पुण्यातील डॉल्बीविरोधी कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अंनिसकडून तीव्र निषेध; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी !!
_प्रतिनिधी_ *(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*
*पुणे/ठाणे* पुण्यात डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करत विवेकी आणि पर्यावरणपूरक भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत, राजेश देवरुखकर, ॲड. तृप्ती पाटील, मच्छिंद्रनाथ मुंडे, सुशीला मुंडे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, डॉल्बीच्या वापराला विरोध करत विद्यानंद बापट हे अतिशय स्पष्टपणे, मुद्देसूदपणे आणि संदर्भांसह आपली भूमिका मांडत होते. त्यांच्या या विवेकी भूमिकेला वैचारिक उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर मारहाण करून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करणे हा लोकशाही मूल्यांचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान आहे.
"आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट वारंवार दिसून येते की, धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि रूढींना प्रश्न विचारणाऱ्या, शंका उपस्थित करणाऱ्या व्यक्तींना वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी हिंसेने गप्प करण्याचे प्रयत्न झाले आहेत. गौतम बुद्धांच्या विचारांना विरोध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कट रचले गेले. महात्मा ज्योतिराव फुले यांना ठार मारण्यासाठी मारेकरी पाठवले गेले. महात्मा गांधींची हत्या झाली. आणि आधुनिक काळात हा हिंसक प्रवाह डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत येऊन पोहोचला. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नसेल, तर हिंसेचा आधार घेणे ही विवेकविरोधी मानसिकतेची लक्षणे आहेत," असे अंनिसने म्हटले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण, पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत न्यायालयांनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी मार्गदर्शक भूमिका आणि निर्देश दिलेले आहेत. विद्यानंद बापट यांची भूमिका याच व्यापक पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिकेशी सुसंगत आहे.
म्हणून शासनाने स्वतःच्या कायदेशीर आणि पर्यावरणपूरक भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश द्यावा की, हिंसेला कोणत्याही परिस्थितीत माफी नाही, अशी मागणीही करण्यात आली आहे.
*मागण्या:*
*1.* या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी.
*2.* त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
*3.* विवेकी भूमिका मांडणाऱ्या नागरिकांना शासनाने संरक्षण द्यावे.
या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसला असून, या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment