डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांसाठी आठवडाभर मोफत रेबीज लसीकरण मोहीम !!
डोंबिवली, राजू नलावडे : रेबीजचा धोका कमी करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी मोफत अँटी-रेबीज लसीकरण मोहीम डोंबिवलीत ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनतर्फे या आठवडाभराच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व व पश्चिमेसह रीजन्सी अनंतम/इस्टेट, पलावा आणि रुणवाल परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.
या उपक्रमात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन, शाळा-महाविद्यालये, NSS पथके, पशुवैद्यकीय विद्यार्थी आणि प्राणीप्रेमी सहभागी होणार आहेत.
मोहिमेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींनी आपल्या परिसरातील लसीकरण आवश्यक असलेल्या भटक्या कुत्र्यांची अंदाजे संख्या आयोजकांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे आठवडाभराचे दिवसनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
मोहिमेचे समन्वयक डॉ. मनोहर अकोले यांच्याशी ९८२१०४०३३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. किशोर अढळकर आणि प्रकल्प प्रमुख श्री कल्पेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment