Wednesday, 18 November 2026

मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागते वणवण; रक्तदात्यांनी पुढे येण्याचे 'रक्तदाते निलेश कोकमकर' यांचे आवाहन !!

मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागते वणवण; रक्तदात्यांनी पुढे येण्याचे 'रक्तदाते निलेश कोकमकर' यांचे आवाहन !!

**दिवाळीच्या सलग सुट्ट्यांचा रक्तसाठ्यावर परिणाम; थॅलेसेमिया, कर्करोग आणि शस्त्रक्रिया रुग्णांसमोर मोठे संकट**

**मुंबई : प्रतिनिधी**

मुंबईसह देशातील विविध भागांतील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः मुंबईमध्ये उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. रक्ताच्या एका पिशवीसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक रक्तपेढ्यांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना निराश होऊन परतावे लागत आहे. ही परिस्थिती केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर रक्तपेढ्या आणि रक्तदात्यांसाठीही चिंतेचा विषय बनली आहे. रक्ताची गरज असल्याचे सांगणारे अनेक फोन कॉल, व्हॉट्सॲप संदेश आणि सोशल मीडिया पोस्ट रक्तदात्यांपर्यंत सातत्याने पोहोचत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत रक्त उपलब्ध नसल्याने रक्तदाते असूनही अनेक वेळा मदत करणे शक्य होत नाही. रक्तदानासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या रक्तदात्यांनाही सध्या असहाय्यतेची भावना जाणवत आहे.

 *दिवाळीच्या सुट्ट्यांचा रक्तसाठ्यावर परिणाम, थॅलेसेमिया आणि कर्करोग रुग्णांसमोर मोठे संकट - डॉ. प्रमेश सी. एस.* 
दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि नियमित रक्तदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात अनेक नियमित रक्तदाते गावी किंवा बाहेरगावी जातात. परिणामी रक्तदानाचे प्रमाण कमी होते. मात्र रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज सुट्ट्यांमध्येही कायम असते. त्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामधील अंतर वाढत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमेश सी. एस. यांनीदेखील 'X' या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करून रक्ताच्या तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या समस्येचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून देशातील विविध रुग्णालयांमध्येही रक्ताची कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. येत्या काळातही या परिस्थितीचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  रक्ताचा तुटवडा सर्वाधिक गंभीरपणे जाणवत आहे तो थॅलेसेमिया, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना. थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. कर्करोगावरील उपचार, मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण आणि प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्येही रक्ताची आवश्यकता भासते.

अशा वेळी वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून अनेक रुग्णांच्या आयुष्याशी जोडलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे.

*विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे.स्वतः - MSW श्री. भीमराव काळे*
रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रक्तपेढ्यांनाही अनेक मर्यादांचा सामना करावा लागत आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्तपेढीतील कर्मचारी रुग्णांना रक्त देऊ शकत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा राग अनेकदा रक्तपेढ्यांमधील कर्मचाऱ्यांवर निघतो.याबाबत पल्लवी ब्लड सेंटरचे MSW प्रभारी श्री. भीमराव काळे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.ते म्हणाले, "सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तपेढ्यांवर मोठा ताण आहे. रक्त उपलब्ध नसताना रक्तपेढीतील कर्मचारीदेखील काही करू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांवर राग काढण्याऐवजी स्वतः पुढाकार घ्यावा. ज्या रुग्णालयात आपले रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये किंवा मुंबईतील इतर अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये जाऊन स्वच्छिक रक्तदान करावे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र व्यक्तींनी वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदानासाठी पुढे यावे. विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानात सहभागी व्हावे. स्वतः रक्तदान करण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारातून आणि परिचितांमधून नवीन रक्तदाते निर्माण करावेत. रक्तदानाबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे."

*मंदिरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करा; नेते, मंत्री आणि कलाकारांनीही पुढाकार घ्यावा! - श्री. अनिल गरे*
रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सदस्य आणि सक्रिय रक्तदान शिबिरांचे आयोजक श्री. अनिल गरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. ते म्हणाले, "ज्या मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते, अशा ठिकाणी योग्य परवानग्या घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले पाहिजे. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांबरोबर रक्तदानाचा संदेश पोहोचवला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री तसेच चित्रपट आणि कला क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनीही रक्तदानात सक्रिय सहभाग घ्यावा. त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला, तर अनेक तरुण आणि नागरिक प्रेरित होतील."

*तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे - रक्तदाते श्री. निलेश कोकमकर**   
रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे रक्तदाते श्री. निलेश महादेव कोकमकर यांनीही या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आज मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन करत आहेत. रक्तदाते म्हणून आम्हालाही अनेक फोन आणि संदेश येत आहेत. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज आहे, हे समजल्यावर त्याला मदत करण्याची प्रत्येक रक्तदात्याची इच्छा असते. परंतु रक्तपेढ्यांमध्येच रक्त उपलब्ध नसेल, तर आम्ही तरी मदत कशी करणार? ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. आज कोणाला रक्ताची गरज आहे, उद्या ती गरज आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीलाही भासू शकते. त्यामुळे रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर रक्तदाते शोधण्यापेक्षा गरज निर्माण होण्यापूर्वीच समाजात रक्तदाते निर्माण करणे आवश्यक आहे. मुंबईकरांना माझी हात जोडून विनंती आहे की, प्रत्येक तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे. केवळ स्वतः रक्तदान करून थांबू नका, तर आपल्या किमान पाच मित्रांना रक्तदानासाठी प्रेरित करा. आपल्या सोसायटीत, कार्यालयात, मित्रमंडळात आणि सामाजिक संस्थांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करा. आपले एक रक्तदान एखाद्या गरजू रुग्णासाठी जीवनदान ठरू शकते." मुंबईतील विविध सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, कॉर्पोरेट कार्यालये, गृहनिर्माण संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अधिकृत रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...