Tuesday, 2 June 2020

चक्रीवादळाच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

*चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज*
*मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न*


*संकटाला धैर्याने सामोरे जाऊ आणि सहिसलामत बाहेर येऊ त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन*

मुंबई दिनांक २: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधुस होऊ नये, मनुष्य हानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, सर्व टीम्स सर्व आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनी ही घरातच राहणे हिताचे असून वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज त्यांनी समाजमाध्यमांद्वारे जनतेला थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

*केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्रसरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एस.डी.आर.एफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

*घरातच सुरक्षित राहावे*
कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहिसलामत बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतू आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावे, दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, घरात राहण्यातच सर्वांचे हित आहे.

*सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क*
या चक्रीवादळाने नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून त्यांना घरी सुखरुप परत आणण्यात आले आहे. पालघरच्या मच्छिमार बांधवांशीही संपर्क झाला आहे. ते ही परत येत आहेत. पुढील दोन दिवस किंवा पुढची सुचना येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असेही ते म्हणाले. सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंतच्या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

*चक्रीवादळात ही घ्या काळजी*
मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आज दिली ते म्हणाले की, ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही.

पुरसदृष्यस्थिती होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहेच परंतू दुर्देवाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे, पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा, अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवण्याचे, बॅटरी, पॉवरबँक, मोबाईल चार्ज करून ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगून त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुचना ऐका, पाळा असेही नागरिकांना सांगितले.

*सुरक्षितस्थळी जा, प्रशासनाला सहकार्य करा*
राज्यातील सर्व स्थानिक प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . ते म्हणाले की धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षित स्थळी नेत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जावे, ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवावी, तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायची नाही याची काळजी शासनही घेत आहे म्हणूनच बांद्राकुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सुरु करण्यात आलेल्या फिल्ड रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तशाचप्रकारे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही. कुठे वायुगळती झाली असेल किंवा केमिकल जर कुठे पडले असेल तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जायचे नाही. असे काही होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू दुर्देवाने असे काही घडल्यास प्रशासन काळजी घेईल, नागरिकांनी तिकडे जाऊ नये. स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवू शकू. आपण कोरोनाशी लढत आहोतच निसर्गही आता आपली परिक्षा पाहात आहे. पण आपण सर्वजण मिळून त्याला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊ आणि या संकटातून सहिसलामत बाहेर येऊ, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
...

त्या चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी अभिनेता शाहरुख खान पुढे सरसावा !

'त्या' चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी अभिनेता शाहरुख खान पुढे सरसावला.


मुंबई - रेल्वे प्लॅटफॉर्मवर निपचित पडलेल्या महिलेच्या शेजारी खेळणा-या दोन मुलांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दुर्दैवाची गोष्ट ही की ती महिला मृत पावलेली होती आणि त्याची त्या चिमुकल्यांना काहीच जाणीव नव्हती. त्यांना आपली आई झोपली आहे असेच वाटत होते. हा व्हिडीओ अभिनेता शाहरुख खानने पाहिल्यानंतर तो या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.त्याच्या ‘मीर फाउंडेशन’ने या मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीर फाऊंडेशनने या संदर्भात एक ट्विट करत या चिमुकल्यांना मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे आम्ही या मुलांची जबाबदारी घेतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘व्हिडीओमध्ये आईला उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चिमुकल्यांपर्यंत पोहोचविलं त्यासाठी आभार. आम्ही या मुलांची जबाबदारी घेत आहोत. सध्या ही दोन्ही मुलं त्यांच्या आजी-आजोबांसोबत सुरक्षित आहे’,असं ट्विट मीर फाउंडेशनने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अहमदाबादमधून मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या स्पेशन ट्रेनने अरविना खातून (३५ वर्ष) ही महिला आपल्या दोन मुलांसह प्रवास करत होती. तिचा २५ मे रोजी मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात दुर्दैवी अंत झाला.

लॉकडाउनमुळे ओढावलेल्या या संकटकाळात शाहरुख खान त्याला शक्य होईल त्याप्रमाणे गरजूंची मदत करत आहे. त्याने कोलकाता नाइट राइडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाउंडेशन आणि रेड चिलीज वीएफएक्स या कंपनीअंतर्गंत अनेकांना मदत केली आहे.

तसंच पंतप्रधान मदतनिधीमध्ये आर्थिक रक्कम जमा केली आहे. तसंच २५ हजार पीपीई किटही दिल्या आहेत.

मुंबईतील खाजगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट, ४ बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस.

मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट, ४ बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस.


मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (दि.१) रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.दरम्यान, या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोरोना तसेच कोरोना शिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा अभिनव निर्णय अन्य राज्यांनाही प्रेरणादायी ठरला आहे.

८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते.यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले.त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.सुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा,८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली.

त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला.रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या.शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेडबाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते.क्षमतेच्या ५० टक्केही खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे, अशा विविध बाबी या भेटी दरम्यान निदर्शनास आल्या.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप.


मुंबई - एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण ३१ विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहें. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.तसेच कोरोनामुळे बिघड्लेले आर्थिक चक्र पुन्हा मार्गावर आणण्यासाठी एक वर्ष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीस शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या मुद्द्यांवर अद्याप परिपत्रक काढण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विभागासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आले होते. ज्यात फिजिकल डिस्टसिंग पाळण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यासाठी अटी आणि शर्ती देण्यात आल्या होत्या. मात्र या शासनाच्या परिपत्रकाकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्ग खात्याने दुर्लक्ष केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाखालील मुले आहेत किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कर्करोग, मधुमेह आणि ब्लडप्रेशर सारखे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलू नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटी महामंडळाकडून शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील आगारात कर्मचाऱ्यांनी गर्दी होत आहे.यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचे पूर्णता तीन तेरा वाजले आहे. तसेच कामावर हजर होणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांना दूरवरून येऊन पुन्हा घरी परत जावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगीतले .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक परिपत्रक काढली आहेत. मात्र या सर्व परिपत्रकांना एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.परिपत्रकातील नियमांचे पालन मंडळाकडून केले जात नाही. यामुळे कामगारांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

हार्दिक पांड्या लग्नाआधीच 'बाप' होणार, सोशल मिडिया वरुन दिली माहिती !

हार्दिक पांड्या लग्नाआधीच 'बाप' होणार,सोशल मीडियावरुन दिली माहिती.


नवी दिल्ली - इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लग्नाआधीच बाप होणार आहे.

हार्दिक पांड्याने त्याची होणारी बायको नताशा स्टानकोविचसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.

नताशाच्या पोटावर हात ठेवलेला फोटो टाकून हार्दिक पांड्याने तो बाप होणार असल्याची माहिती दिली आहे.

हार्दिकने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,नताशा आणि माझा एकमेकांसोबतचा प्रवास खूपच चांगला होता.आता हा प्रवास आणखी चांगला होणार आहे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

सावधान ! येत्या ४८ तासात रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका नागरिकांनी घराबाहेर पडू नये : तहसिलदार प्रियांका आयरे

सावधान ! येत्या ४८ तासात रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका नागरिकांनी घराबाहेर पडू नये : तहसीलदार प्रियांका आयरे


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्यासह संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट घोंगावत असताना आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व गावांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे महाभयंकर विनाशकारी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा. सदर निसर्ग चक्रीवादळ मंगळावर दिनांक ०२ जून २०२० सायंकाळी ०५ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक ०४ जून च्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. या मध्ये विशेष करून बुधवार दिनांक ०३ रोजी हे निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर येवून धडकणार आहे. सदर निसर्ग चक्रीवादळाची वेग मर्यादा ताशी शंभर ते एकशे तीस - चाळीस प्रती तास असू शकते. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी होऊ शकते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या सर्व गावांना याचा मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर माननीय रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला सतर्कतेच्या दिलेल्या सूचनेनुसार माणगांव तालुक्याच्या माननीय तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी तात्काळ माणगांव तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख, आपत्कालीन यंत्रणा आणि माणगांव तालुक्यातील सर्व पत्रकार यांची मंगळवार दिनांक ०२ जून रोजी मिटींग घेऊन त्यांना संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याची सविस्तर माहिती देऊन या संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा आणि या संदर्भातील लोक जनजागृती संबंधी सूचना दिल्या.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा या ७ तालुक्यांतील किनार्‍यालगतच्या गावांमधील नागरिकांना आज ०२ जून रात्री सायंकाळी ५ वाजल्यापासून ०३ व ०४ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी मॅडम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये हा मनाई आदेश लागू केला आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे होणारे नुकसान व जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने (सदर चक्रीवादळाचा किनार्‍यापासून ०५ किमी क्षेत्रात असलेला अधिकचा प्रभाव विचार घेता) सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यातील खाडी, समुद्र किनार्‍यालगतच्या गावांमधील नागरिकांना ०२ जून रोजी रात्री १२ वाजल्यापासून ०३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच त्यांच्या पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
हा आदेश शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कलम १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ सह अन्य कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये देण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सतर्कतेच्या सूचनेनुसार माणगांव तालुक्याच्या माननीय तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी माणगांव तालुक्यातील सर्व सरकारी निमसरकारी खात्यांचे प्रमुख व सर्व आपत्कालीन यंत्रणेला या संदर्भात मिटींग घेऊन या संदर्भातील खबरदारी आणि आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर माणगांव तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना आणि वार्ताहर/ प्रतिनिधी यांची मिटींग घेऊन त्यांना निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित वेळेत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, खबरदारी, घराबाहेर न पडण्याच्या सूचना व सविस्तर माहिती देऊन या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या.

कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे तहसीलदाराने आवाहन !

कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे तहसीलदारांचे अवाहन!



कल्याण (संजय कांबळे) निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मुंबई समुद्र किना-या लगत असलेल्या परिसराला तसेच पालघर, डहाणू या भागाला देखील बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे 'त्याच धर्तीवर मुंबई ला लागुण असलेल्या कल्याण खाडीच्या किनाऱ्याजवळ गावांनी सतर्क रहावे असे अवाहन कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.
निसर्ग चक्रीवादळ मुंबई किना-याला धडकणार असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील मुंबई सह रत्नागिरी, रायगड, येथील हरेहरेश्वर, हर्णे तसेच पालघर, अर्नाळा येथे देखिल वादळाचा व नंतर येणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या धर्तीवर परिसरात एन डि आर एफ ची टिम पाठविण्यात आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण खाडी किनारी असलेल्या मांडा, अटाळी, गुरवली, नांदटर, गंधारी, सांगे किरवली, पिसाडॅम, सांगोडा, को ढेरी, वासुद्री, मोस, चौधरपाडा, बापगाव, पिंपळास, देवरुंग, आदी गावांना सावध रहाण्याचा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे मला तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे. ं
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका हा महत्त्वाचा तालुका आहे तालुक्याच्या पश्चिमेस ठाणे, भिवंडी, उत्तरेला शहापूर भिवंडी, पुर्वेस शहापूर मुरबाड तर दक्षिणेस उल्हासनगर व रायगड जिल्हाची हद्द आहे मुंबई पासून केवळ 45 कि मी अंतर असून कल्याण शहराच्या पश्चिम भागालगत व भिवंडी तालुक्याचे पुर्व भागालगत आणि डोंबिवली, दिवा भागालगत खाडी आहे. त्यामुळे या सर्वांनी सतर्क व सावध रहावे असे अवाहन केल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !! *कल्याण (संजय कांबळे)...