संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल !!
नवी मुंबई : प्रतिनिधी
माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा समाजोपयोगी उपक्रमांची अनोखी परंपरा पाहायला मिळाली. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता समाजहिताच्या कार्यासाठी समर्पित करावा, या त्यांच्या आवाहनाला कार्यकर्ते, हितचिंतक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सेवाभावी उपक्रम राबविले.
शहरातील विविध भागांमध्ये स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री सेवा महिला मंडळ आणि सानपाडा ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना योग साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्यासाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भाजपा प्रभाग क्रमांक ५, ऐरोली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. भाजपा दिघा मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. श्री मा फाउंडेशनच्या माध्यमातून वाशी महापालिका रुग्णालयात गरजूंसाठी मोफत व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. याचबरोबर प्रभाग क्रमांक २१-ब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा कोपरखैरणे मंडळातर्फे वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा प्रभाग २१, नेरूळ यांच्या वतीने नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. भाजपा सानपाडा विभागातर्फे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे, दिव्यांगांसाठी सहाय्यभूत साहित्य वाटप, रुग्णालयांमध्ये आवश्यक वस्तूंचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सत्कार, अन्नदान, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अशा अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन विविध भागांत करण्यात आले. कुठे आरोग्य शिबिरे, कुठे अन्नदान, तर कुठे महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रशिक्षण उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सार्वजनिक जीवनातील नेतृत्वाची खरी ताकद समाजाला प्रेरणा देण्यात असते. संदीप नाईक यांच्या एका आवाहनातून सेवाभावी उपक्रमांची साखळी उभी राहिल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले. सत्कारापेक्षा समाजकार्य आणि उत्सवापेक्षा लोकहिताला प्राधान्य देत कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केल्याने हा दिवस समाजातील सकारात्मक ऊर्जेला दिशा देणारा, लोकसहभाग वाढविणारा आणि सेवाभावाची परंपरा अधिक बळकट करणारा सामाजिक उत्सव ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment