डॉ. महेंद्र घरत यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान !!
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट, समर्पित आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. महेंद्र लक्ष्मण घरत यांना यंदाच्या ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ईटाँस एम्पोरियल, नंदुरबार येथे संपन्न झाला. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोरख देवरे यांच्या हस्ते डॉ. घरत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. महेंद्र घरत यांनी अध्यापनासोबतच शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता तसेच निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी या विषयांसाठी त्यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता सहावीच्या ‘व्यवसाय शिक्षण’ विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षणासाठी बालभारती येथेही त्यांची निवड झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील पीएम श्री शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने आयोजित पीजीटी व टीजीटी शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी दीव-दमण येथे समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आतापर्यंत प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक हजाराहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी डॉ. महेंद्र घरत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Thank you sir
ReplyDelete