Saturday, 23 May 2026

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

कल्याण , संदीप शेंडगे : कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार, दलालांचे वाढते हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याने मुख्यमंत्री सचिवालयाने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष शरद काशिनाथ धुमाळ यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे सादर केलेल्या निवेदनात डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यालयात नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असून दलालांच्या माध्यमातूनच कामे होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनिक कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, कर्तव्यातील दुर्लक्ष, नागरिकांशी गैरवर्तणूक आणि शासकीय नियमांचे उल्लंघन यासंदर्भातही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कोकण विभाग यांनी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेश प्राप्त झाल्यानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान कार्यालयातील व्यवहार, दलालांची साखळी आणि नागरिकांच्या तक्रारींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी आरटीओ कार्यालयातील कारभार अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !!

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !! *डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीच्या Rule The ...