आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ !
१३ ते १९ जूनपर्यंत अर्जदारांना प्रवेशाची संधी; हा दुसरा टप्पा अंतिम
ठाणे, दि. १३ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ देण्यात आली असून, आता ही प्रवेश प्रक्रिया दिनांक १३ जून २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेशाची मुदत दिनांक १२ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संबंधित विभागामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ दुसऱ्या टप्प्यासाठी असून, हा अंतिम टप्पा असल्याची नोंद सर्व संबंधित पालकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत पालकांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्यात येत असून, संबंधित यंत्रणांना प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही विलंब होऊ नये तसेच पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पालकांनी अंतिम मुदतीपूर्वीच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक समावेशकता आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम असून दिलेल्या मुदतवाढीत पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे
No comments:
Post a Comment