जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!
उपसरपंच निवडीने कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान : महेंद्रशेठ घरत
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील जासईच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या सुलोचना पद्माकर घरत (कॉंग्रेस) यांची मंगळवारी (ता. १०) बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संतोष घरत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुलोचना घरत यांचा एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "नवनिर्वाचित उपसरपंच सुलोचना घरत आणि त्यांचे पती दिवंगत पद्माकर घरत हे धडाडीचे कार्यकर्ते, परंतु दुर्दैवाने पद्माकर घरत या कार्यकर्त्याचे अकाली निधन झाले. सुलोचनाताईंनी पती आजारी असताना उत्तम साथ दिली, याची मला जाणीव आहे. त्यामुळे जेव्हा उपसरपंच पदाची निवडणूक जाहीर होताच मी सुलोचनाताईंना उपसरपंचपदी बसवा, अशी विनंती केली. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी, नेत्यांनी मनावर घेतले. त्यामुळे सुलोचना ताई उपसरपंचपदी विराजमान झाल्या. यामुळे मला माझ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे. शेकाप आणि महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या, पदाधिकारी यांच्या मेहनतीने आणि उत्तम सहकार्याने उरणमध्ये आज आपली ताकद दाखवून दिली आहे. लढाऊ महिला निवडून आल्या. कॉंग्रेसमध्ये सर्वांना सन्मान आहे. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे."
यावेळी पतीच्या आठवणीने उपसरपंच सुलोचना घरत भाऊक झाल्या होत्या. महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, पंचायत समिती सदस्य निर्मलाताई घरत, नरेश घरत, कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, संजय ठाकूर, आदित्य घरत आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सुलोचना घरत यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment