Thursday, 29 October 2026

चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान २०२६-२७’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान २०२६-२७’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधाऱ्यांची उभारणी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पुढाकार*

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

   राज्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, शेतीसह नद्या, पऱ्या आणि नाल्यांमधील पाणीसाठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे अभियान २०२६-२०२७’ अंतर्गत कळंबट गावात जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले.
       कळंबट येथील गडग्याचा पऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन बंधारे बांधण्यात आले. कुणबी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळंबट येथील विद्यार्थी व शिक्षक, ग्रुप ग्रामपंचायत कळंबट-केरे-घवाळेगावचे सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
      पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून ठेवणे, भूजलपातळी वाढविण्यास मदत करणे आणि परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे, या दृष्टीने बंधाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे लोकसहभागातून होणारे जलसंधारणाचे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात.
    या अभियानात कळंबट हायस्कूलचे शिक्षक महेंद्र शिरकर सर, सतीश जाधव, संतोष बळकटे, रवींद्र कोकमकर, सौ. साळुंके मॅडम, प्रशांत पोवार, सीताराम बारगोडे, भुवड सर आणि कल्पेश कोकमकर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, तसेच गावातील ग्रामस्थ बबन गमरे, सुधाकर केळकर, शरद शिरकर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मंजू कोकमकर, छाया घवाळे, अलका लिंगायत आणि आरोग्य सेविका यांनीही या उपक्रमात सहकार्य केले.
    शासनाच्या अभियानाला स्थानिक पातळीवर लोकसहभागाची जोड मिळाल्याने कळंबट गावात जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि जलसाक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत कळंबट ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी एकजुटीचे दर्शन घडविले. भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थी, गरोदर महिला व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डब्यांची मागणी, मंत्री आदिती तटकरे यांची सकारात्मक दखल !!

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थी, गरोदर महिला व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डब्यांची मागणी, मंत्री आदिती तटकरे यांची सकारात्मक दखल !!

*हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडणार*

प्रतिनिधी -  निलेश कोकमकर
*मुंबई :* मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शालेय विद्यार्थी, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबे सुरू करण्याची मागणी आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळ आणि कुणबी युवा शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री मा. आदितीताई तटकरे यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित आयुक्तांना या विषयात जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई लोकलमध्ये स्वतंत्र किंवा विशेष डबे सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने शिफारस करण्यासह सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे निर्देश दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. याशिवाय, येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित करण्याच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुंबईची लोकल सेवा ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, प्रचंड गर्दी, गाडीत चढण्या-उतरण्याची धावपळ आणि लोकलमधून प्रवास करताना निर्माण होणारे धोके यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. विशेषतः शाळेत जाणारे विद्यार्थी, त्यांच्यासोबत प्रवास करणारे पालक, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

*मुंबई लोकल अपघातांचे भीषण वास्तव:*  या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कुणबी महिला मंडळ आणि कुणबी युवा शिक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या (GRP) अधिकृत आकडेवारीचा दाखला देत अपघातांचे भीषण वास्तव खालीलप्रमाणे मंत्र्यांसमोर मांडले:  

*वार्षिक जीवघेणे अपघात:* मुंबई लोकलच्या संपूर्ण जाळ्यावर प्रत्येक वर्षी सरासरी २,२०० ते २,५०० प्रवाशांचा अपघातात मृत्यू होतो, म्हणजेच दररोज ६ ते ७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो.  

*अमानुष गर्दीचा फटका:* एकूण अपघातांपैकी रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात सोडल्यास, दरवर्षी ५०० ते ६०० प्रवाशांचा मृत्यू हा केवळ सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत (Peak Hours) चालत्या लोकलधून खाली पडून किंवा लोकल पकडण्याच्या गडबडीत होतो.  

*महिला व बालकांचे मोठे प्रमाण:* मुंबई लोकलच्या एकूण प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण २५% आहे. रेल्वे अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी २०० ते २५० महिला प्रवाशांचा मृत्यू होतो, ज्यातील ६०% पेक्षा जास्त अपघात हे गर्दीमुळे गाडीतून बाहेर फेकले गेल्याने किंवा लोकल पकडताना होतात.  

*विद्यार्थ्यांचे धोक्यात आलेले बालपण:* शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा नोकरदारांच्या कार्यालयीन वेळेत येत असल्याने, पाठीवर जड दप्तर घेऊन प्रवास करणाऱ्या १०० ते १५० लहान मुलांचा व शालेय विद्यार्थ्यांचा दरवर्षी या गर्दीत बळी जातो. मुंबईत विद्यार्थ्यांच्या रेल्वे अपघाताचे प्रमाण ११% आहे, जे देशाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पाठीवर जड दप्तर घेऊन गर्दीच्या लोकलमधून प्रवास करावा लागतो. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा अनेकदा कार्यालयीन वेळांशी जुळत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही गर्दीतून सुरक्षितपणे प्रवास करणे आव्हानात्मक ठरते.या पार्श्वभूमीवर स्वतंत्र डब्यांची व्यवस्था केल्यास संबंधित प्रवाशांना अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि गर्दीचे योग्य विभाजन होण्यास मदत मिळेल. 

आजचे शालेय विद्यार्थी हे देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांनी देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. गरोदर महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार होणे आवश्यक आहे. या सर्व घटकांचा प्रवास सुरक्षित करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. स्वतंत्र डब्यांची व्यवस्था झाल्यास गर्दीचे विभाजन होऊन अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दीपिका आग्रे आणि कुणबी युवा शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. निलेश कुळये यांनी मांडली. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी आयोजित भेटीदरम्यान कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे खजिनदार श्री. महेश शिर्के, कुणबी महिला मंडळाच्या कायदेविषयक विभागप्रमुख ॲड. रूपाली खळे, कुणबी युवा मुंबई वैद्यकीय विभागप्रमुख श्री. निलेश कोकमकर, शाखा तालुका रत्नागिरीचे उपाध्यक्ष श्री. एकनाथ निंबरे, ॲड. संदीप आग्रे, युवा पदाधिकारी श्री. कैलास शिंदे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या लढ्याला मोठे बळ मिळाले असून, आता लवकरच लोकल प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

मुंबईच्या रंगांची उधळण चित्रकलेतून करा; MTDC तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन !!

मुंबईच्या रंगांची उधळण चित्रकलेतून करा; MTDC तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन !!

मुंबई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण : 

मुंबईचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, सण-उत्सव आणि आधुनिकतेचे विविध पैलू विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बहुरंगी मुंबईची रंगबेरंगी गोष्ट!’ ही संकल्पना असलेल्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून, मुंबईच्या पर्यटनवैभवाची ओळखही अधिक दृढ होणार आहे.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले आहेत. गट अ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुंबईची प्रसिद्ध पर्यटनस्थळे’ हा विषय देण्यात आला आहे. गट ब मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘मुंबईतील सण आणि उत्सव – विविधतेत एकता’ या विषयावर चित्र साकारायचे आहे. तर गट क मध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मुंबई – वारसा आणि आधुनिकतेचा संगम’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी A3 आकाराचा कागद वापरणे बंधनकारक असून, केवळ हस्तचित्रित कलाकृती स्वीकारल्या जाणार आहेत. AI च्या साहाय्याने तयार केलेली चित्रे स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. चित्रकलेसाठी कोणतेही माध्यम वापरण्याची परवानगी आहे.

स्पर्धकांनी आपल्या चित्राची स्कॅन केलेली प्रत mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवायची आहे. ई-मेलमध्ये स्पर्धेचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच चित्राची मूळ प्रत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुख्यालय, तिसरा मजला, ओरिएंटल बिल्डिंग, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) इमारतीवर, आझाद मैदान, फोर्ट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवावी.

चित्रकृती पाठविण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२५७१७५२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुंबईच्या ऐतिहासिक वारशापासून आधुनिक महानगराच्या बदलत्या रूपापर्यंतचे विविध पैलू चित्रांतून मांडण्याची संधी या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कल्पनाशक्तीला रंग देत मुंबईच्या वैभवाची रंगबेरंगी गोष्ट साकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्णेकर हत्याप्रकरणावरून राजकारण तापले; म्हस्केंच्या वक्तव्यावरून ठाकरे गट आणि भाजप आक्रमक !!

पूर्णेकर हत्याप्रकरणावरून राजकारण तापले; म्हस्केंच्या वक्तव्यावरून ठाकरे गट आणि भाजप आक्रमक !!

*कल्याण, प्रतिनिधी:* प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणावरून खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

"एकनाथ शिंदे यांच्याविषयी ठाण्यात येऊन अद्वातद्वा बोलला तर सुखासुखी परत जाऊ दिले जाणार नाही," असा इशारा म्हस्के यांनी दिला होता. त्यावर ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी "पोलीस संरक्षण काढून कुठे आणि कधी भेटायचे ते सांगा," असे खुले आव्हान देत म्हस्के यांच्यावर पलटवार केला.

दुसरीकडे युतीधर्म बाजूला ठेवत डोंबिवलीतील भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही म्हस्केंना टोला लगावला आहे. "पूर्णेकर कुटुंबीय शोकसागरात असताना राजकारण करू नये, घटनेचे गांभीर्य ओळखून भान ठेवून बोलावे. अपघाताने झालेले खासदारांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे," असे म्हात्रे यांनी समाजमाध्यमावर लिहिले आहे.

या प्रकरणाला आता राजकीय वळणासोबतच आगरी-कोळी असा जातीय रंगही येत असल्याने सत्ताधारी भाजपमधूनही म्हस्केंवर टीका होत आहे.

*पूर्णेकर हत्याकांडात कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पण शिंदेंना बदनाम केल्यास जशास तसे उत्तर देऊ - आमदार राजेश मोरे*

*पूर्णेकर हत्याकांडात कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पण शिंदेंना बदनाम केल्यास जशास तसे उत्तर देऊ - आमदार राजेश मोरे*

*डोंबिवली, प्रतिनिधी :* ठाण्यातील बहुचर्चित पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळालाच पाहिजे, मात्र या हत्याकांडाच्या निमित्ताने जर कोणी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, असा थेट इशारा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांना दिला.

डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार मोरे म्हणाले, "पूर्णेकर हत्याकांडाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा होणारच आहे. मात्र या हत्याकांडाचा आधार घेऊन जर कोणी शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल."

"आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या दैवताची बदनामी आणि त्यांच्यावर लावले जाणारे बिनबुडाचे आरोप अजिबात सहन केले जाणार नाहीत. आम्हाला आमदारकी किंवा नगरसेवक पदापेक्षा शिवसेना अधिक प्रिय आहे," असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, रवि पाटील, नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, 28 October 2026

२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी !!

२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ)वतीने मंगळवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले. वेतन, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांकडून होणारा अन्याय आणि प्रलंबित आर्थिक लाभ या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजता कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला.

महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. दुपारी झालेल्या बैठकीत संघटनेने मांडलेल्या मागण्यांवर चर्चा झाली.

पगारातून रिफंडच्या नावाखाली पैशांची मागणी करणे किंवा कामावरून कमी करण्याची धमकी देणे,अशा तक्रारी लेखी स्वरूपात प्राप्त झाल्यास चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधित कंत्राटदारांचा काळ्या यादीत समावेश करण्याची भूमिका प्रशासनाने मांडली.

कंत्राटी कामगारांच्या वारंवार बदल्यांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेवर आणि प्रलंबित वीज देयकांच्या वसुलीवर परिणाम होत असल्याचे संघटनेने सांगितले. या विषयावर दिवाळीनंतर संचालक स्तरावर बैठक घेण्याबाबत चर्चा झाली.

न्यायालयीन संरक्षित कामगारांची नावे स्थानिक पातळीवर संपर्क पोर्टलवरील नोंदी तपासाव्यात,असे आवाहन करण्यात आले.

कामगारांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा करण्याबाबत चर्चा झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सॅलरी अकाउंटसह विमा योजनेचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हरियाणा पॅटर्न कंत्राटी कामगार व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती हरियाणा दौऱ्यावर पाठविण्याबाबत चर्चा झाली. एका विभागात एकच कंत्राटदार असावा, अशी मागणी संघटनेने केली.

क्रिस्टल आणि स्मार्ट कंपन्यांमार्फत कार्यरत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कामगार उपआयुक्त चेतन जगताप यांच्या आदेशानुसार पात्र कामगारांना २१ हजार रुपये वेतन, वेतनातील फरक आणि बोनस देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे संघटनेने सांगितले. या निर्णयाच्या अंमलबजावणीवर संघटना लक्ष ठेवणार आहे.

कामगार आयुक्त कार्यालयात रोजगार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर चर्चा झाली कामगार उपआयुक्त चेतन जगताप यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रोजगार संरक्षण, हरियाणा पॅटर्न, वेतन आणि सुरक्षिततेसंबंधी प्रश्न मांडण्यात आले.

हरियाणा पॅटर्नसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सविस्तर सादरीकरण तयार ठेवण्याच्या सूचना मिळाल्याची माहिती देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.

कंत्राटदार बदलल्यास अनुभवी कामगारांचा रोजगार कायम ठेवण्यासाठी कायदेशीर संरक्षणाची मागणी संघटनेने केली. यासंदर्भात राज्य शासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली

वीज क्षेत्रातील कामाचे जोखमीचे स्वरूप लक्षात घेऊन कंत्राटी कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. संबंधित कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.


आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले. राहुल बोडके, उमेश आणेराव, सागर पवार यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनाला प्रतिसाद देणाऱ्या कामगारांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, महावितरण, पोलीस प्रशासन आणि कामगार आयुक्त कार्यालयाचे तसेच प्रसारमाध्यमांचे संघटनेने आभार मानले.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, चर्चेत काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

आंदोलनाच्या नोटिशीत नमूद केलेल्या आणि चर्चेदरम्यान मान्य केलेल्या मागण्यांबाबत निर्धारित मुदतीत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. लेखी आश्वासन न मिळाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी निर्धारित कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष निलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला.

प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याची मागणी संघटनेने शासन आणि प्रशासनाकडे केली आहे

कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर; आशा वर्कर्सनाही ६ हजारांची भेट !!

कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! २१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर; आशा वर्कर्सनाही ६ हजारांची भेट !!

*मागील वर्षीपेक्षा १००० रुपयांची वाढ; मुख्यालयाबाहेर कामगार सेनेचा फटाके फोडून जल्लोष*

*कल्याण, दि. २७ ऑक्टोबर (दीपक इंगळे) :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महापालिका प्रशासनाने यंदा सानुग्रह अनुदानात वाढ करत २१ हजार रुपयांची दिवाळी भेट जाहीर केली आहे.

गेल्या वर्षी २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा महापालिकेच्या आस्थापनेवरील ५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्ससाठीही ६ हजार रुपयांची दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे.

*मुख्यालयाबाहेर कामगार सेनेचा जल्लोष -*

सानुग्रह अनुदान जाहीर होताच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने ८ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन २७ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने २१ हजार रुपये जाहीर केले आहेत.

या निर्णयानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस सचिन बासरे, उपाध्यक्ष सुनील पवार आणि सुरेश तेलावणे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांचे आभार मानले आहेत.

शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढत्या महागाईत हे अनुदान दिलासादायक ठरणार आहे.

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...