बोरिवलीत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा !!
भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव)
भिवंडी तालुक्यातील बोरिवली येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बोरिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक अन्वर पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सामाजिक कार्यकर्ते सोहराब गुजर, सामाजिक कार्यकर्ते जियाद गुजर तसेच बोरिवली ग्रामपंचायतीच्या वतीने बोरिवली येथील गुजर हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण बोरिवली गाव देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेले होते.
या कार्यक्रमाला बोरिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक अन्वर पिंजारी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस उपनिरीक्षक शरद सुरलकर, मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे, माजी पंचायत समिती सदस्य मुशीर नाचण, भिवंडी काँग्रेस ग्रामीणचे माजी अध्यक्ष शरद ठाकरे, उद्योजक साजिद खोत यांच्यासह बोरिवली ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
बोरिवली येथील विविध ठिकाणी घरांवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा तिरंगे झेंडे लावण्यात आले होते. यावेळी बोरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एकूण आठ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोरिवली येथील बीएलओंनी मतदार यादीशी संबंधित कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूहगीते तसेच नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल, बोरिवली-पडघा, के.एम.ई.एस. हायस्कूल, पडघा-बोरिवली, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, बोरिवली-पडघा, इक्रा इस्लामिक स्कूल व मकतब, पडघा उर्दू हायस्कूल (सेमी इंग्लिश), बी.एस.ए. इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा आनंदनगर आणि जिल्हा परिषद मराठी शाळा समतानगर या शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना प्रकर्षाने दिसून आली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांचा उत्साह, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा सन्मान, बीएलओंचा गौरव आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे बोरिवलीतील स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
No comments:
Post a Comment