Thursday, 2 July 2026

छत्रपतींच्या विचाराने वाटचाल करणारे सर्वमान्य नेतृत्व : संजय हंडोरे पाटील

व्यक्ती विशेष __

छत्रपतींच्या विचाराने वाटचाल करणारे सर्वमान्य नेतृत्व : संजय हंडोरे पाटील

शब्दांकन :-
जयेश शेलार पाटील, 
महासचिव (अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश)

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांचा वाढदिवस ५ जुलै रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा घेतलेला हा आढावा.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मौजे भादाणे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय हंडोरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवनाचे ध्येय मानत आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात केली. गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला असून तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

निडर आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व

संजय हंडोरे पाटील हे लहानपणापासूनच निडर आणि परोपकारी वृत्तीचे होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी गावाजवळील टेकडीचे भूस्खलन होऊन भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत तीन व्यक्ती दरडीखाली अडकल्या असताना त्यांनी धैर्य, प्रसंगावधान आणि साहस दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने तिघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

तसेच वयाच्या १६ व्या वर्षी गावातील एक व्यक्ती विहिरीत बुडाल्याची घटना घडली असता त्यांनी बेधडक विहिरीत उडी मारून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी वृत्तीची आजही गावात आठवण काढली जाते.

सामाजिक कार्य आणि सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी

संजय हंडोरे  पाटील यांनी साई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून जवळपास २० वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.

महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा यासाठी घरपट्टीवर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. गावातील मोकळ्या जागांवर सुमारे ३० हजार साग वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

गणेश जयंतीनिमित्त इको-फ्रेंडली मखर स्पर्धा, दीपावलीतील किल्ले सजावट, रांगोळी व आकाशकंदील स्पर्धा, शिवजन्मोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आनंद उत्सव, उन्हाळी कडधान्य उत्पादन स्पर्धा, तसेच मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

त्यांच्या कार्यकाळात दरवर्षी सात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आणि एकही ग्रामसभा तहकूब झाली नाही. ग्रामसभेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामस्थांना संधी देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यात आली. गावात अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवातही त्यांच्या पुढाकारातून झाली.

‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ची राज्यभर दखल

दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांसह शाळेचे ध्वजारोहण करण्याचा अभिनव निर्णय भादाणे गावात त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा उपक्रम आज अनेक ठिकाणी राबविला जात आहे.

सन २०२४ मध्ये लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या स्वागत व सत्काराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. याच कार्यक्रमात उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आशिष पटेल यांच्या हस्ते ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ उपक्रमाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

झुंजार आंदोलक आणि प्रभावी संघटक

२००९ मध्ये स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली होती.

कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. कला क्षेत्रातही ते सक्रिय असून वेस्टर्न इंडिया मोशन पिक्चर अँड टीव्ही प्रोड्युसर्स असोसिएशन (WIFPA)  संलग्न फ्रेंड्स फिल्म क्रिएशनचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

व्यायामशाळा उभारणीसाठी विशेष योगदान

ठाणे जिल्हा सार्वजनिक व्यायामशाळा संघाची स्थापना करून अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना शासनाकडून व्यायाम साहित्य व व्यायामशाळा इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

राजकीय क्षेत्रातील सहभाग

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक तसेच २०१२ मध्ये कोकण पदवीधर विधान परिषद निवडणूक लढविली. सर्वसामान्य तरुणांनाही राजकारणात संधी मिळू शकते, हा संदेश त्यांनी दिला.

राष्ट्रीय स्तरावरील कार्य

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून संजय पाटील यांनी राज्यभर संघटन विस्ताराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. १३२ वर्षांची परंपरा असलेल्या आणि छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी बहाल करणाऱ्या या ऐतिहासिक संघटनेच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

शिर्डी राष्ट्रीय अधिवेशन, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांमधील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मिर्झापूर, विजयवाडा, मेहसाणा, अयोध्या आणि जबलपूर येथे झालेल्या विविध राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले.

सन २०२६ मध्ये जबलपूर येथे राष्ट्रीय मंचावरून ‘कुर्मी जोडो अभियान’ची घोषणा करून त्यांनी समाज एकत्रीकरणाची चळवळ सुरू केली. शिवराज्याभिषेक दिनी रायगड जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात करून विविध उपजातींना जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

आज महाराष्ट्रात महिला महासभा, युवक महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा, मीडिया महासभा, साहित्य महासभा आणि कृषी महासभा यांसारख्या विविध संघटनात्मक विंग्स राज्यभर कार्यरत आहेत.

सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि जनसंपर्काच्या बळावर संजय पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून पुढील काळातही त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे, ह्याच शुभेच्छा..

ग्रामीण महाराष्ट्र
संपादक : जयेश शेलार पाटील
मो. ७६२०२५६७५०

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाला आणि चित्रकला ग्रेड परीक्षा सराव वर्गाला सुरुवात !!

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाला आणि चित्रकला ग्रेड परीक्षा सराव वर्गाला सुरुवात !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी उज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाचे आणि चित्रकला ग्रेड परीक्षा अभ्यास वर्गाचे उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

       यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड , माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे ,इयत्ता दहावीचे विषय शिक्षक आणि चित्रकला शिक्षक उपस्थित होते. 

        अभ्यास वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही तसेच स्पर्धा स्वतःशी करा असे म्हटले. येथील गुणवत्तावान शिक्षक शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत आपणाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे म्हटले. तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन साई ट्रस्टचे नाव मोठं करावं अशी शुभेच्छा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक  राजेंद्र ठाकूर  यांनी केले. यावेळी जगदीश गावंड , श्रीमती सरोज पाटील , श्रीमती प्रमिला पवार , श्रीमती सुरेखा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील एन. आय. हायस्कूल येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था, उरण आणि शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, आरोग्याची काळजी, योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ९५ विद्यार्थिनींना कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन मोफत वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका रायगड भूषण संगीता सचिन ढेरे, उपाध्यक्ष मीनाक्षी कोळी व शिलश्मी सोशल फाउंडेशन यांच्या अध्यक्ष रजनी ताजणे. हृदया ,भैरवी व चौधरी सर त्याचप्रमाणे शाळेच्या ज्येष्ठ व माजी शिक्षिका कुमार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक  एल. एम . भोये, शाळेचे पर्यवेक्षक  भूषण झोपे, पर्यवेक्षिका जगताप मॅडम, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका दिपाली पाटील, सहाय्यक शिक्षक  खरमाटे एस . बी , कवितके मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी या उपयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*कोकण, बातमीदार :

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन कोकणवासीयांनी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

*स्वतंत्र धोरणाची गरज*  
देश आणि राज्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. अशा परिस्थितीत कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण, स्थानिकांना रोजगार, मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे कोकरे म्हणाले. ही संधी गमावल्यास भविष्यात कोकणासमोरील समस्या अधिक गंभीर होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

*अणुप्रकल्प विरोधात लोकचळवळ*  
कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्तावित अणुप्रकल्पाविरोधात व्यापक लोक चळवळ उभारणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही यासाठी जनतेने जागरूक राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

*आंदोलनाची भूमिका स्पष्ट*  
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, लोकजागृती करणे आणि लोकशाही मार्गाने न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू राहणार असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले.

*एकत्र येण्याचे आवाहन*  
कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिकांना न्याय मिळावा आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन दबाव गट तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

*" सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक, सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ " !!

*" सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक, सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ " !!

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या‌  कर्तव्यदक्ष कनिष्ठ लिपिक सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांनी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे त्यांचा २६ वर्षाचा प्रदिर्घ सेवाकार्यकाळ पूर्ण करून मंगळवार दि. ३०/६/२०२६ रोजी त्या सन्मानाने निवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयदेखिल आवर्जून उपस्थित होते. सर्वांसाठी दुपारी त्यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या निरोपाच्या कार्यक्रमात अनेकांनी  त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कारण त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने सलग्न २६ वर्षे सेवाकार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या प्रेमळ व नम्र स्वभावामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. साक्षी म्याडम कधी कोणावर ओरडल्या किंवा रागवल्या नाहीत, त्यांचा सर्वांसोबतचा स्नेह, आई व मोठ्या बहिणी प्रमाणे होता व सदैव राहील असे एका कर्मचाऱ्याने व्यासपीठावरुन सांगताना अनेकांचे डोळे पाणावले. कॉलेजच्या कोणत्याही कार्यक्रमात एखादी जबाबदारी त्यांना दिली की त्या मनापासून व उत्तम प्रकारे पार पाडायच्या.

या प्रसंगी कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना सुंदर भेटवस्तू, शाल व साडी देऊन त्यांचा प्राचार्य, उप प्राचार्य व जेष्ठ प्राध्यापक व प्राध्यापिकांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच काही कर्मचाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व त्यांना निवृत्तीनंतरचे पुढील आरोग्यदायी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या कुटूंबातील त्यांच्या यजमानांसह त्यांची मुलगी सृष्टी,मोठी बहिण व ननंद यांनीदेखिल त्यांच्या भावना व्यक्त करताना, साक्षी म्याडमनी नोकरी करताना कौटूंबिक जबाबदारी देखील उत्तमप्रकारे पार पाडली. तसेच त्यांच्या लाडक्या लेकीने देखील आपल्या आईचे तोंडभरून कौतुक करताना तिला गहिवरून आले.

शेवटी साक्षी म्याडमनी कॉलेजच्या सर्व कर्मचारी व शिक्षकांनी त्यांना आजपर्यंत केलेले सहकार्य व त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या मंगल भावनाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. शेवटी सर्वांनी त्यांना वाजतगाजत, जल्लोषात  व नृत्य करत कॉलेजच्या गेटपर्यंत सोबत दिली व जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.

डॉ. विष्णु ज. भंडारे 
(प्रभारी प्राचार्य)


Wednesday, 1 July 2026

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा -वंदना कोचुरे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा -वंदना कोचुरे

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारित्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन अथवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंचना कोचुरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी कमाल आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली असून, जिरायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ५ लाख तसेच बागायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ८ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात येते. योजनेअंतर्गत नमूद दरानुसार जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या जमीन मालकांनी आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करुन आपल्या जमीन विक्रीबाबतचे प्रस्ताव सादर सादर करावेत.

बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा
समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेअंतर्गत बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने ९० टक्के शासकीय अनुदानावर (कमाल रु. ३ लाख १५ हजार रुपये) मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदीसाठी कमाल खर्च मर्यादा रु. ३ लाख ५० हजार निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटाने एकूण खर्चाच्या १० टक्के म्हणजेच रु. ३५ हजार इतका स्वहिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे श्रीमती कोचुरे यांनी कळविले आहे.

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

उरण, (विठ्ठल ममताबादे ) : भारतामध्ये डिजिटल उत्क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात ‘डिजिटल भारत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरतेवर भर देण्यात आला. त्यानंतर ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ च्या माध्यमातून शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. मागील तीन दशकांमध्ये शैक्षणिक परिसंस्थेमध्ये अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदींमुळे शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. मात्र शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अपेक्षित वाढ अजूनही झालेली नाही. या बदलांमध्ये ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी स्तरावर तफावत स्पष्टपणे जाणवते.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतीची गरज असल्याचे मत शिक्षण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश ठाकूर यांनी व्यक्त केले.सध्याच्या शिक्षणामध्ये दोन महत्त्वाचे टप्पे दिसतात: शिक्षणाचे आधुनिकीकरण – पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करून डिजिटल साधनांचा वापर, आधुनिक शिक्षणाचा समावेश – पायाभूत साक्षरतेसोबत तंत्रज्ञान, नीतीमूल्ये, कौशल्ये आणि सर्जनशीलतेवर भर. या प्रक्रियेत शिक्षक आणि मानवी भूमिका महत्वाची ठरते. आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ आवश्यक आहे. 

सुरुवातीला संगणकीय शिक्षण म्हणजे आधुनिक शिक्षण मानले जात होते. मात्र कालांतराने नियमित विषयांच्या अध्यापनामध्ये डिजिटल पद्धतींचा वापर होऊ लागला. डिजिटल अभ्यासक्रमामुळे क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. ही पद्धती विद्यार्थ्यांना रुचली असली तरी शिक्षक किंवा पर्यवेक्षण स्तरावरील मनुष्यबळाकडून अजून पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही. काही प्रमाणात भीती तर काही प्रमाणात गरज नसल्याची भावना दिसून येते. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेईल ही बाब अशक्यप्राय आहे. मात्र विकसित तंत्रज्ञानाचा स्वीकार न केल्यास पुढील शैक्षणिक परिसंस्थेतून असे मनुष्यबळ मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षकांनी आपल्या कौशल्यांमध्ये डिजिटल संसाधने वापरण्याचे तंत्र कमी अवधीत आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. तुलनात्मक बोलताना आपण विकसित देशांमधील शिक्षणप्रणालीची उदाहरणे देतो, मात्र ती प्रणाली आपल्या देशात राबवण्यासाठी आवश्यक तयारी करताना मात्र कारणे दिली जातात. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. डिजिटल संसाधने आणि एआय तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा शिक्षकांकडून प्रभावी व संतुलित वापर झाल्यास पुढच्या टप्प्यात अशा तंत्रज्ञानाच्या विकासासंदर्भातील शिक्षणाचा समावेश करणे शक्य होईल. 

आधुनिक शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीला चालना देणारे माध्यम बनले आहे. शिक्षणाचे आधुनिकीकरण हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे, आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून या बदलाला गती देणे ही काळाची गरज आहे असे मत निलेश बाळकृष्ण ठाकूर (समन्वयक-EdTech कार्यक्रम, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन) यांनी व्यक्त केले आहे. निलेश ठाकूर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावर ते नेहमी जनजागृती करीत असतात

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...