Friday, 23 May 2025

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            सदिच्छा सामाजिक विकास संस्था च्या वर्धापन दिन व बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधत नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दलित पँथरचे नेते कीर्ती ढोले यांचे प्रभावी व ज्वलंत भाषण. कीर्ती ढोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजासाठी काम करणाऱ्यांच्या कार्याची कृतज्ञतेने दखल घेतली पाहिजे. त्यांना बळ मिळाले पाहिजे. त्यांच्या चळवळीला ताकद मिळाली पाहिजे.”
         ते पुढे म्हणाले, “आजच्या परिस्थितीत आपण लोकशाहीच्या गंभीर संकटातून जात आहोत. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ वैचारिक नाहीत, तर मानवतेचा मार्ग दाखवणारे आहेत. माणसं जगवणं हे त्यांचं ध्येय होतं, मारणं नाही. ”भारतातील लोकशाहीवर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत, ढोले म्हणाले, “नेत्यांना बदनाम करण्याचे कट रचले जात आहेत. हे थांबवायचे असेल, तर आंबेडकरी विचारांशी निष्ठा ठेवत प्रश्न विचारण्याचे आणि चुकीला विरोध करण्याचे धैर्य आपल्यात पाहिजे. ”त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रबोधन आजही गरजेचे आहे. बाबासाहेबांनी सर्वांचे प्रबोधन केले, आता त्यांचे अनुयायी पुढे येणे गरजेचे आहे.”
            कार्यक्रमाच्या शेवटी कीर्ती ढोले यांनी सदिच्छा सामाजिक संस्थेला मनापासून शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आयु. तजीलाबाई खैरमोडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समाजहितासाठीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
               यावेळी इतर मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी राजेंद्र नायकर, ए. रविचंद्रन (समाज गौरव पुरस्कार), मनोहर मोरे (समाज भूषण पुरस्कार), राहुल भंडारे (कलावैभव पुरस्कार), आणि पल्लवी जाधव व चैतन्य जावळे (धम्म प्रेरणा पुरस्कार) यांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील कांबळे ,सचिव शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी केले होते. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, प्रतिनिधी : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली  हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

🔶 सहल तपशील -
          सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
          शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
          कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
          प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
          प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग -
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई.
 
🏰 प्रमुख स्थळांची माहिती -
          रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
          लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
          कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
          शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
          भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
          प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
          कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
          पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
 
💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): -
            उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३एसी), सुपीरियर (२एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: -
          भारत गौरव ट्रेनने प्रवास 
          वातानुकूलीत/ विनावातानुकूलीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
          सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड
          ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन
          प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)
          सुरक्षा व्यवस्था.

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: -
          साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.
          खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
          इतर कोणताही वैयक्तिक खर्च.
          कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): -
          पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.
          दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).
          तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.
          चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.
          पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.
          सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संकेतस्थळ- www.irctctourism.com

उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करा !!

उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करा !!

                              अशोक दामू भोईर / न्हावा रायगड

           अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण नेरुळ तसेच उरण - बेलापूर लोकल सेवा दिनांक १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला उरण चा औद्योगिक विकास झाल्याने नोकरवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा प्रवास अति जलद झाला.प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
           उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो इत्यादी साठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो. नेरूळ - बेलापूर - उरण रेल्वे मार्ग पुर्ण झाले आहे. मात्र दर एका तासाने रेल्वे असल्याने हा रेल्वेमार्ग लोकल न वाटता शटल सारखी वाटते.
             लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी, तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील प्रवाशी करत आहे. आणि ते बरोबर पण आहे.कारण हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, संबंधित रेल्वे विभाग, रेल्वे मंत्रालय यांनी या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा.
          उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी याला कारण उरण, बामन डोंगरी, खारकोपर एकंदर सर्वच स्टेशन वरील प्रवाशांची वाढती संख्या आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब, चाकरमानी मुंबई नवी मुंबई येथे घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरने जाहीर केले होते लोकलसेवा प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या जातील मात्र आजवर तसं झाले नाही.
          कामाला जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून बहुतेक नोकरवर्गाने आपली कमाई, कर्ज काढून उरण नेरुळ मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडमध्ये घरे घेतली आहेत, परंतु उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या प्रत्येक तासाला असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या ह्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा उशिरा कामावरून उशीर झाल्यास प्रवाशाला त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करून प्रवाशांना त्रासमुक्त करावे.

सौजन्य -
शांताराम गुडेकर (जेष्ठ पत्रकार)

महापालिकेची जागा बळकावण्याचा प्रकार.....

महापालिकेची जागा बळकावण्याचा प्रकार.....

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा श्रीप्रस्था येथिल म्हाडा रोड जवळ महापालिकेच्या मालकीची जागा बळकावली जात आहे. तेथे अनधिकृत कंटेनर मध्ये भव्य ऑफीस सुरू करून संबंधित जागा लाटण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिकेने याबाबत ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केला.

या जागेची बाजारभावानुसार लाखो रूपये   इतके मूल्य होत असल्याचा दावा रूचिता नाईक  यांनी  केला.संबंधित जागा बळकावत तेथे अनधिकृत कंटेनर उभे केल्याची तक्रार  महापालिकेकडे केली  दोन वेळा नोटीस बजावूनदेखील अतिक्रमण हटवलेले नाही, प्रभाग समिती ई अनधिकृत विभाग यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार रूचिता नाईक यांनी केली आहे.

श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी) व मित्र परिवार आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी) व मित्र परिवार आयोजित दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !! 

*** संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झालेल्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक...

पेण (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या शैक्षणिक वाटचालीतील दहावी - बारावी बोर्ड परीक्षेचा टप्पा करिअर दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जातो. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संकटाशी सामना करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते हि वस्तुस्थिती आहे. 

यावर्षी अशाच खारेपाट पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी स्वतः च्या जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर व पालक, शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून  दहावी बारावी परीक्षेत सुयश प्राप्त करून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करून  गावाचे नाव देखील प्रकाशात आणले अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या सद्हेतूने  श्री दत्ता म्हात्रे सर (मंत्रीवाडी, वढाव/ रायगड) व मित्र परिवार यांच्या वतीने रविवारी १८ मे २०२५ रोजी पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून वाहतुकीची सुविधा नसल्याने कित्येक मैल पायी प्रवास करून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंत्री वाडी या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर गणगौरव सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील एकूण ५० पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह तसेव भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर आपण कोणते क्षेत्र निवडावे, करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक म्हणून M.D. कॉलेज रूपारेल चे प्राध्यापक तसेच जर्मनी येथे व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून काम करत असलेले सन्मा. डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुभाष म्हात्रे ( PhD), डॉक्टर आशीर्वाद मोकल, सत्यविजय ठाकूर यांनी विविध क्षेत्रातील करिअर संदर्भात तसेच ITI शिक्षक श्री.मनोज पाटील सर यांनी आयटीआय मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे निवेदन श्री सुहास म्हात्रे, स्मिता लोंढे व स्वतः आयोजक दत्ता म्हात्रे यांनी केले .अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण वाशी विभागामध्ये प्रथमच झाल्याने आयोजकांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Thursday, 22 May 2025

सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द !

सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द !

मुंबई, कविराज चव्हाण : डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधु पुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील.

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.

Wednesday, 21 May 2025

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

मुंबई, (उत्कर्ष गुडेकर) :
         रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली -रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी वृत्तपत्रलेखक /पत्रकार--शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O) यांची जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड करण्यात आली आहे. गुडेकर यांना हा पुरस्कार शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता भवन राजपुरिया हॉल, पहिला माळा, जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्टेशन जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ट्रॉमा हॉस्पिटल जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई -६० येथे प्रमुख पाहुणे सन्मा.डॉ एम डी वळंजू (जोगेश्वरी भूषण ), प्रदीप जोशी (शिक्षकेतर कर्मचारी नेते), अविनाश दौंड (कामगार नेते), अँड. सि. रुषिला रिबेलो (कौन्सिलर मार्गदर्शक ), जगदीश जायले (वकील उच्च न्यायालय मुंबई ), वसंत ढोबळे (Ex ACP Mumbai), फादर निकी डीकोस्टा ( प्रिन्सिपॉल STHS) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना जीवनगौरव पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
                शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते. त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात. कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र, आदर्श समाजसेवक, समाजरत्न, दक्ष नागरिक, कोकण भूषण, वृत्तदिप पुरस्कार, महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम  गुडेकर यांना "स्थानिक हिरो" सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.

          शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत. अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत. शांत्ताराम गुडेकर यांची आदर्श पत्रकार -२०२५ साठी निवड झाल्याबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे अध्यक्ष श्री. संजय कोकरे आणि मुंबई/कोकण पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक संस्था, प्रतिष्ठान, संघ व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वृत्तपत्रलेखक संघटना, पत्रकार मंडळीच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

          जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) सामाजिक उपक्रम साजरे करण्यासाठी मुंबई सह कोकण विभागात अग्रेसर आहे. त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप मधील अनेकजण सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येतात व यामुळे नक्कीच समाजातील गोर-गरीब, वंचित घटकांना आम्ही सहकार्य करू शकतो व या सेवेचा आनंद ग्रुपमधील सर्वजण घेत असतात.. जॉय ऑफ गिविंग म्हणजेच दुसऱ्याला देण्यातला आनंद हा ग्रुपचा जो उद्देश आहे, तो यामुळे सफल होत असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी सांगितले. विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा गौरव करणे हा सुद्धा वर्धापन दिनानिमित्त त्याचाच एक भाग आहे. तरी या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक -श्री.गणेश हिरवे (संस्थापकअध्यक्ष), शीला येरागी (उपाध्यक्षा), असुंता डिसोझा (कार्याध्यक्ष), छाया राणे (सचिव), समीर परब (कोषाध्यक्ष) यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...