*मुंबई (सचिन ननगरे) :* महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी, घाटकोपर, मुंबई येथील शहीद स्मारक हॉल येथे संपन्न झाली.
महाराष्ट्रात / देशात दलित-बौद्ध-आदिवासी-मुस्लिम अल्पसंख्याक-ओबीसी समूह प्रस्थापित पक्षाच्या राजकारणाला कंटाळला आहे. कुठलाही समाज घटक समाधानी नाही, जाती-जातीमध्ये दरी निर्माण होत आहे. काही शक्तींकडून जातीय-धार्मिक वाद वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. कुठल्याही जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्रात दररोज कुठे ना कुठे बौद्ध-आंबेडकरी तरुणांचे हत्याकांड होत आहे. महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, गावगुंडांना कुठलाही धाक राहिलेला नाही. महाराष्ट्राचे सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय या राज्यात कोणताही राजकीय पक्ष राजकारणात तग धरू शकणार नाही. या महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी व सर्वच समाजातील उपेक्षित-वंचित घटकांना सर्वच क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाशिवाय पर्यायच नाही, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांची आणि जनतेची रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे, अशी मागणी होती. या मागणीची दखल घेऊन सत्ता पक्षाच्या वळचणीला असलेले रिपब्लिकन नेते वगळून बाकी सर्वच रिपब्लिकन पक्ष व सामाजिक संघटनेचे एकत्रीकरण करण्यावर बैठकीत एकमत झाले.
*बैठकीत सर्वानुमते पुढील ठराव घेण्यात आले :*
*१)* रिपब्लिकन (आंबेडकरी) ऐक्याची चळवळ *"संविधान परिवार"* या बॅनरखाली भविष्यकाळात गतिमान करणार.
*२)* रिपब्लिकन ऐक्याची जाहीर अभिवादन सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त *दि. ६ डिसेंबर २०२६, सायं. ५ वा., शिवाजी पार्क, दादर* येथे होणार.
*३)* *दि. १६ डिसेंबर २०२६* रोजी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चाचे आयोजन.
*४)* *दि. २९ नोव्हेंबर २०२६* रोजी सर्व पक्ष नेत्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक - *नाशिक* येथे होणार. (निमंत्रक - अण्णासाहेब कटारे)
*बैठकीला उपस्थित मान्यवर :*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाई तानसेन ननावरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी बागडे, पॅंथर संघटना अध्यक्ष मनोज गायकवाड, जय भीम आर्मी अध्यक्ष नितीन मोरे, रवींद्र शेंडे (नागपूर), समाजभूषण सो.ना. कांबळे, अँड. डॉ. डी. एस. सावंत, पोपटराव सोनवणे, अशोक हिरे, दिनेश भडांगे, आनंद जाधव, श्याम वाडकर, सुमित चव्हाण, अशोक शेळके, तानाजी कांबळे, सुमित भालेराव, ईश्वरसिंग झंझोटड, शिवाजी म्हस्के, मनोहर ओगले, भाई संजीव चंद्रा, विनोद रंगारी, देवेंद्र बागडे, बिपीन कटारे, शरद बनसोडे, चांगदेव कसबे, विजय गायकवाड, प्रवीण आवळे, रेहान शेख, राहुल गायकवाड, श्याम बागुल, विकास कारे, दिलीप मंडल, दामू आढांगळे आदी पक्ष प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment