Sunday, 26 July 2026

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

*वंचित बहुजन आघाडी – शिवडी तालुका यांच्यातर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

शिवडी मुंबई (सचिन ननगरे) : आषाढी एकादशी निमित्ताने परिवार साफल्य हाऊसिंग सोसायटी बाहेर, दा. ग. महाजनी पथ, शिवडी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका वॉर्ड क्र. २०२ यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल, इरेझर व शार्पनर अशा  शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मुंबईतील पदाधिकारी चेतन अहिरे मुंबई अध्यक्ष, समीर कांबळे मुंबई महासचिव बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत भालेकर, प्रतीक जाधव, महेश तांबे, संजय भालेराव, सुभाष काळे, प्रदीप गुलाबराव जाधव, सुमेर खरे, ॲड. विकास गांगुर्डे, सतीश गांगुर्डे, वेदांत पागडे, वैशाली विजय भालेराव, महेश्वरी तांबे, श्रद्धा भालचंद्र जाधव,उज्वला काळे आणि वैशाली गुणवंत भालेकर वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका यांच्या वतीने करण्यात आले.

Saturday, 25 July 2026

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !!

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !!

उरण दि २५,'(विठ्ठल ममताबादे) : उरणचे उत्तम खेळाडू स्वर्गीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अश्विन पाटील मित्र परिवारच्या माध्यमातून श्री साई ब्लड बँक, पनवेल यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत श्री. मा. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, उरण शहर येथे होणार आहे.

“रक्ताचा आहे थेंब थेंब मौल्यवान, याची असावी सर्वांना जाण; म्हणूनच करावे रक्तदान” या सामाजिक संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक कार्य असून, आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या सामाजिक उपक्रमाचे आयोजक अश्विन पाटील मित्र परिवार असून, वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’ !!

आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’ !!

*# कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला एकवीरा गडावर भक्तिमय प्रवास.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : आई एकवीरा मातेच्या भक्तीभावाने प्रेरित होऊन आई एकवीरा मंदिर, कोप्रोली,उरण ते श्री क्षेत्र कार्ला (एकवीरा) गड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.उरण मध्ये पहाटे ६.३० वाजता आई एकवीरा मंदिरात आरती झाल्यानंतर उरण मधून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ढोल-ताशांच्या गजरात रॅली मार्गस्थ होईल. श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकवीरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर आई एकवीरा मंदिर परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

या भव्य बाईक रॅलीच्या आयोजनात विविध गावातील भाविक भक्तांचा सहभाग आहे.रॅलीच्या आयोजनासाठी संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

आई एकवीरा मातेच्या जयघोषाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित या भव्य बाईक रॅलीत शिवप्रेमी, एकवीरा भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


नाव नोंदणी व संपर्कासाठी फोन नंबर :- 
विकी कोळी (कोप्रोली) – ९८२०६७३४८४,
जितू कोळी (कोप्रोली) – ९९३०३०५२५५,
चेतन गावंड (पिरकोन) – ९८१९६७९९०५,
विधाता पाटील (कोप्रोली) – ९९२०६३२०२१,
कुणाल म्हात्रे (कोप्रोली) – ७७७७००१०८७,
प्रसाद पाटील (गोठ्या) – ७९६६६०४०३२,
विनायक गावडे (पिरकोन) – ८०७९२९५४७६,
दूशंत ठाकूर (पानदिवे) – ८८२८६८६६९७,
अक्षय मोकाशी (पानदिवे) – ८०८२२५८८२९,
संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे – ९८२१८३८४०८

माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत

माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत 

स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट.

 उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "माऊली माऊलीच्या जयघोषात, जय जय राम कृष्णा हरी नाम घोषात पंढरपूर दुमदुमले आहे. अक्षरशः लाखो भक्तांचा महासागर पाहून मन तृप्त झाले. पंढरपूरचा शिवाजी चौक ते  विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदीला आलेला भक्तांचा महापूर ओलांडताना आणि असंख्य भक्तांच्या लाटा अंगावर झेलताना आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आणि आनंद मिळाला. दिनदुबळे, कष्टकरी विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले २० ते २५ लाख भाविक, दर्शनासाठी १५ ते २० किलोमीटर लांबच्या लांब लागलेल्या रांगा पाहून भक्तांच्या सहनशीलतेला आणि श्रद्धेला सलाम करायला हवा. मी जगभर फिरतो; नुकताच अमेरिकेत जाऊन अर्जेंटिना-स्पेन फुटबॉल अंतिम लढतच्या सामन्याचा सहपरिवार आनंद घेतला. तेथून १७ ते १८ तास प्रवास करून आल्यानंतर तातडीने पंढरपूर गाढले. कारण १९९७ पासून मी आषाढी एकादशीची वारी न चुकता दरवर्षी करतो. कोविडचा अपवाद वगळता माझ्या पंढरपूर वारीला २५ वर्षे झाली. त्यामुळे वारीतील भक्तांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद, सुख पाहून मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, माझ्या पंढरीची वारी जगात भारी," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत शनिवारी (ता. २५) विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हणाले. ते पुढे म्हणाले, "वारीतील भक्तांचा कमालीचा शिस्तबद्धपणा, कुठलाही त्रागा न करता मिळेल त्या रस्त्याने हरिनामात तल्लीन झालेले भाविक, दर्शनासाठी जाताना जागा मिळेल तिथे तंबू ठोकलेले भाविक, तहानभूक विसरून माऊली माऊलीचा जयघोष करणारे वारकरी पाहून महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आषाढी एकादशी वारी हे महत्त्वाचे जणू वैभव आहे. तसेच लाखोंच्या गर्दीला आवरण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासन यांच्या कामगिरीला सॅल्युट करावासा वाटतो."
शुक्रवारी महेंद्रशेठ घरत यांनी कांबे-रसायनी येथून पंढरपूर येथे दाखल झालेल्या दिंडीत सहभागी होऊन वारकरी यांच्यासोबत महाप्रसाद घेतला. 

यावेळी युवा अध्यक्ष निखिल ढवळे उपस्थित होते, तर शनिवारी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांच्या महासागरात महेंद्रशेठ घरत डुंबले. त्यानंतर त्यांनी तरघर, उलवे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळाच्या दिंडीला भेट दिली. यावेळी मनोहर ओवळेकर, उत्तम कोळी आणि वारकरी बंधूंनी महेंद्रशेठ घरत आणि गुलाबशेठ घरत यांचे स्वागत केले.

आषाढी एकादशी निमित्त सिल्वर स्टार मर्सडीस तर्फे भाविकांना अल्पोहार वाटप !!

आषाढी एकादशी निमित्त सिल्वर स्टार मर्सडीस तर्फे भाविकांना अल्पोहार वाटप !!

वाळुंज छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त वडदगाव छत्रपती संभाजी नगर येथे प्रती पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दिंडी सोबत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी येत असतात. या दिवशी बहुतांशी भाविकांचा उपवास असल्याने त्यांच्या सेवेसाठी विविध संघटनेच्या वतीने अल्पोहाराचे वाटप केले जाते.

दर वर्षाच्या प्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकीच्या हेतूने पुणे अहिल्यानगर रोड येथील राम ऑटोभान-सिल्वर स्टार मिर्सडीस बेन्सच्या शाखेच्या वतीने वारकरी भाविकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

या वेळी सिल्वर स्टार वाळुंज शाखेचे ब्रांच हेड विशाल माळी, विष्णू पवार, अब्दुल वारीस, शुभम गायकवाड, कृष्णा बोलकर, अरबाज शेख, गौरव भानुशाली, सचिन नांगरे बापूसाहेब वाघ, प्रगती हिवाळे, साक्षी त्रिपाठी आदी उपस्थित होते

Friday, 24 July 2026

श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण !!

श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या वतीने सामाजिक उपक्रम "एक झाड आई वडिलांच्या नावाने" राबविण्यात आले.एक झाड आई वडिलांच्या नावाने या संकल्पनेतून करळ ब्रीज आणि करळ फाटा ते दास्तानफाटा या पालखी मार्गावर १३५ झाडांचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी भर पावसात साईभक्तांनी उत्साहात सेवा केली.साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात रुक्ष दान केले.सदर कार्यक्रम लोकसहभागातून झाला याचे समाधान सर्व कमिटी मेंबर यांना झाला होता.यावर्षी मंडळ २६ व्या वर्षात प्रदार्पण करत आहे. आणि त्याच नियोजन सुरू झालं आहे.

दिंड्या, आणि वाऱ्या खूप जातात पण हे मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रमातून साई सेवा करत असत म्हणून मंडळाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आदराने घेतले जाते.अध्यात्म बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !!

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !!

*डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये* आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

या ग्रंथ दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. हातात पवित्र ग्रंथ, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला. शाळेचा परिसर जणू पंढरपूरच्या वारीचे स्वरूप धारण करून गेला.

शाळेतील सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत ग्रंथ दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला. पालकांनीदेखील विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषेत तसेच आकर्षक तुळशी वृंदावनासह पाठवून उपक्रमाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संतपरंपरा, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ग्रंथांचे महत्त्व, भक्ती, संस्कार, शिस्त आणि एकात्मतेचे मूल्य यांची प्रेरणा देण्यात आली.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा भक्तिमय व संस्कारमय सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...