Monday, 16 June 2025

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

नवीन पनवेल/केतन भोज

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम १५ जून रोजी नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे विश्वस्त अजय कापरे यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री.बाळाराम पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते १०० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले, "विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठावे. अशा सन्मानाने विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते. "तसेच कार्यक्रमा वेळी नवनाथ साबळे माजी गटशिक्षणाधिकारी यांनी मुलांनी मोबाईलचा योग्य तो वापर करावा आणि आपल्या करिअर साठी त्याचा फायदा करावा असे सूचक माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला भरत जाधव नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक, महेश पाटील अध्यक्ष लक्ष्मी पब्लिक स्कूल, जेके कुंभार सर माझी पर्यवक्षक बाठीया स्कूल, सुरेश पाटील माजी मुख्याध्यापक के व्ही कन्या हायस्कूल, विलास फडके माजी जिल्हा परिषद सदस्य पनवेल, प्रकाश म्हात्रे जिल्हाचिटणीस शेकाप, माजी नगरसेविका नीता माळी, अनंत वारे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल, देविदास गायकवाड अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब, किरण बाथम संपादक डेली टाइम्स 7, पत्रकार सुनील भुजबळ, अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा संपादक, सुरेश भोईर कार्यकारी संपादक दैनिक युवक आधार, विलास गायकवाड उपसंपादक दैनिक युवक आधार, विजय दूंद्रेरेकर कोकण विभाग प्रमुख दैनिक युवक आधार, आदि उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन दिग्दर्शक विशाल सावंत यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी बबन बारगजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शिवदास आमले, सचिव दिलीप कोकाटे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे, अजय कापरे, प्रशांत गांगर्डे, बबन बारगजे, अशोक घनवट, अण्णा शिंदे, शरद घुले, बाळा झोडगे, बबन खीळदकर, बाळू शेळके, दादासाहेब घालमे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रमाला अल्पोपहार  प्रशांत गांगर्डे यांच्या वतीने देण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर संयोजन मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.

भिवंडीतील वळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील ९ केमिकल गोदामे जाळून खाक, लगत असलेल्या गोदामानाही लागली आग !!

भिवंडीतील वळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील ९ केमिकल गोदामे जाळून खाक, लगत असलेल्या गोदामानाही लागली आग !!

भिवंडी (कोपर), अरुण पाटील दिं,१६.

        भिवंडी तालुक्यातील गोडाऊन पट्ट्यात असलेल्या वळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल गोदामाला भीषण आग लागून नऊ गोदामे जाळून खाक झाली आहेत तर त्या आगीची झळ लागून लगत असलेल्या इतर गोदामेही जळालेली आहेत. त्यामुळे केमिकल गोदामांचा सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

        भिवंडी तालुक्यात सर्वात जास्त केमिकल गोदामे ही नारपोलि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपर गाव, पूर्णा गाव, राहणाल गाव व वळगाव ग्रामपंचायत हद्दीत जास्त प्रमाणावर आहेत. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे अशिक्षित व अनुभवी नसल्या कारणाने केमिकल चढवताना व उतरवताना सुरक्षितता व योग्य उपाय योजना "न"बाळगता हाताळल्याने गळती होऊन अशाप्रकार अपघात घडत असतात.

       या केमिकल गोदामानमुळे मानवी जीवितास व प्राणी मात्रस धोका निर्माण होत आहे .तसेच या अनधिकृत /बेकायदेशीर केमिकल गोदामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन ग्रामस्थांमध्ये विविध श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडले जात आहेत.
       अश्या प्रकारे केमिकल /रसायने व रासायनिक पदार्थ साठवणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीचा "ना "हरकत दाखला (NOC) घेणे बंधनकारक असताना देखील ग्रामपंचायत सरपंच/कमिटी या गोष्टीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना या  परिसरात नेहमी घडत असतात. तसेच महाराष्ट्र नियंत्रक विस्फोटक मंडळाची परवानगी,प्रदूषण मंडळाची परवानगी व इतर आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असताना देखील हे गोडाऊन मालक /चालक अशा कोणत्याच परवानग्या घेत नसल्याचे समोर आले आहे.
       त्यामुळे हा सर्व प्रकार चोरून/बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचे सिद्ध होत असल्याने नारपोली पोलिस ठाणे व संबंधित खात्याने या सर्व बेकायदेशीर ,अनधिकृत सुरू असलेल्या केमिकल गोदामांवर  कारवाई करून "सील"  करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

Saturday, 14 June 2025

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

[ निवोशी | गुहागर : उदय दणदणे ]

भविष्यातील पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आज वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे,त्यामुळे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे आदर्श व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक चळवळीचे प्रेरणेते, जेष्ठ समाजसेवक तसेच श्री गजानन विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण होरंबे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवार  दिनांक १४ जून २०२५ रोजी श्री गजानन विद्यामंदिर- निवोशी प्राथमिक शाळा परिसरात उपरोक्त मंडळाचे प्रतिनिधी मोहन धावडे यांच्या संकल्पनेतून श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी ) संलग्न:युवा मित्र मंडळाच्या वतीने वृक्षरोपण उपक्रम राबवून समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांना वाढदिवसाच्या आगळीक अशा स्नेह शुभेच्छा देण्यात आल्या, निवोशी अंगणवाडी व प्राथमिक शाळा ह्या ठिकाणी सदर उपक्रम संपन्न झाला.

गुलमोहर, बदाम, अशोक,  पिंपळ अशी विविध झाडे युवा मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप होरंबे यांनी मुंबई येथून आणली, युवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल रावणंग,‌ सेक्रेटरी लव ठोंबरे सह अरविंद धावडे, निलेश अवेरे, संदिप होरंबे, सुजित रांजाणे, अंकुश ठोंबरे, सखाराम सोलकर, सुनिल सोलकर, लक्ष्मण मांडवकर, शांताराम मांडवकर, नारायण अवेरे, कु. शुभम मांडवकर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका वैशाली घाणेकर, मदतनीस रश्मी धावडे तसेच ममता अवेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली कु.आदिती ठोंबरे, मनस्वी ठोंबरे, आर्यन पिंपळे, सोहम अवेरे, पुनम होरंबे, सेजल सोलकर या शालेय विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते सदर वृक्ष रोपे लावण्यात आली व उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला यांनी वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला. संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेत एक-एक वृक्षाची देखभाल पालनपोषण करण्याचा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी ) संलग्न:युवा मित्र मंडळ, महिला व ग्रामस्थांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून ह्या आगळीक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Friday, 13 June 2025

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

* घरघर शौचालय स्मार्ट सिटी स्वच्छ भारत योजना कागदावरच

कल्याण, संदीप शेंडगे - मोहने येथील लहुजी नगर येथील २ हजार ५०० नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर सौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास मजबूर आहेत. विशेषतः महिलांना यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. लहुजी नगरच्या अडीच हजार हून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये जर एकही शौचालय नसेल तर नागरिकांनी जायचे कुठे पालिका नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तीनशे रुपयांची वाढ केली असून त्या पैशाचं पालिका काय करते नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

*प्रशासनाचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक अन्याय?*

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. स्थानिकांनी यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलने केली, तरीही योजनेच्या नावाखाली केवळ आकडेमोड व जाहिरातींचा दिखावा सुरू आहे.

‘घर घर शौचालय’ योजना कुठे गेली?

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘घर घर शौचालय’** योजनेच्या अनेक उद्घाटन सोहळ्यांनंतर देखील लहुजी नगरमधील वास्तव बदललेले नाही. शौचालये नसल्यामुळे अनेक आजारांनी येथे उगम घेतला असून, लहान मुले वयोवृद्ध नागरिक अनेक आजारांनी त्रस्त झाले आहेत रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत.

महानगरपालिकेकडून वारंवार “जागेअभावी” किंवा “अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा” असे कारण सांगितले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांत एकच शौचालय बांधण्यात आले होते तेही तीन वर्षांपूर्वी अचानक कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात परंतु या ठिकाणी शौचालय उभारणी करून देत नाहीत असे कल्पना पायाळ यांनी सांगितले.

लहुजी नगरसारख्या ७५ वर्ष जुन्या आणि मागास वस्तीच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा स्थानिकांनी व्यापक रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Wednesday, 11 June 2025

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !

 मुंबई (शांताराम गुडेकर) :

            आगासन गाव येथील शांत, सरळ व्यक्तिमत्व असणारे पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे  बुधवारी ११ जून  रोजी अल्प आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीताबाई पांडुरंग मुंडे, मुले चिंतामण, उदय, प्रदीप, बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नेहमीच शांत स्वभाव असणारे , तसेच सर्वांशी आपुलकीने वागणारे पांडुरंग  यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने मुंडे परिवार व आगासन ग्रामस्थांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. आगासन येथील समश्यानभूमीत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात मुंडे  कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक २० जून रोजी आगासन येथील गणेश घाट येथे होणार असून उत्तरकार्य तेरावा विधी दिनांक २३ जून रोजी मुक्काम आगासन पोस्ट दिवा, तालुका जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Tuesday, 10 June 2025

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर !!

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर !!

** शाहीर मधुकर खामकर,निर्माते उदय साटम यांच्यासह अनेकांचा समावेश

मुंबई, (शांताराम गुडेकर) ::

            लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
        या सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत, तर लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी - २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
            तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहे असे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.

"जॉय" चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

"जॉय" चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

मुंबई, (पी. डी.पाटील) : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य जॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता विद्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, ऍड जगदीश जायले, डॉ महेश अभ्यंकर, सत्येंद्र सामंत, ऍड रूशीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मान केला. शुद्ध आणि प्रामाणिक भावना ठेवून जॉय कार्य करीत असल्याने यासारखी अनेक संस्था निर्माण व्हायला हव्यात असे दौंड म्हणाले. यावेळी अस्मिता चे संस्थापक दादा पटवर्धन शिक्षकांचे नेते जनार्दन कांगळे सर, तसेच ज्येष्ठ वृत्त पत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...