Friday, 21 August 2026

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

(लोकनेत्या तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विविध उपक्रम)

वसई प्रतिनिधी/पंकज चव्हाण

“आपल्या आकांक्षा उंच ठेवा, परिस्थितीशी संघर्ष करताना स्वप्नांशी तडजोड करू नका. अपयशातून शिका आणि उपलब्ध वेळेचा सदुपयोग करा; कारण वेळ हे पुन्हा न मिळणारे संसाधन आहे. कोणतेही कार्य करताना ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना केंद्रस्थानी असावी,” असा संदेश वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी विद्यार्थ्यांना दिला. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात थोर लोकनेत्या तारामाई वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने प्रयत्न करावेत, अपयशाला शिकण्याची संधी मानावे आणि प्रत्येक क्षेत्रातील संधी ओळखून त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या या पंचसूत्रीसोबतच कोणत्याही व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी तिचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘Educate, Organise, Agitate’ या विचारांचीही त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली.

हे व्याख्यान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षातर्फे आयोजित करण्यात आले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विकास वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महोत्सवाला संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक, सचिव रवी मोहोळ, कोषाध्यक्ष हसमुखभाई शाह, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, विद्यावर्धिनी परिवारातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

तारामाई वर्तक यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात तारामाई वर्तक मेमोरियल अकादमीच्या शिक्षिकांनी सादर केलेल्या गौरवगीताने आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘असीम तारा’ या नाटुकलीने उपस्थितांची मने जिंकली. तारामाईंचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्य, त्यांचा संघर्ष, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा ध्यास या नाट्यप्रस्तुतीतून प्रभावीपणे उलगडला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी तारामाईंच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची पुनर्भेट घडवून आणली. केवळ पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे संस्था उभारणे नव्हे, तर परिवर्तनाचा ध्यास आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे हा खरा संस्थात्मक वारसा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी तारामाईंच्या स्मृतींना अभिवादन केले.
उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक यांनी अण्णासाहेब व भाऊसाहेब वर्तक यांच्या कार्यपरंपरेच्या पार्श्वभूमीवर तारामाईंच्या कर्तृत्वाचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात विकास वर्तक यांनी तारामाईंच्या स्त्री सबलीकरण, बालशिक्षण, पाणीप्रश्न आणि तंत्रशिक्षणातील योगदानाच्या विविध पैलूंना उजाळा दिला. पापडखिंडी धरणाच्या संकल्पापासून तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून बोईसर औद्योगिक परिसरासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यापर्यंत त्यांची दूरदृष्टी दिसून येते. समाजाची गरज ओळखून त्यानुसार शैक्षणिक संस्था उभारण्याच्या त्यांच्या कार्यामुळे अनेकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम डोंगरे व प्रा. अदिती यादव यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. महिला विकास कक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी १५० हून अधिक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, लायन्स क्लबच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना यांच्या समन्वयातून आयोजित रक्तदान शिबिरात ९६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला जन्मशताब्दी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमांमधून तारामाई वर्तक यांच्या समाजाभिमुख आणि मानवकेंद्री कार्यविचारांना कृतीची जोड देण्यात आली.

No comments:

Post a Comment

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी  मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !! *डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी नि...