Tuesday, 17 November 2026

एनआरसी कामगारांसाठी २०० कोटींचे पॅकेज मंजूर !!

एनआरसी कामगारांसाठी २०० कोटींचे पॅकेज मंजूर !!

*१४ वर्षांची प्रतीक्षा संपली; कामगारांसाठी आनंदाचा ऐतिहासिक दिवस!*
*३१ कोटींवरून थेट २०० कोटींची तरतूद*

*संदीप  शेंडगे | कल्याण :* एनआरसी कामगारांसाठी आनंदाची बातमी असून एनआरसी कामगारांना त्यांची हक्काची प्रलंबित असलेली देणी आदानी समूहाने जाहीर केली असून ३१.१६ कोटींवरून आता थेट २०० कोटी रुपये कामगारांना मिळणार आहेत. त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून १४ वर्षांची प्रतीक्षा संपल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.

आशिया खंडातील एकेकाळचा अग्रगण्य औद्योगिक कारखाना म्हणून ओळख असलेला नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन (एनआरसी) कारखाना २००९ मध्ये बंद पडल्याने हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही आणि भविष्याची कोणतीही शाश्वती नाही, अशा अत्यंत कठीण परिस्थितीत कामगारांनी तब्बल १४ वर्षे संघर्ष केला. अखेर या प्रदीर्घ संघर्षाला मोठे यश मिळाले असून, एनआरसी कामगारांसाठी तब्बल २०० कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झाल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीला ३१ कोटी रुपयांच्या आसपास असलेली रक्कम कामगारांसाठी मिळणार होती, परंतु आता थेट २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याने कामगार वर्गाने समाधान व्यक्त केले असून अनेक अडचणी, आर्थिक विवंचना आणि अनिश्चिततेचा सामना करूनही कामगारांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्याला आज अंतिम स्वरूप मिळाल्याने अनेक कामगारांनी आनंद व्यक्त केला.

मंत्रालय, दिल्ली या ठिकाणी सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करून अनेक बैठका संपन्न झाल्या, परंतु कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय होत नव्हता. अखेर या संघर्षाला यश मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्र पवार यांच्या मध्यस्थीने महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयटकचे श्री. उदय चौधरी आणि महाराष्ट्र जनरल युनियनचे श्री. भूषण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांच्या ३१ कोटींहून थेट २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे ही कामगारांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाला अखेर सकारात्मक दिशा मिळाल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दिल्ली येथील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात एनसीएलएटी न्यायालयात यापुढे नव्याने कामगारांचा कोणत्याही प्रकारचा दावा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दावे दाखल करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपली असून, त्यानंतर कोणताही नवीन दावा न्यायालय स्वीकारणार नसल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची मंजुरी ही केवळ आर्थिक बाब नसून, वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या कामगारांच्या लढ्याला मिळालेला मोठा दिलासा मानला जात आहे. आता मंजूर झालेल्या पॅकेजचे प्रत्यक्ष वितरण कोणताही विलंब न करता, पारदर्शक पद्धतीने आणि पात्र कामगारांच्या हक्कानुसार व्हावे, अशी कामगारांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...