहे. मिलापनगर बंगला क्रमांक RL-16 आणि 70 समोरील काँक्रीट रस्ता तोडून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.

हा काँक्रीट रस्ता राज्य सरकारच्या विशेष निधीतून केडीएमसीने वर्षभरापूर्वीच बनविला होता. भविष्यात या ठिकाणावरून महावितरणच्या केबल्स, पाण्याच्या पाइपलाइन आदी दुरुस्तीसाठी टाकायच्या असल्यास अडचण येऊ नये म्हणून काँक्रीट रस्ता तोडून पेव्हर ब्लॉक लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर हे काँक्रीट रस्ते बनवतानाच या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकले असते तर पुन्हा रस्ता तोडून ब्लॉक टाकण्यासाठी झालेला आर्थिक भुर्दंड टाळता आला असता. या कामामुळे गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच जनतेच्या पैशाचा चुराडा होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. एमआयडीसी परिसरात यापूर्वीही नवीन नाले/गटारे बनविण्यासाठी, महावितरण केबल्स आणि पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी अशा विविध कारणांसाठी अनेक नवे रस्ते तोडण्यात आले आहेत.

एमआयडीसी परिसरातील काँक्रीट रस्ते बनवण्यापूर्वी वीज, पाणी आदी वाहिन्या शिफ्ट करण्याचे काम प्रशासकीय समन्वयाअभावी राहून गेले होते. त्यात नाले/गटारांची कामे काँक्रीट रस्ते बनविल्यानंतर सुरू करण्यात आली होती.

एकूणच प्रशासनाच्या चुकीचा फटका नागरिकांना बसत असून यापुढेही असे अनेक काँक्रीट रस्ते तोडावे लागणार आहेत. यामुळे या काँक्रीट रस्त्यांचा दर्जा व त्यांचे आयुर्मान कमी होणार असून काही वर्षांनी हेच रस्ते पुन्हा नव्याने बनवावे लागणार असल्याचे चित्र आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

Sunday, 6 September 2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

*नवी दिल्ली, प्रतिनिधी :* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि कौशल्याधारित शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील 82 शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026’ ने गौरवण्यात आले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित या समारंभात महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि 50 हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले.

या 82 पुरस्कारांमध्ये 48 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि 13 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश आहे.

*राष्ट्रपतींचे प्रतिपादन*
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

"शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर व्यक्तिमत्व आणि चारित्र्याला आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल," असे राष्ट्रपती म्हणाल्या.

*मान्यवरांची उपस्थिती*
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, शिक्षण सचिव अनिल कुमार आणि कौशल्य विकास सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते.

*महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त 9 शिक्षक*
🏆 *डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे* - साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड
🏆 *कुंदा जयवंत बच्छाव* - महापालिका शाळा, नाशिक
🏆 *वैभव वसंतराव कुलकर्णी* - जवाहर नवोदय विद्यालय, लातूर
🏆 *शिवप्रसाद अरविंद टिंगरे* - सैनिक स्कूल, सातारा
🏆 *डॉ. विक्रम विशाल* - IIT मुंबई
🏆 *डॉ. अमर मोहनराव ताकसांडे* - जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा
🏆 *डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे* - शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
🏆 *किरण प्रकाश झरकर* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव
🏆 *अर्चना राकेश जाधव* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

*मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२६*

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतिप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या धोरणानुसार -

- पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे.
- मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये. त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत यासाठी वर्गनिहाय 'दप्तर वेळापत्रक' तयार करावे.
- विद्यार्थ्यांनी दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- घरातून जड पाण्याची बाटली वाहून आणावी लागू नये यासाठी शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा. या कालावधीत स्थानिक कारागीर व व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कृषीविषयक व स्थानिक व्यवसायांची ओळख यांसारखे प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी अशा कृतिप्रधान दिवसांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

*डोंबिवली, दि. ६ सप्टेंबर २०२६, (राजू नलावडे)*

येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या निर्माल्याबाबत जनजागृती व्हावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत कसे तयार होते याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम आज रविवारी सकाळी ९.०० ते ११.३० या वेळेत श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्प, एमआयडीसी, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन, केडीएमसी) श्री रामदास कोकरे, निर्मल युथ फाउंडेशनच्या अध्यक्षा कु. अक्षता औटी, श्री गणेश मंदिर संस्थानचे सचिव व विश्वस्त प्रवीण दुधे, पर्यावरण तज्ज्ञ विजय घोडेकर, पर्यावरण प्रेमी राजीव तायशेटे, राजू नलावडे, राजू काळे, सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रगती कॉलेज आणि एस.आय.ए. कॉलेजमधील एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. येणाऱ्या गणेशोत्सवात विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य हे स्वयंसेवक विद्यार्थी गोळा करून प्लास्टिकविरहित स्वरूपात श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पात पोहोचवणार आहेत. यानिमित्ताने उपायुक्त श्री रामदास कोकरे यांनी नागरिकांनी निर्माल्य कसे द्यावे याबाबत जनतेला संदेश दिला.

सदर कार्यक्रमादरम्यान श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पाच्या आवारात श्री रामदास कोकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान, निर्मल युथ फाउंडेशन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सुमित एल्को (Sumeet ELCO) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Saturday, 5 September 2026

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम

पालघर, प्रतिनिधी 

मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. “मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” हा स्पर्धेचा विषय होता. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अपेक्षा आणि आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या अनुभवांना व विचारांना लेखणीतून व्यक्त केले.

स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा एकूण ४२ शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबई येथील प्रा. सचिन परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत श्री. भरत गोसावी यांनी प्रथम क्रमांक, सौ. अमृता रोशन धुमाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर श्री. पंकज शंकर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना त्यांच्या आवडीची ₹५०० किमतीची पुस्तके, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या ऑक्टोबर महिन्यातील कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

लेखणीपेक्षा ‘स्वतःचा विचार’ महत्त्वाचा!

या स्पर्धेच्या निकालासोबतच आयोजकांनी एक महत्त्वाची खंतही व्यक्त केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी निबंध लेखनासाठी एआयचा (Artificial Intelligence) वापर केल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या विद्यार्थी-शिक्षक प्रवासावर आधारित असलेल्या या विषयात प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा अनुभव, विचार, भावना आणि चिंतन अपेक्षित होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेताना स्वतःची सर्जनशीलता आणि लेखनविचार यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

“स्पर्धेचा उद्देश केवळ क्रमांक मिळविणे नसून शिक्षकांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाकडे पुन्हा एकदा पाहावे आणि ‘माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कसा शिक्षक आहे?’ याचे आत्मपरीक्षण करावे, हा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे मनोविकास ग्रंथोत्सवचे अमोल पाटकर आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुस्तक वाचन, चिंतन आणि लेखनातून शिक्षकांच्या विचारविश्वाला समृद्ध करण्याचा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे यावेळी देण्यात आली.

वृत्त - पंकज चव्हाण (वसई)

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...