जय जवान क्रीडा मैदान कचऱ्याच्या विळख्यात; मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !!
घाटकोपर,(केतन भोज) : प्रभाग क्र.१२३ रामनगर ब मायकल डिसोजा चाळीच्या वरील बाजूस डोंगराळ भागात जय जवान क्रीडा मैदान हे परिसरातील मुलांसाठी उपलब्ध असलेले एकमेव मैदान असून, सध्या ते कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, मैदानाच्या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या वस्ती स्वच्छता योजना आणि डीप क्लिनिंग ड्राईव्ह योजनेची कामे प्रभावीपणे होत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ यांचा असा आरोप आहे की,मनपा एन विभाग संबंधित घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे मैदानाचे स्वरूप आता क्रीडांगणा ऐवजी डम्पिंग ग्राऊंडसारखे झाले आहे. मैदानाच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक, बांधकामातील अवशेष आणि इतर घनकचरा मोठ्या प्रमाणावर साचला असून खेळाडू आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रामनगर आणि आसपासच्या डोंगराळ परिसरात मुलांना खेळण्यासाठी पर्यायी मैदान उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत या एकमेव मैदानाची ही अवस्था झाल्याने मुलांच्या शारीरिक विकासावर आणि क्रीडा संस्कृतीवर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे मैदानाची तात्काळ स्वच्छता करून नियमित डीप क्लिनिंग ड्राइव्ह तसेच वस्ती स्वच्छता योजना मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
"एकीकडे मनपा प्रशासनाकडून खेळांना प्रोत्साहन देण्याच्या घोषणा केल्या जातात,तर दुसरीकडे मुलांसाठी उपलब्ध असलेले एकमेव मैदान कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले जात आहे. अखेर स्थानिक मुलांनी खेळायचे कुठे?" असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment