*कल्याणमध्ये दिलासा फाउंडेशनच्या कार्यक्रमात किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंद गिरी यांना मानद डॉक्टरेट*
(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)
कल्याण: - समाजाच्या प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने दिलासा फाउंडेशनतर्फे नुकतेच कल्याण येथील के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये "प्यार, दोस्ती और बारिश" या कराओके म्युझिकल शोचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात तृतीयपंथी समाजाच्या किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंद गिरी यांना दिलासा फाउंडेशन आणि सॉक्रेटीस सोशल रिसर्च युनिवर्सिटी यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजरत्न डॉ. विजयनारायण पंडित, उद्योग विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी राजेश डोईफोडे, सुप्रसिद्ध समाजसेविका जरीना बेग यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुमारे शेकडो संगीतप्रेमींनी या कराओके महफिलीचा आनंद लुटला.
दिलासा फाउंडेशन समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांना, वंचित कुटुंबातील व्यक्तींना आपली कला आणि कार्य दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देते. हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो, अशी माहिती फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. पद्मिनी कृष्णा यांनी दिली.
सॉक्रेटीस सोशल रिसर्च युनिवर्सिटी (SSRU) ही एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. जी समाजसेवा, मानवता किंवा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, परंतु पारंपरिक शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तींना "ऑनरेरी डॉक्टरेट - ऑनोरिस कॉसा" पदवी प्रदान करते. ही एक सन्माननीय उपाधी असून पारंपरिक शैक्षणिक नोकरीसाठी शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता म्हणून ग्राह्य धरली जात नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी दिलासा फाउंडेशनच्या डॉ. पद्मिनी कृष्णा यांनी सर्व पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनाही स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
No comments:
Post a Comment