भिवंडीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आवाहन !!
प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ पर्यंत स्टेमचा पाणीपुरवठा बंद राहणार; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
भिवंडी प्रतिनिधी
उल्हास नदीतील उपलब्ध जलसाठा आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन भिवंडी शहरासाठी पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने याबाबत नागरिकांना सतर्क करत सहकार्याचे आवाहन केले आहे.
जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, कळवा-ठाणे यांच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी उल्हास नदी पाणी नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत सर्व बिगर सिंचन ग्राहकांनी दररोज २० टक्के सक्तीची पाणी कपात करावी, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्टेम प्राधिकरणामार्फत भिवंडी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आवश्यक कपात करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे दर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सलग २४ तास भिवंडी शहरासाठी स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरच्या दिवशी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या निर्णयाचा परिणाम शहरातील ममता टाकी, चाविंद्रा गाव, पटेल नगर, बाला कंपाऊंड, फरीद बाग, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मण आळी, कासार आळी, भावे नगर, आदर्श पार्क, अजयनगर, गोकुळ नगर, इंदिरा नगर, कल्याण रोड, तीनबत्ती, शिवाजी नगर, खडक रोड, अजमेर नगर, शमा नगर, अंजूरफाटा, देवजी नगर, नारपोली, विठ्ठल नगर, रोशन बाग, भंडारी कंपाऊंड, निजामपुरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्त्री नगर, नेहरू नगर, मिल्लत नगर, नविवस्ती, वेताळपाडा, कामतघर, ताडाली, भाग्यनगर, हनुमान नगर, कणेरी, न्यू कणेरी, गौरीपाडा, पद्मानगर, अशोक नगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, काप आळी, कुरेशनगर, भादवड, टेमघर यासह अनेक भागांवर होणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने संबंधित भागांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येत असून, पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment