Saturday, 18 January 2025

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन !

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन !

** २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे झाला प्रकाशित 

कोकण (शांताराम गुडेकर) :

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक लोटणकर यांच्या २१ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. निराधार हा २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कथासंग्रहास प्राचार्य आणि समीक्षक दत्ता पवार यांचा अभिप्राय लाभला आहे.

           कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्या कथांमध्ये माणसांचे वास्तव दिसते, अशा शब्दात पवार यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. या सगळ्या कथा यापूर्वी विविध मासिके आणि दिवाळी अंकांमधून पूर्वप्रकाशित झाल्या आहेत. लोटणकर यांनी ललित गद्याबरोबरच काव्य, कथा, लघुकथा, बालसाहित्य, समीक्षा अशा साहित्यप्रकारात लेखन केले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांची काही पुस्तके ब्रेललिपीतही प्रसिद्ध झाली आहेत. लोटणकर यांना कोमसाप साहित्य पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.

             श्री.लोटणकर यांची एकूण २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे असे ३० हून अधिक साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पूर्वी त्यांना "कोकण साहित्य रत्न" या पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. शिवाय एकता कल्चरल अकादमी, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान, कै.नानासाहेब शेट्ये सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. लोटणकर यांनी ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून ते बी.ई.एस.टी. मधून डेपो मॕनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत. श्री .लोटणकर हे अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा- मुर्शी गावचे सुपुत्र लोटणकर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ, विविध संस्था, प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

स्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली चिंता !

स्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली चिंता ! **...