Friday, 30 October 2026

डाऊन सिंड्रोम असलेल्या पार्थची जिद्द, ७ वर्षीय आदीचा नवा विक्रम; सख्ख्या भावांची १८ किमीची समुद्री भरारी! !!

डाऊन सिंड्रोम असलेल्या पार्थची जिद्द, ७ वर्षीय आदीचा नवा विक्रम; सख्ख्या भावांची १८ किमीची समुद्री भरारी! !!

*उरण, विठ्ठल ममताबादे (दि. ३०) :* जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य काहीच नसते, हे उरणमधील दोन सख्ख्या भावांनी सिद्ध केले आहे. एलिफंटा लेणी (घारापुरी) ते नागाव-पिरवाडी बीच (उरण) असे तब्बल १८ किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पार्थ निशांत पाटील आणि आदी निशांत पाटील या भावंडांनी इतिहास रचला आहे.

डाऊन सिंड्रोम असलेल्या १३ वर्षीय पार्थने ६ तास ५७ सेकंदात हे आव्हान पूर्ण करून प्रेरणा दिली, तर अवघ्या ७ वर्षीय आदीने ५ तास ५६ मिनिटांत हा टप्पा पार करून हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा विक्रम केला आहे.

पार्थ हा सीबर्ड स्पेशल स्कूल, उरणचा विद्यार्थी असून आदी सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकतो. शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता दोघांनी घारापुरीहून पोहण्यास सुरुवात केली आणि नागाव-पिरवाडी बीचवर यशस्वीरीत्या किनारा गाठला.

*पार्थची प्रेरणादायी कामगिरी*
डाऊन सिंड्रोम असलेल्या पार्थने सलग ६ तास ५७ सेकंदात समुद्रात पोहत १८ किमी अंतर पूर्ण केले. विशेष गरजा असलेल्या मुलांमध्येही अफाट क्षमता असते आणि योग्य संधी, प्रशिक्षण मिळाल्यास ते मोठे यश मिळवू शकतात, हा संदेश त्याने दिला. हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा तो महाराष्ट्रातील पहिला डाऊन सिंड्रोम असलेला जलतरणपटू ठरला आहे.

*आदीचा विक्रम*
७ वर्षीय आदीने केवळ ५ तास ५६ मिनिटांत हा आव्हानात्मक मार्ग पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वयात इतका लांब समुद्री टप्पा पूर्ण करणे ही अत्यंत दुर्मिळ कामगिरी मानली जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून दोघेही उरण म्युनिसिपल कौन्सिल आणि महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर ॲक्वॅटिक असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये पदके मिळवत आहेत.

या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय सी-स्विमिंग कोच संतोष पाटील आणि स्विमिंग कोच विजय बेहेरा यांचे मार्गदर्शन लाभले. निरीक्षक म्हणून सुनील मयेकर आणि निल लब्दे, तर विंडसर्फिंग गोल्ड मेडलिस्ट राज पाटील आणि साई पाटील यांचे सहकार्य लाभले.

या यशामागे वडील निशांत पाटील आणि आई संपदा पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे. भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न दोन्ही भावांनी बाळगले आहे.

No comments:

Post a Comment

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...