माणगावच्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतली दखल; भावनाताई घाणेकर यांच्या माध्यमातून आंदोलकांशी संवाद !!
उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये व शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, या मागण्यांसाठी माणगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू मोहन रोडेकर व विधानसभा अध्यक्ष संताजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जाहीर अन्नत्याग आंदोलनाला उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.
यावेळी भावनाताईंनी माणगावचे तहसीलदार विपिन लोकारे यांच्याशी चर्चा केली. तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलकांच्या मागण्या व व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. भावनाताईंच्या पुढाकारातून सुप्रियाताईंनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आंदोलकांच्या मागण्या जिल्हाधिकारी व शासनापर्यंत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले.
आज आंदोलनाचा चौथा दिवस असूनही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला भावनाताई घाणेकर यांनी ठाम पाठिंबा दर्शविला असून, मागण्यांना न्याय मिळेपर्यंत या संघर्षात खंबीरपणे सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे
No comments:
Post a Comment